Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraPoliticalUpdate : मोठी बातमी : विधिमंडळ सचिवालयाकडून सेनेला झटका , दोन्हीही नियुक्त्या केल्या रद्द …

Spread the love

मुंबई : विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारने विधानसभेचे अध्यक्षपद मिळवून शिवसेनेला मोठा धक्का दिला. तर रात्री विधानसभेच्या नूतन अध्यक्षांनी शिवसेनेला आणखी  एक धक्का देत शिवसेनेने नेमलेले गट नेते आणि प्रतोद यांची निवड रद्द करीत शिंदे गटाच्या नेत्यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब केले. या बदलाचे आणि आदेशाचे पत्र विधिमंडळ सचिवालयाने शिंदे यांना दिले आहे. दरम्यान विधिमंडळ सचिवालयाच्या कारवाईला आम्ही न्यायालयात आव्हान देऊ, अशी भूमिका शिवसेनेने आता घेतली आहे. या वाद – प्रतिवादाचे कायदेशीर बाण मुख्यमंत्री शिंदे गट आणि शिवसेना यांच्याकडून सुटतील अशी शक्यता आहे. 

दरम्यान उद्या होणाऱ्या विधिमंडळातील बहूमत चाचणीच्यावेळी आमच्या अधिकृत गटाने काढलेला व्हिपच शिवसेनेच्या १६ आमदारांना मान्य करावा लागेल असा इशारा आ. दीपक केसरकर यांनी आपली प्रतिक्रिया देताना दिला आहे तर जे काही व्हायचे ते कायद्याने होईल अशी प्रतिक्रिया शिवसेनेच्या अजय चौधरी यांनी दिली आहे.

विधानसभेच्या नूतन अध्यक्षांनी घेतलेल्या या निर्णयाची माहिती मिळताच शिवसेनेच्या वतीने आपली संतप्त प्रतिक्रिया देताना खा. अरविंद सावंत म्हणाले कि , या निमित्ताने संविधानाची खिल्ली उडवण्याचे काम सुरु आहे. लोकसभेच्या माजी सचिवांनी गटनेता कुणाला करायचा हा अधिकार पक्षाला असतो, असे सांगितले  होते. पण सध्या सुरु असेलले  सगळे  बेकायदेशीरपणे सुरु आहे. राज्यघटनेची पायमल्ली करण्याचं काम सुरु आहे. दरम्यान हा  देश हुकूमशाहीकडे कसा चालला आहे हे यावरून दिसून येत असल्याची टीकाही अरविंद सावंत यांनी केली. विधिमंडळ सचिवालयाच्या कारवाईला आम्ही न्यायालयात आव्हान देऊ, असेही अरविंद सांवत म्हणाले.

काय आहे विधिमंडळ सचिवालयाच्या पत्रात ?

विधिमंडळ सचिवालयाने एकनाथ शिंदे आणि भरतशेठ गोगावले यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे कि ,  दि . २२ जून रोजी विधानसभा उपाध्यक्ष यांना शिवसेनेच्यावतीने पाठवलेल्या पत्रानुसार शिवसेनेने एकनाथ शिंदे यांना पदावरुन हटवून अजय चौधरी यांची गटनेतेपदी नियुक्ती केली होती. ती रद्द करुन एकनाथ शिंदे यांची ३१ ऑक्टोबर २०१९ रोजी करण्यात आलेली गटनेते पदाची नियुक्ती कायम ठेवण्यात आली असून मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांची नियुक्ती रद्द करण्यात आली आहे. तर, भरतशेठ गोगावले यांची मुख्य प्रतोदपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे आजच  विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पक्षादेश न पाळणाऱ्या बंडखोर ३९ आमदारांविरोधात कारवाई करण्यात यावी अशी याचिका शिवसेनेने विधानसभा अध्यक्षांकडे दाखल केली आहे. पक्षाने व्हीप बजावूनही ३९ आमदारांनी पक्षादेश डावलून मतदान केले आहे. त्यासंबंधीचे  व्हिडीओ रेकॉर्ड उपलब्ध आहे. सदरील आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी केली आहे. हि बातमी प्रसिद्ध होत नाही तोच विधिमंडळ सचिवालयाचे माहिती समोर अली आहे. यामुळे शिंदे गट आणि शिवसेनेची कायदेशीर लढाई सुरूच राहणार असे एकूण चित्र आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!