Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Maharashtra Rain Update : राज्यात पावसाची धूम , नाशिकमध्ये धुव्वाधार , गोदावरीला पूर , सतर्कतेचे आदेश…

Spread the love

मुंबई : आजही  राज्यात सर्वत्र पावसाचा  जोर कायम राहणार असून महाराष्ट्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. दरम्यान  मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी जीवित व वित्तहानी झाल्याचेही वृत्त आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या मते, महाराष्ट्रात या आठवड्यातही अतिवृष्टीपासून दिलासा मिळण्याची शक्यता नाही. मुंबई, रायगड, रत्नागिरी , पालघर , पुणे , कोल्हापूर, नाशिक  आणि गडचिरोलीला आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

नाशिकच्या पश्चिम पट्ट्यासह गंगापूर पाणलोट क्षेत्रात सुरु असलेल्या मुसळधार पासवामुळे नाशिक , त्र्यंबकेश्वर , इगतपुरी परिसरात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील धरणसाठ्यात वाढ झाली आहे. तर नाशिकला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातून आधी ३००० क्युसेकने विसर्ग करण्यात आला असून आजही या  धरणातून ५५०० क्युसेक्स विसर्ग गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. त्यामुळे गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. तर नाशिक जिल्ह्यातील धरण साठ्यात वाढ होऊन ४७ टक्क्यांवर पोहचला आहे.

गोदावरीला पूर , सतर्कतेचे आदेश

नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण आणि शहरातील पहिली ते बारावीच्या सगळ्या शाळा आज बंद राहणार आहे. नाशिक जिल्ह्यात रेड अलर्ट जाहीर केल्याने  प्रशासनाने  हा निर्णय घेतला आहे. गोदावरी नदीला मोसमातील पहिला पूर आल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. प्रशासनाने खबरदारीचे आदेश दिले आहेत.

दरम्यान सिंधुदुर्ग, मुंबई, सातारा, मराठवाड्याचा काही भाग आणि चंद्रपूरला ऑरेंज अलर्ट आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये आजही मुसळधार पावसाची शक्यता आहे.पुणे- पुण्यात गेल्या ६ दिवसांपासून संततधार  पाऊस पडत आहे. पुण्यात सतत पडणाऱ्या पावसाने खडकवासला धरण ७५ टक्के भरले  आहे. खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस पडतोय. धरणातून १ हजार क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग होणार आहे.

धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातही मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अक्कलपाडा धरणातून दोन हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला असून पांझरा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. तसेच  हवामान खात्याने दिलेल्या इशारा नंतर नंदुरबार जिल्ह्यातही  पावसाचा जोर कायम आहे.

गडचिरोलीत पुढचे दोन दिवस रेड अलर्ट

मुख्यमंत्र्यांकडून परिस्थितीची पाहणी करण्यात आली असून गडचिरोली जिल्ह्यात १२ आणि १३ तारखेला रेड अलर्ट जारी करण्यात आला असून पुढील ४८ तासात गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. रात्री मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी परिस्थितीची पाहणी करुन बैठक घेतली. काल पावसाचा जोर कमी झाला आहे.

औरंगाबादमध्येही जोरदार पावसाची शक्यता

औरंगाबादमध्ये कमाल तापमान २७ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २१ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. या आठवड्यात आकाश ढगाळ राहील आणि मेघगर्जनेसह मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या अखेरीस कमाल तापमान २९ आणि किमान तापमान २१ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. हवेचा दर्जा निर्देशांक ‘चांगल्या’ श्रेणीत ४ आहे.

दरम्यान, मराठवाडा आणि विदर्भात पावसानं हाहाकार घातला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यातील मुसळधार पाऊस झाल्याने  जनजीवन विस्कळीत झाले  आहे. अनेक गावांचा संपपर्क तुटला आहे. मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड तर विदर्भातील गडचिरोली, वर्धा आणि चंद्रपूर या जिल्ह्याती तुफान पाऊस झाला आहे. तसेच नाशिक जिल्ह्यात २० हून अधिक गावांचा संपर्क तुटला आहे.

नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर, अर्धापुर तालुक्यातील गणपूर, सेलगाव, कोंढा, पिंपळगाव, मुदखेड या गावांमध्ये पाणी शिरल्याने गावांचा संपर्क तुटला आहे. नांदेड शहरातील कौठा, सिडको, मुदखेड, मुखेड अर्धापूर शहरातील दुर्गानगर भागात घरात पाणी शिरले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!