Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

SharadPawarNewsUpdate : राज्यातील सत्ता बदलानंतर शरद पवारांचे शाब्दिक “हार” आणि बोचरे “वार”…

Spread the love

मुंबई : गेल्या ९-१० दिवसात शिवसेनेत जी बंडखोरीची आग लागली होती ती विझवण्यासाठी पवार आले खरे पण अनेक प्रयत्न करूनही या आगीतून ते सरकारला वाचवू शकले नाही. दरम्यान गेल्या दोन दिवसांच्या हालचालीत पवार दिसत तर होते पण काही बोलत नव्हते . आज मात्र ते बोलते झाले. आपल्या प्रयत्नाबद्दल ते म्हणाले कि , बंडखोर आमदारांना परत आणण्यासाठी मी काही करू शकलो असतो परंतु ते फार दूर गेले होते. जर हे आमदार महाराष्ट्रात कुठेतरी असले असते तर मी काहीतरी करू शकलो असतो, परंतू ते राज्याबाहेर होते. नंतर समजले कि , बंडखोर आमदार शिवसेनेत म्हणजेच ठाकरेंकडे परत येणार नाहीत. कारण त्यांच्यात जी देवाणघेवाण झालीय ती खूप मोठी आहे. 

आजच्या शपथविधी बाबत बोलताना पवार म्हणाले कि , पहिले आश्चर्य म्हणजे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. भाजपामध्ये एक आहे, दिल्लीतून आदेश असो की नागपूरहून त्यात तडजोड नसते. या आदेशात राज्याच्या मुख्यमंत्री पदाची जबाबदारी शिंदेंवर पडली, कदाचित त्याची कल्पना शिंदेंनाही नव्हती, आणि आपल्यालाही या निर्णयाचे आश्चर्य वाटले. दुसरे आश्चर्य म्हणजे, भाजपाच्या पक्ष श्रेष्ठींचा आदेश असतो तो पाळावा लागतो. देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी घ्यावी लागली. हे मोठे उदाहरण. फडणवीस मुख्यमंत्री होते, विरोधी पक्षनेते होते, असे असताना त्यांना उपमुख्यमंत्री व्हावे लागले, पण सत्ता आली की मिळेल ती संधी स्वीकारायची असते हे फडणवीसांनी दाखवून दिले, असेही पवार म्हणाले.

आरएसएसच्या संस्कारामुळे त्यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारलं…

देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल आणखी बोलताना पवार म्हणाले , मात्र नंबर दोनची जागा फडणवीसांनी आनंदाने स्वीकारली असं दिसत नाही, त्यांचा चेहरा सांगत होता, फडणवीस नाखुश होते, परंतु  नागपूरमध्ये त्यांनी आरएसएसचे स्वयंसेवक म्हणून काम केलंय, तिथे जो आदेश येईल तो पाळावा लागतो, आरएसएसच्या संस्कारामुळे फडणवीसांनी हे स्वीकारलं, दुसरं काही कारण असू शकत नाही. कदाचित फडणवीसांबाबत मुद्दामहून केले गेले असावे, असेही पवार म्हणाले. फडणवीस मुख्यमंत्री होते, विरोधी पक्षनेते होते आता उप मुख्यमंत्री झाले. पण राज्यात असे प्रकार आधीही घडले आहेत. मुख्यमंत्र्यांनी नंतर मंत्रिपदे स्वीकारली आहेत, असे सांगून पवार म्हणाले कि , याचे उदाहरणच सांगायचे तर  शंकरराव चव्हाण अर्थमंत्री होते, त्यांच्या मंत्रिमंडळात मी मंत्री होतो. जेव्हा मी मुख्यमंत्री झालो, तेव्हा शंकरराव माझ्या मंत्रिमंडळात आले. अशोकराव चव्हाण देखील मुख्यमंत्री होते, त्यांनीही या मंत्रिमंडळात  मंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारली. त्यामुळे अशी उदाहरणे महाराष्ट्रात घडलेली आहेत.

पवारांनी सांगितले मुख्यमंत्री आणि सातारा कनेक्शन

राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करताना ते म्हणाले कि , शिंदे जे मुख्यमंत्री झाले, ते ठाण्याचे आहेत. अनेक वर्षे त्यांचे ठाण्यात काम आहे. परंतु  ते मुळचे सातारचे आहेत. एक स्थानिक बाब आहे, आणि  योगायोग असा आहे की राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे साताऱ्याचे होते. मी पण मुळ कोरेगाव तालुक्याचा होतो. बाबसाहेब भोसले, पृथ्वीराज चव्हाण आणि आत्ता ज्यांनी शपध घेतली तेही  साताऱ्याचे आहेत,” असे सांगताना  पवारांनी शिंदेच्या सातारा कनेक्शनचा उल्लेख केला.

पवार पुढे बोलताना म्हणाले कि , “मी एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवर बोललो, त्यांना शुभेच्छा दिल्या. राज्याचा प्रमुख झाल्यावर तो राज्याचा प्रतिनिधी होतो, राज्याचे सर्व विभागातील लोकांचे प्रश्न सोडवण्याची कामगिरी त्यांच्याकडून व्हावी,” असे  मत बोलून दाखवले. शिवसेनेतून जे आमदार गेले त्यांची नेतृत्व बदलाची मागणी होती. एकनाथ शिंदे हे सातारचे आहेत. याआधीही चार मुख्यमंत्री साताऱ्याने पाहिले आहेत. त्यात मी देखील आहे, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले. याचबरोबर पवारांनी आजच्या या घडामोडी आश्चर्यकारक होत्या असे म्हटले.

