Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraPoliticalCrisis : आज दुपारपर्यंत : सर्व घडामोडी एका नजरेत : मोठी बातमी : राज्यातील सत्ता संघर्षावर भाजपची दिल्लीत चर्चा , पंतप्रधानांच्या भाजप नेत्यांना महत्वाच्या सूचना …

Spread the love

मुंबई : गेल्या आठवडाभरापासून शिवसेनेच्या अंतर्गत वाद चालू असून मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर विविध आरोप करीत शिवसेनेचे पदच्यूत नेते एकनाथ शिंदे यांच्यासह महाविकास आघाडीतील ९ मंत्र्यांसह ३८ आमदारांनी सूरत मार्गे दिल्ली गाठली आहे. दरम्यानच्या काळात शिवसैनिक आणि बंडखोर आमदारांमध्ये चांगलेच शाब्दिक युद्ध रंगले आहे. प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचल्यानंतर न्यायालयाने पक्षातून काढून टाकण्याची नोटीस दिलेल्या १६ आमदारांना न्यायालयाने दिलासा दिला आहे. तरीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना परत येण्याचे आवाहन केले आहे. तर भाजपकडून राज्यातील सत्ताबदलच्या दृष्टीने दिल्लीत खलबते चालू झाली आहेत. देवेंद्र फडणवीस भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. तरीही हा गुंता महिनाभर चालेल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.


दरम्यान महाराष्ट्रातील या राजकीयनात्यात आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एन्ट्री झाली असून त्यांनी  याबाबत महाराष्ट्र भाजप नेत्यांना काही सूचना केल्या आहेत. वृत्त वाहिन्यांनी दिलेल्या  माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी  महाराष्ट्रातील राजकीय सत्ता संघर्षाच्या पार्श्वभूमीवर महाराष्तील नेत्यांनी अमित शाह आणि जे पी नड्डा यांच्याशी चर्चा करावी, अशा सूचना  केल्या आहेत. अमित शाह आणि जे पी नड्डा यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही जबाबदारी टाकली आहे. हि चर्चा यशस्वी झाल्यास एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेले बंडखोर आमदार ३० जून रोजी मुंबईत परत येऊ शकतात असे वृत्त न्यूज १८ लोकमतने दिले आहे.  मुंबईत पोहोचल्यानंतर राज्यपालांची भेट घेतल्यानंतर  फ्लोर टेस्टचीही मागणी करतील असे सांगण्यात येत आहे.

सर्वांचीची सावध पावले…

काल रात्रीपासून आज दुपारपर्यंत शिवसेनेच्या दोन्हीही बाजूनी सावकाश पावले उचलली  जात आहेत. आजही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना उद्धेशून अजूनही वेळ गेली नाही परत या असे आवाहन केले आहे आहे तर बंडखोर गटाच्या वतीने स्वतः एकनाथ शिंदे आणि दिपक केसरकर यांनी तुम्हीच विचार करा राष्ट्रवादी आणि काँग्रेसला सोडा , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत बोला आणि भाजपबरोबर सरकार स्थापन करा असे उलट उत्तर दिले आहे. दरम्यान तुमच्या संपर्कातील २०-२१ नावे  जाहीर करा आम्ही त्यांनी मुंबईला परत पाठवतो असे आव्हान एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना केले आहे.

देवेंद्र फडणवीस दिल्लीला पोहोचले  …

दरम्यान दोन्ही गटाकडून एकमेकांना दिली जाणारी आव्हाने , प्रतिआव्हाने लक्षात घेता आता पुन्हा हे सूर जुळणार नाहीत असाच एकूण रागरंग आहे. या पार्श्वभूमीवर भाजपनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुढील स्ट्रॅटेजी ठरविण्यासाठी दिल्लीत जेपी नड्डा यांच्या कार्यालयात पोहोचले आहेत. गुवाहाटीवरून एकनाथ शिंदेही दिल्लीला जाण्याची शक्यता आहे. भाजपने अद्यापही आपली अधिकृत भूमिका जाहीर केली नसली तरी आपल्या सर्व आमदारांना त्यांनी मुंबईत येण्याचे आवाहन केले आहे. आमच्याकडून सरकार पाडण्याचे कोणतेही पाऊल उचलले जाणार नाही हे सरकार त्यांच्याच पक्षातील आमदारांमुळे आपोआपच पडणार आहे त्यानंतर आम्ही सरकार स्थापन करण्यास तयार आहोत आम्हाला कोणतीही घाई नाही असे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. मात्र हालचाली तर सरकार उलथून टाकण्याच्याच चालल्या आहेत हे उघड आहे.

एका बाजूला चर्चा दुसऱ्या बाजूला कारवाई चालूच …

एका बाजूला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बंडखोर आमदारांना परत येण्याचे आवाहन करीत असले तरी दुसऱ्या बाजूला पक्षाकडून गट नेता बदलून टाकणे , पक्षातील १६ आमदारांना अपात्रतेची नोटिसा देणे , बंडखोर आमदारांचे समर्थन करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना पक्षातून काढून टाकणे अशा कारवाया पक्षाने केलेल्या आहेत त्यामुळे आता हे आमदार परतण्याची कुठलीही चिंन्हे दिसत नाहीत. दरम्यान आमच्या  सुमारे १५आमदारांचे अपहरण करण्यात आले असून त्यांना मुंबईत  परत यायचे आहे. असा दावा आदित्य ठाकरें यांनी केला असून आमदारांना भूल देऊन त्यांना गुवाहाटीला ठेवले जात असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे तर आमचे सरकार पूर्णतः स्थिर असून आम्हाला निर्णय घेण्याचा अधिकार असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

