Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

UddhavThackerayNewsUpdate : उद्धव ठाकरे यांनी दिला मुख्यमंत्रीपदासोबत आमदारकीचाही राजीनामा …

Spread the love

मुंबई : शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक शिवसेना आमदारांनी शिवसेनेच्याच मुख्यमंत्र्यांच्याच विरोधात बंड केल्याचे शल्य मनात ठेवत महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या फेसबुक लाईव्ह मध्ये मुख्यमंत्री पदाचा आणि विधानपरिषदेच्या आमदारकीचाही राजीनामा दिला.


आज दिवसभरात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावरून जाणार कि , राहणार अशी चर्चा चालू असतानाच सायंकाळी महाराष्ट्रासह  सर्व देशाचे लक्ष सर्वोच्च न्यायालयाकडे लागले होते. दरम्यान ज्या पद्धतीने  बंडखोर आमदारांचे आकडे येत होते ते लक्षात घेता महाविकास आघाडीचे सरकार पडणार हे नक्की होते परंतु अतिशय तडकाफडकी २४ तासात बहुमताची चाचणी घेण्याच्या विरोधात महाविकास आघाडी सर्वोच्च न्यायालयात गेली होती त्यामुळे या निकालाकडे सर्वांचे लक्ष होते रात्री महाविकास आघाडीच्या विरोधात निकाल गेला आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुकद्वारे जनतेसमोर येत आपल्या पदाचा राजीनामा दिला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांचा राजीनामा देखील मान्य केला आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी राज्यपालांकडे मुख्यमंत्र्यांचा राजीनामा सादर केला. त्यानंतर राज्यपालांनी तो राजीनामा लगेच मान्यही केला. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार गेल्या आठ दिवसांच्या राजकीय चढाओढीनंतर महाविकास आघाडीचे सरकार अखेर कोसळले आहे.

मला शरद पवार आणि सोनिया गांधी, काँग्रेस आणि राष्ट्रवादीतल्या सहकाऱ्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मी आदित्य, अनिल परब आणि सुभाष देसाई हे केवळ चार शिवसेनेचे मंत्री होते याचं दु:ख होतंय. नामांतराचे ठराव मांडले तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी एका शब्दाचाही विरोध केला नाही.


शिवसेना प्रमुखांनी औरंगाबादला संभाजीनगर नाव ठेवलं होतं. ते नाव आपण आज दिलं आहे. उस्मानाबादला धाराशीव हे नाव दिलं आहे. वांद्रे वसाहतीतच सरकारी कर्मचाऱ्यांना हक्काचं घर मिळावं म्हणून भूखंड मंजूर केला आहे

आपल्या फेसबुकलाइव्हमध्ये बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले कि , सगळं अनपेक्षित घडतंय. मी आलोच होतो अनपेक्षितपणे. जातोही अनपेक्षितपणे. पण मी कुठेही जात नाहीये. मी पुन्हा एकदा शिवसेना भवनात बसायला सुरुवात करणार आहे. पुन्हा शिवसैनिकांना भेटायला सुरुवात करणार आहे. पुन्हा तुम्हा सगळ्यांना सोबत घेऊन शिवसेनेची नवीन वाटचाल करणार आहे. शिवसेना तीच आहे. शिवसेना आपल्यापासून कधीही कुणी हिरावून घेऊ शकत नाही. आपण इथेच आहोत. मुख्यमंत्रीपदाप्रमाणेच विधानपरिषद सदस्यत्वाचाही राजीनामा देतो आहे

उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला

आज मी आपल्या सगळ्यांसमोर मुख्यमंत्रीपदाचा त्याग करत आहे. आजपर्यंत आपण सगळ्यांनी खूप प्रेम दिले. आशीर्वाद दिले. मी घाबरणारा नाही. पण कारण नसताना उद्या बंदोबस्तात शिवसैनिकांचे  रक्त सांडेल, त्या पापाचे धनी ज्यांना व्हायचंय, त्यांना होऊ द्या. मी नाही होणार. मी शिवसैनिकांनाही सांगेन की उद्या अजिबात त्यांच्या मध्ये येऊ नका. त्यांचा आनंद त्यांना लुटू द्या. त्यांनी शिवसेना प्रमुखांच्या मुलाला मुख्यमंत्रीपदावरून खाली उतरवले, त्याचे पेढे त्यांना खाऊ द्या. ज्यांना वाटायचे त्यांना वाटू द्या. तो गोडवा त्यांना लखलाभ. मला तुमच्या प्रेमाचा, आशीर्वादाचा गोडवा पाहिजे. हा कुणी हिरावून नाही घेऊ शकत.

