Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : पंढरपुरात भाविकांची प्रचंड गर्दी , मुख्यमंत्र्यांची सपत्नीक महापूजा, नवले दाम्पत्याला पूजेचा मान …

Spread the love

पंढरपूर : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात प्रथेप्रमाणे आज पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता यांच्या हस्ते सपत्नीक शासकीय महापूजा पार पडली. तर वारकऱ्यांच्यावतीने बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील रुई गावच्या मुरली नवले आणि त्यांच्या पत्नी जिजाबाई नवले यांना मान मिळाला. गेल्या २० वर्षांपासून ते वारी करत आहेत.

राज्यात आचारसंहिता सुरु असल्याने मुख्यमंत्र्यांना यावर्षी आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलाची शासकीय महापूजा करता येणार कि नाही असा प्रश्न निर्माण झाला होता परंतु आयोगाने काही अटी व शर्तींवर मुख्यमंत्र्यांना महापूजा करण्यास संमती दिली आणि हि पूजा पार पडली. शनिवारी रात्री उशिरा पंढरपूर येथे पोहोचल्यानंतर शिंदे यांनी शासकीय विश्रामगृहामध्ये आयोजित केलेल्या ‘पर्यावरणाची वारी, पंढरीच्या दारी’ या कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यानंतर पहाटे ते श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात शासकीय महापुजेसाठी उपस्थित होते.

पंढरपुरात आज विविध कार्यक्रम

दरम्यान आज दिवसभर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. सकाळी सव्वा अकरा वाजता शासकीय विश्रामगृह येथे सोलापूर जिल्ह्यातील ‘सुंदर माझे कार्यालय’ या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्यासाठी मुख्यमंत्री उपस्थित राहतील. त्यानंतर सकाळी पावणेबारा वाजता मुख्यमंत्री पंचायत समिती पंढरपूर येथे ‘स्वच्छता दिंडी’ समारोपामध्ये सहभागी होणार आहेत. तसेच दुपारी साडेबारा वाजता ते पक्ष मेळाव्यास उपस्थित राहतील.

कोण आहे नवले कुटुंबीय ?

५२ वर्षीय शेतकरी मुरली बबन नवले आणि त्यांच्या पत्नी जिजाबाई नवले (४७) हे मागील २० वर्षांपासून न चुकता पायी वारी करत आहे. गेल्या १२ वर्षांपासून ते संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसोबत पायी चालत विठुरायाच्या दर्शनाला येत आहेत. विठ्ठलाच्या भक्तीभावात तल्लीन झालेलं हे दाम्पत्य बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यातील रूई येथील रहिवासी आहे. शेती हा त्यांचा मुख्य व्यवसाय असून १९८७ पासून हे दाम्पत्य न चुकता वारी करत आहेत.

राज्यात अच्छे दिन येण्यासाठी प्रयत्न

यावेळी महापुजेनंतर बोलताना म्हणाले कि , आजचा दिवस हा माझ्या जीवनातील सर्वात महत्त्वाचा आणि आनंदाचा आहे.  आपण पंढरीचा कायापालट करणार असून त्याबाबत विशेष आराखडा तयार करण्याचे आदेशही देण्यात आलेले आहेत. राज्यातील शेतकरी, वारकरी, कष्ठकरी, कामकार, शेतमजूर, गुंतवणूकदार, उद्योजक आणि समाजातील प्रत्येक घटकाला हे वर्ष सुखाचं, आनंदाच आणि समृद्धीचं जावो, अशी प्रार्थना मी पांडूरंग चरणी करतो. कोविडचं संकट आता लवकरात लवकर जायला पाहिजे. कोरोनाची कायमस्वरुपी जाण्याची वेळ आली आहे. पांडुरंगाच्या पुण्याईने ते जाईल,राज्याचा विकास झाला पाहिजे, राज्यातील सर्वसामान्यांच्या जीवनात चांगले दिवस यावेत, असा प्रयत्न राज्यसरकारचा असेल. यामध्ये कृषी, उद्योग, शैक्षणिक, आरोग्य या सगळ्या क्षेत्रात राज्याला चांगलं यश मिळो, अशी अपेक्षा व्यक्त करतो.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!