Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Maharashtra Political Crisis : दुपारपर्यंतच्या घडामोडी : एक नजर : राज्याच्या सत्ता संघर्षात अमित शहा यांची एन्ट्री , फडणवीस, पवार दिल्लीला …

Spread the love

मुंबई : गेल्या पाच दिवसांपासून राज्याच्या राजकारणात शिवसेनेचे पदच्यूत गट नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी तब्बल ५० हून अधिक आमदारांना आपल्या सोबत घेत सूरत मार्गे गुवाहाटीला जाऊन मुक्काम ठोकला आहे. या गटाचे काय करायचे याविषयी भाजपमध्ये खलबते चालू असून त्यासाठी आज भाजपनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या राज्यातील नेत्यांशी चर्चा करून दिल्लीकडे प्रयाण केले आहे . शिवाय बंडखोर आमदारांवरील शिवसैनिकांचे वाढते हल्ले लक्षात घेऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी १५ बंडखोर आमदारांना तडकाफडकी केंद्राचे संरक्षण दिले आहे.


ताज्या माहितीनुसार महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री गुवाहाटी येथे एकनाथ शिंदे गटात सामील झाले. शिंदे छावणीत सहभागी होणारे ते 8 वे मंत्री असल्याचे वृत्त एएनआय ने दिले आहे.

दुसरीकडे पक्षांतर्गत बंडामुळे अस्वस्थ झालेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आणि शिवसेनेच्या शिडात राज्याचे ज्येष्ठ राजकीय नेते , राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी आत्मविश्वासाची हवा भरल्यामुळे आमदार गेले तर जाऊ द्या पार्टीवरील पकड मजबूत ठेवा आणि बंडखोरांवरील दबावही वाढवत राहा असा सल्ला दिल्यामुळे शिवसेना ऍक्टिव्ह मोड मध्ये आली आहे. यातून कसा मार्ग काढता येईल ? यावर काँग्रेस -राष्ट्रवादीच्या नेत्यांशी आपल्या “सिल्व्हर ओक ” बंगल्यावर चर्चा करून पवार राष्ट्रपती निवडणुकीच्या कार्यात भाग घेण्यासाठी दिल्लीला रवाना झाले आहेत.

या सर्व पार्श्वभूमीवर कायद्यातील तरतुदींचा वापर करून या संकटावर काय मार्ग काढता येईल ? या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचे कार्य सध्या महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सुरु आहे. दुसरीकडे पक्षीय पातळीवरून बंडखोरांवर दबाव आणण्यासाठी शिवसेनेचे खा. संजय राऊत आणि आदित्य ठाकरे प्रयत्न करीत आहेत.

मुख्यमंत्र्यांचा कायदेशीर कारवाईवर अधिक भर

दरम्यानच्या काळात शिवसेनेतील या बंडामुळे अस्वथ झालेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ” हवे तर मुख्यमंत्री पद सोडतो , समोर या आणि बोला..” अशी साद बंडखोरांना घालण्याचा प्रयत्न केला परंतु भावनेच्या पलीकडे गेलेल्या बंडखोरांनी आपली बंडाची मूठ अधिक मजबूत केली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी तडकाफडकी गटनेते पदावरून एकनाथ शिंदे यांची हकालपट्टी करीत आधी १२ आणि नंतर ४ अशा १६ आमदारांना अपात्रतेची नोटीस पाठवली आहे. पण तरीही बंडखोर आपल्या मतांवर ठाम असल्याचे चित्र आता स्पष्ट झाले आहे.

या बंडखोर आमदारांना तत्काळ संरक्षण

दरम्यान या बंडखोरीमुळे संतप्त झालेले शिवसैनिक बंडखोर आमदारांच्या कार्यालयाची तोडफोड करीत आहेत. हि सर्व परिस्थिती लक्षात घेता बंडखोर १५ आमदारांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी वाय + दर्जाचे संरक्षण दिले आहे त्यामुळे महाराष्ट्रातील सत्ता संघर्षात आता भाजपने उडी घेतल्याचे दिसत आहे. अमित शाहांनी १५ आमदारांच्या निवासस्थानांना संरक्षण पुरवलं आहे. आमदारांच्या घराबाहेर सीआरपीएफची तुकडी तैनात करण्यात आली आहे. आमदार सदा सरवणकर, रमेश बोरनारे, मंगेश कुडाळकर, संजय शिरसाट, लताबाई सोनावणे, प्रकाश सुर्वेसह आणखी ९ जणांच्या घराबाहेर सीआरपीएफचा बंदोबस्त पाहायला मिळत आहे.