परस्पर विरोधी शक्ती प्रदर्शन , गुवाहाटीतही पोश्टरबाजी

या पार्श्वभूमीवर राज्यात शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोषाचे वातावरण असून गुवाहाटीमध्ये आणि महाराष्ट्रातही परस्पर विरोधी पोश्टर युद्ध रंगले आहे. दोन दिवसांपूर्वी गुवाहाटीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ पोश्टर लावल्यानंतर तेथील युवक काँग्रेसनेही गद्दारांना जनता माफ करणार नाही असे पोश्टर लावून शिंदे गटाला विरोध केला आहे तर इकडे महाराष्ट्रातही शिवसैनिक आणि बंडखोर आमदारांचे समर्थक एकमेकांच्या विरोधात रस्त्याला उतरले आहेत. शिवसेनेने ठाणे जिल्हा संघटक मीनाक्षी शिंदे यांची पक्षातून हकालपट्टी केली असल्याचे पत्र  शिवसेनेचे सचिव खा. विनायक राऊत यांनी प्रसिद्धीस दिले आहे. आतापर्यन्त ठाण्यातील तीन पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे  त्यामुळे वातावरण अधिकच तणावपूर्ण बनले आहे. दरम्यान बंडखोर आमदारांना राज्य सरकारने संपूर्ण संरक्षण देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेअसून त्या आधीच गृहमंत्री अमित शहा यांनीही १६ आमदारांना वाय + सुरक्षा प्रदान केली आहे.

खासदार संजय राऊत यांच्या चौकशीचे काय झाले ?

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ईडीने सोमवारी समन्स सध्या अलिबाग येथे आहेत. त्यांना आज ईडीने चौकशीसाठी हजर राहाण्याचे आदेश दिले होते. पत्रा चाळ जमीन घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांना ईडीने समन्स बजावले आहे. यापूर्वी ईडीने त्यांच्या काही मालमत्ता जप्त केल्या होत्या. मात्र, आज अलिबागमधील आपल्या आयोजित सभेमुळे संजय राऊत या चौकशीला हजर राहू शकले नाहीत.

संजय राऊत यांचे वकील वेळ मागण्यासाठी ईडीच्या कार्यालयात गेले होते. कार्यालयातून बाहेर आल्यावर त्यांनी याबाबतची माहिती दिली. संजय राऊत यांचे वकील विकास यांनी म्हटले आहे की, ईडीने काल संजय राऊत यांना समन्स बजावलं होतं. मात्र, ते संजय राऊत यांना खूप उशिराने मिळालं. ईडीने काही कागदपत्रही मागवले होते. मात्र, इतक्या कमी वेळात ही कागदपत्र जमा करणं कठीण होते . त्यामुळे आम्ही ईडीकडे वेळ मागितला. यासाठी ईडीने वेळ वाढवून दिला असल्याचंही त्यांनी सांगितले. समोर आलेल्या माहितीनुसार आता ईडीने संजय राऊत यांना १ जुलैला चौकशीसाठी बोलावले आहे.

देवेंद्र फडणीस यांना पुन्हा राऊत यांचा सल्ला

दरम्यान शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिष्ठा लक्षात घेता बंडखोर आमदारांच्या डबक्यात पडू नये आणि यात लक्ष घालू नये असा इशारा दिला आहे. देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते आहेत. त्यांच्याकडे ११६ आमदारांचे  बळ आहे. इतका मोठा विरोधी पक्ष महाराष्ट्रात कधी निर्माण झाला नव्हता. हा विरोधी पक्ष विधायक काम करू शकतो ही आमची भूमिका आहे. फडणवीसांनी मुख्यमंत्रीपद सांभाळले आहे. पण त्यांनी सध्या जे इथे डबके झाले आहे, त्यात उतरू नये. त्यांची अप्रतिष्ठा आहे असे  माझे  त्यांना मित्र म्हणून सांगणे आहे. दरम्यान  एकनाथ शिंदे अजूनही आमचे सहकारी आहेत. पक्षाच्या कार्यकारिणीमध्ये आहेत. ते अजूनही मुंबईत येऊ शकतात. त्यांच्याविषयी माझ्या मनात व्यक्तिगत कटुता असण्याचे  कारण नाही. त्यांनी कुठेही जावे असेही राऊत यांनी म्हटले आहे.

एकनाथ शिंदे यांच्याकडे बहुमत नसल्याचा सुप्रिया सुळे यांचा दावा…

राष्ट्रवादीच्या नेत्या खा. सुप्रिया सुळे महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना म्हटले आहे कि , एकनाथ शिंदे यांच्याकडे बहुमताचा  १४४ चा आकडा नाही. त्यांच्याकडे फक्त ५० आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे बहुमत आहे असे म्हणता येणार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मला अभिमान आहे. आज बाळासाहेबांच्या अनुपस्थितीत त्यांनी (उद्धव) आपल्या आमदारांना एक संवेदनशील आवाहन केले आहे…मी काही ज्योतिषी नाही, पण मला वाटतं की, कुटुंबातील कोणी निघून गेले असेल तर त्यांना परत आणण्यासाठी संपूर्ण कुटुंबाने प्रयत्न करावेत आणि त्यांचे तसे प्रयत्न चालू आहेत.

जे राष्ट्रवादीच्या विरोधात बोलतात (एकनाथ शिंदे गटातील) ते एकेकाळी राष्ट्रवादीत होते. दीपक भाऊ राष्ट्रवादीत होते, तर उदय सामंत पक्षाच्या युवा शाखेत होते. मला वाईट वाटते की त्यांनी राष्ट्रवादी सोडली तेव्हा आम्ही त्यांना वाईट शब्दही बोललो नाही, पण आता ते आम्हाला टार्गेट करत आहेत असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!