Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : मोठी बातमी : माजी गृहमंत्री यांच्या मुलीचे अपहरण , आरोपींची ओळख पटवली …

Spread the love

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री, देशाचे माजी गृहमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या मुलीने शुक्रवारी विशेष सीबीआय न्यायालयासमोर जेकेएलएफचा प्रमुख यासीन मलिक आणि अन्य तिघांची ओळख पटविली.१९८९ मध्ये  रूबिया सईद हिचे अपहरण करण्यात आले होते. तिच्या बदल्यात पाच खतरनाक दहशतवाद्यांना सोडण्याची मागणी करण्यात आली होती.

पहिल्यांदाच रूबिया सईदला न्यायालयासमोर हजर राहण्यास सांगण्यात आले होते. सीबीआय वकील मोनिका कोहली यांनी सांगितले की, रूबिया सईद ज्या पीडीपी प्रमुख महबुबा मुफ्ती यांची बहीण आहेत, तिचा जबाब नोंदविण्यात आला. या वेळी तिने मलिकला ओळखले. या प्रकरणी २३ ऑगस्टला पुढील सुनावणी होणार आहे. रूबियाने एकूण चार आरोपींची ओळख पटविली आहे. रूबिया या सध्या तामिळनाडूमध्ये राहतात. सीबीआयकडून त्यांना साक्षीदार म्हणून नोंद करण्यात आली आहे. १९९० च्या सुरुवातीला सीबीआयने या अपहरण प्रकरणाची चौकशी हाती घेतली होती. बंदी घातलेल्या जेकेएलएफचा प्रमुख यासिन मलिक या प्रकरणी मुख्य आरोपी आहे. त्याला एका दहशतवादी फंडिंग प्रकरणी तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे.

काय आहे प्रकरण?

८ डिसेंबर १९८९ या दिवशी, केंद्रात तेव्हा व्ही पी सिंह यांचे सरकार होते. सत्तेत येऊन एकच आठवडा झाला होता. दुपारी ३ वाजता मुफ्ती मोहम्मद सईद यांची मुलगी रूबिया सईद ही श्रीनगरच्या हॉस्पिटलमध्ये इंटर्नशिप करत होती. ड्यूटी संपवून घरी निघाली असता तिची बस आधीच प्रवासी म्हणून उपस्थित असलेल्या तीन दहशतवाद्यांनी थांबविली. रुबियाला खाली उतरवून निळ्या रंगाच्या मारुतीमध्ये बसविले आणि अपहरण केले. भारताच्या गृहमंत्र्यांच्या मुलीचे अपहरण झाल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली. दोन तासांनी जेकेएलएफच्या जावेद मीरने स्थानिक वृत्तपत्राला फोन करून याची जबाबदारी स्वीकारली.

दिल्ली ते श्रीनगर पोलीस ते इंटेलिजन्समध्ये मोठी खळबळ उडाली. दहशतवाद्यांनी रुबियाच्या बदल्यात ७ दहशतवाद्यांना सोडण्याची मागणी केली. मध्यस्थी करण्याचा प्रयत्न झाला. यात पाच दिवस गेले. दिल्लीतून दोन मंत्री श्रीनगरला आले, मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांना भेटले.

१३ डिसेंबरच्या दुपारी दहशतवाद्यांमध्ये ५ दहशतवाद्यांना सोडण्यावर समझोता झाला. सायंकाळी पाच वाजता पाच दहशतवादी सोडण्यात आले. यानंतर काही तासांत रुबियाला देखील सोडण्यात आले. रुबियाला रातोरात दिल्लीला नेण्यात आले. तिथे गृहमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद आणि महबूबा मुफ्ती विमानतळावर आल्या होत्या. सईद यांनी एक बाप म्हणून मी खूश असलो तरी नेता म्हणून नाही, असे व्हायला नको होते, असे ते म्हणाले होते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!