बंडखोरी हे महाविकास आघाडीचे अपयश वाटत नाही …

एकनाथ शिंदेंच्या बंडासंदर्भात बोलताना ते म्हणाले कि , हे महाविकास आघाडीचे अपयश असल्यासारखं वाटतं नाही.  “महाविकास आघाडी म्हणून कुठे कमी पडलो नाही. एकनाथ शिंदे हे त्यांच्या लोकांना बाहेर न्यायला प्रभावी ठरले. एवढ्या लोकांना बाहेर नेण्याची हिंमत दाखवली यातच त्यांचे यश आहे,”  दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर शंका उपस्थित केली जात असल्याबद्दल विचारण्यात आले असता ते म्हणाले , “माझ्या मते त्यांच्या कामाच्या पद्धतीमध्ये एकदा विश्वास टाकला की पूर्ण जबाबादारी द्यायची असते आणि  विधीमंडळाची पुर्ण जबाबदारी ही एकनाथ शिंदे यांच्याकडे उद्धव ठाकरे यांनी दिली होती. ज्या वेळेला ३९ लोकं राज्याच्या बाहेर जातात त्यात मग दुरुस्त करायला स्कोप राहत नाही.” पवार पुढे म्हणाले कि , खरे तर  राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडण्याची तयारी आधीच पूर्ण झाली होती. त्याशिवाय अचानक सूरत, गुवाहाटी आणि आजचे सत्तांतर या गोष्टी अचानक घडत नाहीत. या सर्व गदारोळात उद्धव ठाकरे हे सत्तेला चिकटून राहिले नाहीत हे योग्य झाले.

शिवसेनेविषयी बोलताना पवार म्हणाले …

या सर्व राजकीय गदारोळात शिवसेना संपेल का, या प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी नाही असे उत्तर दिले. ते पुढे म्हणाले कि , आता उद्धव ठाकरेंची पावले काय असतील ? हे मी सांगू शकत नाही, परंतू शिवसेना संपणार नाही. पक्ष कायम असतो, आमदार पाच वर्षांचा असतो. पक्ष संघटना आणि विधीमंडळ हे दोन्ही वेगळ्या गोष्टी असतात. यामुळे शिवसेना ही उद्धव ठाकरेंचीच राहील. आमदारकी पाच वर्षांची असते, पक्ष कायम असतो, अशा शब्दांत शरद पवार यांनी शिवसेना कोणाची,याचा सोक्षमोक्ष लावला.

मला इन्कम टॅक्सचे प्रेमपत्र आलेय…

दरम्यान राज्यातील आधीच्या सत्ताधारी आघाडीतील नेत्यांची ईडी चौकशीची प्रकरणे गाजत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय धुळवड सुरु असताना त्यांना इन्कम टॅक्सची नोटीस आली असल्याचा ओझरता उल्लेख करताना ते म्हणाले कि ,  मला इन्कम टॅक्सचे प्रेमपत्र आलेय. 2004, 2009, 2014 आणि 2020 मध्ये लढविलेल्या लोकसभा-राज्यसभा निवडणुकीतील प्रतिज्ञापत्रांवरून मला नोटीस पाठविण्यात आली आहे. राज्यपालांबद्दल बोलताना ते म्हणाले कि , त्यांच्याबद्दल सहसा बोलू नये. मी १९६६ पासून सगळे राज्यपाल पाहिले. सगळ्यांनी महाराष्ट्राच्या परंपरेत भर घातली पण या राज्यपालांनी त्यामधे किती भर घातली याचा शोध घ्यावा लागेल, असा टोला शरद पवार यांनी लगावला.

शरद पवार यांनी सांगितलं स्वतःचा किस्सा …

सातत्याने चर्चा होणाऱ्या आपल्या बंडाविषयी माहिती देताना पवार म्हणाले कि , अगोदर बंड झाले होते, तेव्हा एवढी गडबड नव्हती झाली. एक दिवस आम्ही लोकांनी ठरवलं आणि वसंतदादांना आम्ही मंत्रिमंडळातून बाहेर जात आहोत असे  सांगितले. ते झाल्यानंतर वसंतदादांनी राजीनामा दिला होता. राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा शिवसेनेला संपवण्याचा कुठलाही संबंध नसल्याचे सांगून ते म्हणाले कि ,  त्यांच्याकडे सध्या बहुमत आहे. त्यामुळे बहुमत आहे, हे लक्षात आले  तर जास्त कटकटी करु नये. बहुमत गेले हे लक्षात आल्यावर उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला. माझ्या दृष्टीने ते चांगलं आहे. १९८० मध्ये माझ्या नेतृत्वात ७९ आमदार निवडून आले. निवडणूक झाल्यावर मी भारताच्या बाहेर सुट्टीला गेलो. परत आल्यानंतर माझ्यासह फक्त सहा लोक शिल्लक राहिले. मी विरोधी पक्षाचा नेता होतो. माझं पदही गेलं. पण नंतर निवडणूक झाली आणि जे मला सोडून गेले त्यांचा जवळपास सगळ्याचा पराभव झाला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!