ते पुढे म्हणाले कि , हे लोकशाहीचे दुर्दैव आहे की इथे डोक्याचा वापर फक्त मोजण्याच होतो की कुणाकडे किती बहुमत आहे. माझ्या विरोधात किती आहेत, यात मला रस नाही. पण एक जरी माझा माणूस उभा राहिला तर ते मला लज्जास्पद आहे. मला बहुमताचा खेळच खेळायचा नाहीये. मला प्रामाणिकपणे असे  वाटते  की ज्यांना शिवसेनेने  राजकीय जन्म दिला, शिवसेना प्रमुखांनी मोठं केलं, त्या शिवसेनाप्रमुखांच्या पुत्राला मुख्यमंत्रीपदावरून खाली खेचण्याचं पुण्य यांच्या पदरात पडत असेल तर ते पडू द्या. त्यांच्यावर विश्वास ठेवला हे पाप माझं आहे. त्याची फळं अशी भोगावी लागत असतील, तर त्यात त्यांचा काय दोष आहे. उद्या ते अभिमानानं सांगतील की बघा आम्ही शिवसेना प्रमुखांच्या पुत्राला खाली खेचलं की नाही.

मी सांगतो, उद्या कुणीही शिवसैनिकांनी यांच्या अधेमधे येऊ नये. उद्या नव्या लोकशाहीचा पाळणा हलतोय. त्यांचे पोलीस दल, इतर फोर्स, इतर देशातून सैन्य आणणार असतील, तर आणू द्या. हा सोहळा जबरदस्त झाला पाहिजे. तुमच्या मार्गात कुणीही येणार नाही. तुम्ही या आणि घ्या शपथ. तुमची नाराजी सूरतला किंवा गुवाहाटीला जाऊन सांगण्यापेक्षा वर्षावर किंवा मातोश्रीवर येऊन सांगितलं असतं, तर बोललो असतो मी. काय आहे ते समोर येऊन बोला. आजही मी तुमच्याशी आदरानं बोलतो आहे. शिवसैनिकांनी तुम्हाला एकदा आपलं मानलं होतं. तुमच्याशी वाद-लढाया काय करायच्या?

अशोक चव्हाणांनी सुचवला होता ‘हा’ पर्याय!

जे दगा देणार असं म्हटलं जात होतं, ते सोबत राहिले. आजही मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर अशोक चव्हाण म्हणाले की आपल्या लोकांचा काँग्रेस-राष्ट्रवादीला आक्षेप असेल तर आम्ही बाहेर पडतो. बाहेरून पाठिंबा देतो. पण त्यांना सांगा तुम्ही या. कालही मी आवाहन केलं होतं – उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरेंचा राज्यपालांना टोला!

आज न्यायदेवतेनं निकाल दिला आहे. तो मान्य असायलाच पाहिजे. उद्या तातडीने बहुमत चाचणी करण्याचा राज्यपालांनी आदेश दिला आहे, त्या आदेशाचं पालन करण्याचा निर्णय न्यायालयानं दिला आहे. राज्यपालांनाही धन्यवाद द्यायचं आहे की आपण लोकशाहीचा मान राखलात. काहींनी तुमच्याकडे पत्र दिल्यानंतर २४ तासांच्या आत बहुमत चाचणी करण्याचे आदेश दिले. पण दीड वर्षापासून विधानपरिषदेच्या १२ सदस्यांची यादी तुमच्याकडे प्रलंबित आहे, तीही तातडीने अजूनही मंजूर केलीत, तर आपल्याबद्दलचा आदर द्विगुणित होईल.

माणसं मोठी झाल्यानंतर ज्यांनी मोठं केलं त्यांनाच विसरली

मी शिवसेना अनुभवत आलो आहे. रिक्षावाले, टपरीवाले, हातभट्टीवाले यांना शिवसेना प्रमुखांनी चांगल्या मार्गावर आणलं. माणसं मोठी झाली आणि मोठी झाल्यानंतर ज्यांनी आपल्याला मोठं केलं, त्यांनाच विसरायला लागली. ज्यांना आजपर्यंत मोठं केलं, सत्ता आपल्याकडे आल्यानंतर जे देता येणं शक्य होतं ते सगळं दिलं, ती लोकं नाराज झालो म्हणायला लागली. मातोश्रीला सातत्याने लोक येत आहेत. साधी माणसं येत आहेत. काळजी करू नका म्हणत आहेत. ज्यांना दिलं ते नाराज, ज्यांना नाही दिलं, ते हिंमतीनं सोबत आहेत. याला म्हणतात माणुसकी. याच नात्याच्या जोरावर शिवसेना आजपर्यंत मजबूत उभी राहिली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!