Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraPoliticalUpdate : “व्हिप”च्या उल्लंघनावरून विधी मंडळ सचिवांच्या ५३ आमदारांना कारणे दाखवा नोटिसा …

Spread the love

मुंबई : राज्याच्या विधिमंडळ सचिवांनी शिवसेनेच्या ५३ आमदारांना कारण दाखवा नोटीस बजावली आहे. या ५३ आमदारांमध्ये शिंदे गटातील ३९ आणि उद्धव ठाकरेंसोबत असणाऱ्या १४ आमदारांचा समावेश आहे. दोन्ही गटांकडून एकमेकांवर विधानसभा अध्यक्ष निवडणूक आणि विश्वासदर्शक ठरावावेळी व्हीपचे  उल्लंघन करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. मात्र या नोटिसांमध्ये माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंचा उल्लेख नाही.

राज्यपालांच्या निर्देशानुसार, ३ जुलैला विधानसभा अध्यक्ष निवडणूक पार पडली, तर ४ जुलैला विश्वासदर्शक ठराव मांडण्यात आला. यावेळी शिंदे गटाने भाजपाच्या बाजूने तर उद्धव ठाकरे गटाने महाविकास आघाडीच्या बाजूने मतदान केले  होते. यानंतर दोन्ही गटांकडून व्हिपचे  उल्लंघन केल्याचा आरोप करत कारवाईची मागणी करण्यात आली होती. सर्व आमदारांना सात दिवसांत विधिमंडळात उत्तर द्यावे  लागणार आहे.

दरम्यान विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर शिंदे गटाचे मुख्य प्रतोद भरत गोगावले यांनी पक्षादेश डावलून पक्षशिस्तीचा भंग केल्याप्रकरणी १४ आमदारांवर अपात्रतेची कारवाईची करण्यात यावी अशी याचिका विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे दाखल केली होती. मात्र आमदारांच्या यादीतून आदित्य ठाकरेंचे  नाव वगळण्यात आलं होते. भरत गोगावले यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना “बाळासाहेबांचा सन्मान म्हणून आम्ही आदित्य ठाकरेंचं नाव दिलेलं नाही”, असं सांगितलं होतं.

आवाजी मतदानाने झालेल्या विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपचे राहुल नार्वेकर यांना १६४, तर शिवसेनेचे राजन साळवी यांना १०७ मते मिळाली. तीन आमदार तटस्थ राहिले. तर ४ जुलैला शिंदे गट आणि भाजपाने १६४ मते  मिळवत विश्वासदर्शक ठराव जिंकला. महाविकास आघाडीला ९९ मते मिळाली, तर तीन आमदार तटस्थ राहिले. निवडणुकीत १० आमदार गैरहजर होते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!