Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraPoliticalUpdate : एकीकडे निलेश राणे तर दुसरीकडे जितेंद्र आव्हाड यांनी टोचले केसरकारांचे कान …!!

Spread the love

मुंबई  : शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि बंडखोर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांना एकीकडे भाजप नेते निलेश राणे यांनी ” तुम्ही शिंदे गटाचे प्रवक्ते आहात. आमचे नाही. असे सांगून त्यांना लिमिटमध्ये राहण्याचा इशारा दिला आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते डॉ. जितेंद्र आव्हाड यांनीही केसरकर यांना ” खाजवून खरूज काढू नका…” असा सल्ला दिला आहे.

गेल्या काही दिवसांपासून दीपक केसरकर सातत्याने आपल्या शिंदे गटाची बाजू मांडता मांडता इतर पक्षाच्या नेत्यांनाही शाब्दिक लुचा लूची करीत आहेत. त्यांच्या याच लुचा -लूचीला  निलेश राणे आणि जितेंद्र आव्हाड यांनी अतिशय कडक शब्दात समाज दिली आहे. केसरकर यांच्या ” राणेंची दोन्ही मुले लहान आहेत. त्यांना समज देण्याची गरज आहे…” या वक्तव्याला व्हिडीओ ट्विट करून निलेश राणे यांनी म्हटले आहे कि ,  ”युती टिकवण्याची जितकी जबाबदारी आमची आहे, तितकीच तुमचीही आहे. तुम्ही शिंदे गटाचे प्रवक्ते आहात. आमचे नाही.” या व्हिडीओला त्यांनी ‘दीपक केसरकर लिमिटमध्ये राहा’, असे  कॅप्शन देऊन शेअर केलं आहे.

निलेश राणे यांनी पुढे म्हटले आहे की, ”दीपक केसरकर कुठे तरी बोलले, राणेंची दोन्ही मुले लहान आहेत. त्यांना समज देण्याची गरज आहे. दीपक केसरकर आपण युतीत आहोत. विसरू नका. युती टिकवण्याची जितकी जबाबदारी आमची आहे, तितकीच तुमचीही आहे. तुम्ही शिंदे गटाचे प्रवक्ते आहात. आमचे नाही. तुमची अवस्था आम्ही मतदारसंघात काय केली आहे, हे आम्हाला माहित आहे. राणेंच्या याच दोन मुलांनी तुमची नगरपालिका तुमच्याकडून घेतली. आज भारतीय जनता पक्ष आहे तिकडे. जिल्हा परिषद देखील आमच्याकडे. पंचात समिती सदस्य तुमच्या मतदारसंघातील आमच्याकडे आहे.”

” तुम्हाला दुसरं राजकीय जीवनदान मिळालं आहे. हे विसरू नका.” ते म्हणाले, तुम्ही आम्हाला ज्या भाषेत सांगाल, त्या भाषेत उत्तर द्यायला आम्ही तयार आहोत. पण वातावरण खराब करू नका. जबाबदारी आपल्या दोघांवर आहे, विसरू नका, असेही त्यांनी म्हटले आहे.

जितेंद्र आव्हाड यांचे टोकदार उत्तर

दरम्यान  शिवसेनेत आतापर्यंत झालेल्या प्रत्येक फुटीमागे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचाच हात असल्याचा आरोप शिवसेनेच्या बंडखोर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केला आहे. त्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी जशासतसे प्रत्त्युत्तर दिले  आहे.

आपल्या ट्विटमध्ये जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे कि , “अहो केसरकर पवार साहेबांविरोधात किती बोलता? एके काळी साहेबांनी अनेकांना नाराज करत तुम्हाला सिंधुदुर्ग आणि गोव्यात हाताला धरून फिरवलं होतं. ज्या ताटात जेवलात त्यातच थुंकायचे हे कुठून शिकलात? 2014 ला मीच आलो होतो साहेबांचा निरोप घेऊन, जिथे आहात तिथे सुखी राहा, खाजवून खरूज काढू नका, अशी खोचक टीका आव्हाड यांनी केली आहे.

काय म्हणाले होते केसरकर ?

शिवसेना फुटीमध्ये पवारांचा हात आहे. बाळासाहेबांच्या हयातीत त्यांना यातना का दिल्या, हे शरद पवार यांनी जनतेला सांगावे असे आवाहनही त्यांनी केले. शरद पवार यांनी अनेकदा खासगीत बोलताना शिवसेनेच्या फुटीबाबत सांगितले असल्याचा दावा केसरकरांनी केला आहे. नारायण राणे यांना शिवसेनेतून बाहेर काढण्यासाठी पवारांनी मदत केली होती. मात्र, राणे यांनी कोणत्या पक्षात जावे याबाबत कोणतीही सूचना केली नव्हती असेही पवारांनी सांगितले होते, असा दावा केसरकरांनी केला. छगन भुजबळ यांना स्वत: शरद पवारांनी शिवसेनेतून बाहेर नेले असल्याचे ते म्हणाले. राज ठाकरे यांच्या पाठिशी शरद पवार यांचे आशीर्वाद होते असे सूचक वक्तव्यही त्यांनी केले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!