खा. संजय राऊत यांचे बंडखोरांना इशारे …

ज्याने बाळासाहेब ठाकरेंची गद्दारी केली, तो संपला, बाळासाहेबांचे श्राप लागले. एका बापाचे असाल तर ४० जणांनी राजीनामा द्या निवडणुकीला सामोर जा. शिवसेनेला बंड नवीन नाही. गुलाब पाटलांची भाषण पाहिली तर शिवसेनेत हाच असा दिसला. तुझ्या मायला ढुंगणाला पाय लावून पळाला. पुन्हा तुला पानटपरीवर बसवू. माझा शब्द कधी खोटा ठरणार नाही. संदीपान भुमरे हा वॉचमेन होता, त्याला मुंबई माहिती नव्हती. हॉटेलमध्ये वडा सांबार खाता येत नव्हता. आज त्याला मंत्री बनवले.  प्रकाश सुर्वे भाजी विकत होता त्याला पुन्हा भाजी विकायला लावू अशी विधाने राऊत यांनी केली.

राऊत यांचे खळबळजनक विधान …

दहिसर येथील मेळाव्यात अधिक आक्रमक होत बोलताना संजय राऊत यांनी , मी हे संकट मानत नाही. शिवसेना ताकदीने पुढे नेऊ. यापुढे कोणावर विश्वास ठेवायचा आणि कुणाच्या पालख्या वाहायच्या हे आपल्याला ठरवावं लागेल. प्रकाश सुर्वे पुन्हा विधानसभेत दिसणार नाही. ४० आमदारांचे मृतदेह गुवाहाटीतून येतील त्यांना थेट शवागृहात पोस्टमोर्टमसाठी पाठवू. कामाख्या देवीसाठी ४० रेडे पाठवले आहेत. बळी द्या असे खळबळजनक विधान केले आहे.

बंडखोर आमदार केसरकर यांचे प्रत्यूत्तर

दुसरीकडे एकनाथ शिंदे गुवाहटी येथून बंडखोरांचे नेतृत्व करत आहेत. शिंदे गटाकडून गुवाहटीत बैठका घेतल्या जात आहेत. बंडखोर आमदारांनी आपल्याबाबतचे निर्णय घेण्याचे सर्वाधिकार एकनाथ शिंदे यांना दिले आहेत. तर  बंडखोरांच्या वतीने बाजू मांडण्यासाठी आमदार दीपक केसरकर यांना जबाबदारी दिली आहे. दरम्यान  माध्यमांना प्रतिक्रिया देणे  टाळणारे बंडखोर आमदारही आता माध्यमांशी बोलताना दिसत आहेत. शिंदे गटाकडून दररोज काही बंडखोर आमदारांचे व्हिडीओ देखील प्रसारित केले जात आहेत. यात हे आमदार आपली बाजू मांडत महाविकासआघाडीतील काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षावर सडकून टीका करत आहेत.

राज्यपाल भगतसिंग राजभवनावर परतले …

कोरोनाग्रस्त असलेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी तंदुरुस्त होऊन आजच राजभवनात परतले आहेत. गेल्या आठवड्यात ते कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. रिलायन्स हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. कोश्यारी रूग्णालयात दाखल झाले असताना त्यांच्या कामाचा पदभार गोव्याच्या राज्यपालांकडे देण्यात येणार असल्याचे वृत्त होते. परंतु, राज्यपाल कोश्यारींचा कार्यभार इतर कोणाकडेही दिला जाणार नाही असे राजभवनाकडून स्पष्ट करण्यात आले होते. आता कोविडमधून पूर्णपणे तंदुरूस्त होऊन राज्यपाल कोश्यारी रूग्णालयातून डिस्चार्ज घेऊन आजच राजभवनात परतले असून  आता त्यांची प्रकृती चांगली झाली असल्याचे सांगण्यात आले आहे.

एमआयएम प्रमुख खा. असदुद्दीन ओवेसी यांची प्रतिक्रिया

दरम्यान, याविषयी बोलताना खा. असदुद्दीन ओवेसी यांनी राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केले . “मला त्यांच्याबाबतीत काहीही बोलायचे नाही. हा महाविकास आघाडीचा हा अंतर्गत मुद्दा आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात आमची मोठी भूमिका असेल. पण या मुद्द्यामध्ये ते पाहून घेतील काय करायचं ते. संजय राऊत शिवसैनिक रस्त्यावर येतील म्हणत असतील तर ते बघतील. महाविकास आघाडी बघेल त्याचं काय करायचं ते. आम्हाला काय करायचंय त्यात. मी त्यात विनाकारण माझा हात का घालू?” असं ओवेसी म्हणाले.

“आम्ही परिस्थितीवर नजर ठेवून आहोत. सध्या तिथे माकडांचा खेळ सुरू आहे. एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उड्या मारत आहेत. कुणी या झाडावर आहे, कुणी दुसऱ्या झाडावर जात आहे. आम्ही बघतोय हा सगळा तमाशा”, अशा शब्दांत ओवेसींनी खोचक टोला लगावला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!