Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

ShanjayRautNewsUpdate : घराच्या झाडाझडतीनंतर संजय राऊत यांची कार्यालयातही चौकशी सुरू

Spread the love

मुंबई : पत्रा चाळ घोटाळा प्रकरणी ईडीने शिवसेना नेते संजय राऊत यांना ताब्यात घेतले आहे. संजय राऊत यांच्या मुंबईतील घरी रविवारी सकाळपासून ईडीची टीम हजर असून या प्रकरणाशी संबंधित त्यांची चौकशी करत आहे. ईडीने राऊतला ताब्यात घेण्यापूर्वी दोनदा समन्स बजावले होते, मात्र राऊत एकदाही हजर झाले नाहीत. रविवारी सकाळी ७ वाजता ईडीचे अधिकारी शिवसेना नेते संजय राऊत यांच्या घरी पोहोचले. पत्रा चाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी राऊत यांची चौकशी सुरू आहे.

दरम्यान स्वप्ना पाटकर यांनी वाकोला पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनंतर संजय राऊत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ईडी प्रकरणात संजय राऊत यांच्यावर अलिबागमध्ये खरेदी केलेली संपत्ती हि मनी लॉन्डरिंगमधून मिळालेल्या पैशातून खरेदी केल्याचा आरोप आहे. या प्रकरणातील त्या एक साक्षीदार असल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत भर पडण्याची शक्यता आहे. संजय राऊत यांना ताब्यात घेतल्यापासून गेल्या साडेपाच तासापासून ईडी त्यांची चौकशी चालू आहे. त्यांच्या कार्यालयातही ईडीकडून तपास चालू असल्याचे सांगण्यात येत आहे.

तपास यंत्रणेच्या टीमसोबत सीआरपीएफचे अधिकारीही आहेत. ताब्यात घेतल्यानंतर संजय राऊत घराबाहेर पडले. घरातून बाहेर पडण्यापूर्वी संजय राऊत यांनी आईला मिठी मारली. यावेळी त्याची आई भावूक झाली. आईला मिठी मारल्यानंतर संजय राऊत यांनी काही गोष्टी सांगितल्यानंतर ते घराबाहेर पडले. यावेळी त्यांनी गळ्यात भगवा मफलर गुंडाळला होता. दोन्ही हात वर करून तो समर्थकांना अभिवादन केले आणि गळ्यातील भगवे मफलर हवेत फडकवले.

मी आजपर्यंत कोणतीही चूक केलेली नाही….

दरम्यान  काही दिवसांपूर्वी ईडी कार्यालयाबाहेर पत्रकारांशी बोलताना राऊत यांनी म्हटले होते कि ,  मला कोणत्याही प्रकारची भीती वाटत नाही कारण मी माझ्या आयुष्यात कधीही कोणतीही चूक केलेली नाही. हे राजकीय षडयंत्र असेल तर त्याची माहिती नंतर मिळेल. पत्रा चाळशी माझा काहीही संबंध नाही. ती चाळ  कुठे आहे हे देखील माहित नाही. मी आजपर्यंत कोणतीही चूक केलेली नाही.”

वास्तविक या संपूर्ण प्रकरणात पत्रा चाळमधील ६७२ कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी सोसायटी, म्हाडा आणि गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनी यांच्यात करार झाल्याचा ईडीचा दावा आहे. गुरु आशिष हे एचडीआयएलचे राकेश वाधवान, सारंग वाधवान आणि प्रवीण राऊत या कंपनीचे संचालक होते. महाडाची दिशाभूल करून तेथील एफएसआय आधी अन्य ९ बिल्डरांना विकून ९०१ कोटी जमा केल्याचा आरोप कंपनीवर आहे. त्यानंतर Meadows नावाचा नवीन प्रकल्प सुरू करून फ्लॅट बुकिंगच्या नावावर १३८ कोटी रुपये गोळा केले, मात्र ६७२ मूळ भाडेकरूंना त्यांचे घर दिले नाही. अशा प्रकारे कंपनीने १०३९.७९ कोटी कमावले.

ईडीचा आरोप आहे की एचडीआयएलने नंतर गुरु आशिष कंपनीचे संचालक प्रवीण राऊत यांना १०० कोटी रुपये दिले, त्यापैकी प्रवीण राऊत यांनी ५५ लाख रुपये संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांना दिले, जे मनी लाँड्रिंगचा भाग आहेत. यापूर्वी ईडीने शिवसेना नेते संजय राऊत यांची अलिबाग जमीन आणि दादर फ्लॅट जप्त करण्याची नोटीस दिली आहे.

शिवसेनेची टीका

संजय राऊत यांच्या ईडी चौकशी प्रकरणावर शिवसेनेचे खा. अरविंद सावंत आपली प्रतिक्रिया देताना म्हटले आहे कि , संजय राऊत यांची वाणी आणि लेखणी दोन्ही गोष्टी धारदार आहे. त्यामुळे भाजपा त्यांना घाबरली आहे. जे लोक आपल्या विरोधात बोलतील त्यांची तोंडं बंद करा असा भाजपाचा कार्यक्रम आहे. कारण त्यांची धुलाई मशिन सध्या रिकामी आहे. भाजपाकडे सध्या जे जे नेतेमंडळी गेले आहेत त्यांच्यावर भाजपानेच ईडी मार्फत गैरव्यवहाराचे आरोप केले होते. त्याचं काय झालं? फक्त महाराष्ट्रातच भ्रष्टाचारी लोकं राहतात का? इतर राज्यांमध्ये राहत नाहीत का? स्वत: राज्यपाल कोश्यारी म्हणाले की मुंबईतून गुजराती आणि मारवाडी लोकांना वेगळं केलं तर मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही. याचा अर्थ असा की पैसे वाले कोण आहेत आणि छापेमारी कोणावर सुर आहे? हे सगळं भाजपा घडवून आणत आहे”, असे अतिशय स्पष्ट शब्दांत अरविंद सावंत यांनी मत व्यक्त केले.

Click to listen highlighted text!