Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : मोठी बातमी : खा. संजय राऊत ईडीच्या रडारवर , घरासमोर तगडा बंदोबस्त

Spread the love

मुंबई : अंमलबजावणी संचालनालयाचे (ईडी) पथक शिवसेना नेते संजय राऊत यांच्या मुंबईतील घरी पोहोचले आहे. पत्रा चाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांना दोनवेळा बोलावूनही ते ईडीसमोर हजर झाले नाहीत. त्यामुळे आता ईडीची टीम सकाळीच त्याच्या घरी पोहोचली  असून त्यांच्या घरासमोर मोठा बंदोबस्त लावला आहे. 

अंमलबजावणी संचालनालयाचे अधिकारी आज सकाळी ७ वाजता शिवसेना नेते संजय राऊत यांच्या घरी पोहोचले. पत्रा चाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी राऊत यांची चौकशी सुरू आहे. तपास यंत्रणेच्या टीमसोबत सीआरपीएफचे अधिकारीही आहेत. हे पथक आज सकाळी मुंबईच्या पूर्व उपनगरातील भांडुप येथील संजय राऊत यांच्या घरी पोहोचले आहे.

पत्रा चाळ जमीन घोटाळा प्रकरणात ईडीचे तीन पथक वेगवेगळ्या ठिकाणी शोध घेत आहेत. यापैकी एक टीम संजय राऊत यांच्या मुंबईतील निवासस्थानी पोहोचली आहे.

संजय राऊत यांनी १ जुलै रोजी आपला जबाब नोंदवला होता. त्यानंतर त्याची १० तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्यांना  २० जुलै आणि पुन्हा २७ जुलै रोजी समन्स बजावण्यात आले होते. तेव्हा सध्या संसदेचे अधिवेशन चालू असल्यामुळे ईडीसमोर हजर होणार नाही. ७ ऑगस्टनंतरच हजर राहता येईल, असे त्यांनी सांगितले होते.

पत्रा चाळमधील ६७२ कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी सोसायटी, म्हाडा आणि गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनी यांच्यात करार झाला होता, असे ईडीने म्हटले आहे. गुरु आशिष कंपनीचे संचालक राकेश वाधवान, सारंग वाधवान आणि एचडीआयएलचे प्रवीण राऊत होते. म्हाडाची दिशाभूल करत, आधी एफएसआय इतर ९ बिल्डरांना विकून ९०१ कोटी जमा केल्याचा, नंतर मीडोज नावाचा नवीन प्रकल्प सुरू करून फ्लॅट बुकिंगच्या नावाखाली १३८ कोटी रुपये वसूल केल्याचा आरोप कंपनीवर आहे. मात्र ६७२ मूळ भाडेकरूंना घरे देण्यात आली नाहीत. अशा प्रकारे कंपनीने १०३९.७९ कोटी कमावले.

ईडीचा आरोप आहे की एचडीआयएलने नंतर गुरु आशिष कंपनीचे संचालक प्रवीण राऊत यांना १०० कोटी रुपये दिले, त्यापैकी प्रवीण राऊत यांनी संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांना ५५ लाख रुपये दिले, जे मनी लाँड्रिंगचा भाग आहे. सक्तवसुली संचालनालयाची शोधमोहीम सुरू होताच शिवसेना कार्यकर्ते पक्षनेते संजय राऊत यांच्या निवासस्थानाबाहेर जमले आहेत.

संजय राऊत भडकले

ईडीची टीम त्यांच्या घरी पोहोचल्याचे वृत्त समजताच खा. संजय राऊत यांनी ट्विट करून म्हटले आहे की, “महाराष्ट्र आणि शिवसेना लढत राहतील.” राऊत म्हणाले की, “मी आताही शिवसेना सोडणार नाही.” राऊत यांनी आणखी एका ट्विटमध्ये लिहिले, “खोटी कारवाई, खोटे पुरावे, मी. शिवसेना सोडणार नाही, शेवटच्या श्वासापर्यंत सोडणार नाही.

संजय राऊत यांनी ट्विट केले की, माझा कोणत्याही घोटाळ्याशी संबंध नाही. मी बाळासाहेब ठाकरेंची शपथ घेतो. त्यांनी  आम्हाला लढायला शिकवले. शिवसेनेसाठी लढत राहणार.

दरम्यान सक्तवसुली संचालनालयाची शोधमोहीम सुरू होताच शिवसेना कार्यकर्ते पक्षनेते संजय राऊत यांच्या निवासस्थानाबाहेर जमले आहेत. शिवसेनेचे प्रवक्ते आनंद दुबे म्हणाले की, संजय राऊत यांना गप्प करण्याची ही राजकीय कृती आहे. देश सर्व काही पाहत आहे. त्याचे उत्तर जनताच देईल.”

दुसरीकडे भाजप आमदार राम कदम यांनी एक व्हिडिओ जारी केला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, “शिवसेनेच्या नेत्याने पैशाची हेराफेरी केली नाही, तर तीन दिवसांपूर्वी ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना चौकशीसाठी बोलावले, तेव्हा ते का गेले नाहीत? अधिकाऱ्यांचे प्रश्न टाळण्याचे कारण काय? सकाळ, दुपार आणि संध्याकाळ पत्रकार परिषदा घेण्यासाठी त्यांच्याकडे वेळ आहे, पण ईडीच्या अधिकाऱ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही. यातील सत्य देशाला माहीत नाही का? हा बदललेला भारत आहे. नेता असो, अभिनेता असो, उद्योगपती असो, लहान असो वा मोठा, या भारतात कायद्यापुढे सर्व समान आहेत. कायदा स्वतःचा मार्ग घेईल.”

आपलं सरकार

Click to listen highlighted text!