Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraPoticalUpdate : शिवसेनेचे बंडखोर आमदार आज पोहोचणार मुंबईत , उद्या विधानसभा अध्यक्षाची होणार निवड

Spread the love

मुंबई : राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारला  ४ जुलै रोजी विधानसभेच्या विशेष अधिवेशनात विश्वासदर्शक पास करावा लागणार आहे. त्यापूर्वी उद्या ३ जुलै रोजी  विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात येणार असून  याचपार्श्वभूमीवर गोव्यात असणारे शिवसेनेचे सर्व बंडखोर आमदार आज मुंबईत दाखल होणार आहे. भाजपाकडून राहुल नार्वेकर तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे.


एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ गुरुवारी सायंकाळी घेतली होती. त्यानंतर २ आणि ३ जुलै रोजी विधीमंडळाचे विशेष अधिवेशन आयोजित करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. तथापि, आता हे अधिवेशन ३ आणि ४ जुलै रोजी होणार आहे. त्यामुळे सध्या गोव्यात मुक्कामी असलेले शिवसेनेचे बंडखोर आमदार आज मुंबईत येणार आहेत. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेची काळजी मुंबई सर्वत्र घेण्यात येत आहे. त्यासाठी मुंबईत जागोजागी रस्त्यावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येत आहे.

एकनाथ शिंदे यांच्यावरील कारवाई

एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमधील ३९ आमदारांनी बंडखोरी केल्याने राज्यात सत्तांतर झाले आहे. तसेच भाजपाच्या पाठिंब्याने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केले आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यावर शिवसेने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदेंविरोधात अधिकच आक्रमक भूमिका घेतली आहे. काल शिंदेंना शिवसेना नेतेपदावरून काढण्याची घोषणा करण्यात आली आहे.

शिंदे गटाकडून केसरकर यांचे उत्तर

दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या या कारवाईनंतर शिंदे गटातील शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही कायदेशीर कारवाई करणार असल्याचे  दीपक केसरकर यांनी सांगितले. शिवसेनेने  अशी कृती करायला नको होती. शिवसेनेची ही कृती लोकशाहीला शोभणारी नाही. आजही आमच्या हातात शिवबंधन आहे, असे  म्हणत दीपक केसरकर यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंना इशारा दिला आहे.

खासदारांचीही चर्चा

दरम्यान एकनाथ शिंदे गटाने  बंडखोरी करत भाजपासोबत राज्यात सरकार स्थापन केले. शिंदे गटात शिवसेनेचे तब्बल ३७ आमदार सामील झाले. आता शिवसेनेच्या १९ खासदारांपैकी १२ खासदार देखील वेगळा विचार करणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. शिवसेना खासदारांच्या एका गटाने शुक्रवारी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेऊन त्यांच्यासमोर  आपल्या भावना व्यक्त केल्या आणि एकनाथ शिंदे यांच्याशी मध्यस्थी करण्याची विनंती केल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांनी आयोजित केलेल्या बैठकीला १६ खासदार उपस्थित होते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!