Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : बाळासाहेब ठाकरे स्मार्ट प्रकल्पाला गती , महाबॅंकेचा पुढाकार

Spread the love

छायाचित्र : स्मार्ट प्रकल्प आणि महाराष्ट्र बँक यांच्यातील सामंजस्य कराराचे हस्तांतर करताना कृषी आयुक्त  धीरज कुमार महाराष्ट्र बँकेचे जनरल मॅनेजर अतुल जोशी कृषी परिषदेचे महासंचालक श्री रावसाहेब भागडे स्मार्ट प्रकल्पाचे अतिरिक्त प्रकल्प संचालक दशरथ तांभाळे, वित्त अधिकारी  भोसले श्रीमती भाटिया इत्यादी.

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच स्मार्ट प्रकल्पाचा आढावा घेतला आणि प्रकल्पाला गती देण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर प्रकल्पातील पदे बदलीने भरण्याचे अधिकार कृषी आयुक्तांना देण्यात आले. असे अधिकार मिळताच कृषी विभागातील प्रकल्पासाठी आवश्यक सुमारे शंभर अधिकाऱ्यांच्या बदलीने नियुक्त्या स्मार्ट प्रकल्पासाठी करण्यात आल्या आहेत. त्याशिवाय शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या बँक प्रकरणांना मंजुरी मिळण्यासाठी बँकांबरोबर सामंजस्य करार करण्याचे ठरले.

यासाठी महाराष्ट्र बँकेने पुढाकार घेतला असून राज्याचे कृषी आयुक्त धीरज कुमार आणि महाराष्ट्र बँकेचे जनरल मॅनेजर अतुल जोशी यांनी सामंजस्य करारावर दिनांक 15 जुलै 2022 रोजी स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी श्री धीरज कुमार हे प्रशिक्षणासाठी जात असल्याने त्यांचा पदभार सांभाळणारे कृषी परिषदेचे महासंचालक  रावसाहेब भागडे, महाराष्ट्र बँकेचे वरिष्ठ अधिकारी आणि कृषी विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

60 टक्के पर्यंत अनुदान

जागतिक बँक अर्थशाहीत माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन ‘स्मार्ट’ हा प्रकल्प महाराष्ट्र शासनामार्फत राबविण्यात येत आहे. या प्रकल्पातून राज्यातील प्रमुख पिकांच्या मूल्य साखळ्या विकसित करण्याचा उद्देश आहे. अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी आणि नव उद्योजकांना केंद्रस्थानी ठेवून प्रकल्पाची आखणी करण्यात आलेली आहे. या प्रकल्पातून शेतकरी उत्पादक कंपन्या, बचत गटांचे प्रभाग संघ इ. शेतकऱ्यांच्या समूह आधारित संस्थांनी मूल्य साखळी विकासासाठी सादर केलेल्या प्रकल्पासाठी 60 टक्के पर्यंत अनुदान देण्यात येते.

तथापि प्रकल्पात 40% हिस्सा या लाभार्थ्यांना उभा करावा लागतो आणि यासाठी बँकांचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे आहे. ही बाब लक्षात घेऊन स्मार्ट प्रकल्प आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांच्यात दिनांक 15 जुलै 2022 रोजी सामंजस्य करार करण्यात आला. त्याच दिवशी महाराष्ट्र बँकेने स्मार्ट प्रकल्पाने ज्या शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रकल्प स्मार्ट अंतर्गत मंजूर केले आले आहेत अशा 96 कंपन्यांना तत्वतः कर्ज मंजुरीचे पत्र दिले.

महाराष्ट्र बँकेचे वरिष्ठ जनरल मॅनेजर  विजय कांबळे यांचा पुढाकार 

यासाठी महाराष्ट्र बँकेचे वरिष्ठ जनरल मॅनेजर विजय कांबळे यांनी पुढाकार घेतला आहे. आता या तत्त्वतः मान्यतेच्या आधारे स्मार्ट प्रकल्पातील अनुदानाचा पहिला हप्ता बँकेकडे वर्ग करण्याचे प्रस्तावित आहे. यापूर्वी कर्ज मंजूर झाल्यानंतर अनुदान देण्यात येत होते परंतु बँकेच्या तत्वतः मान्यतेच्या आधारे अनुदान वितरित करण्याबाबतचे धोरण स्मार्ट प्रकल्पाने स्वीकारले आहे.

या बदलास जागतिक बँकेने अनौपचारिक मान्यता दिली असून लवकरच या प्रस्तावास जागतिक बँकेची औपचारिक मान्यताही मिळेल. अशी मान्यता मिळाल्याबरोबर कर्ज प्रकरणाला तत्त्वतः मान्यता प्राप्त शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या पहिल्या हप्त्याच्या अनुदानाचे वितरण बँकांकडे करण्यात येईल. यामुळे कर्ज मंजूर करणाऱ्या बँकांमध्ये सुद्धा एक विश्वासाचे वातावरण तयार होऊन कर्जांना अंतिम मान्यता मिळेल आणि प्रकल्प अंमलबजावणी लवकर सुरू करता येईल अशी अपेक्षा आहे. याबाबत प्रथम पुढाकार महाराष्ट्र बँकेने घेतला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!