Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Maharashtra Political Crisis : हिंमत असेल तर स्वत:च्या बापाच्या नावाने मतं मागा, उद्धव ठाकरे यांचे बंडखोरांना आव्हान

Spread the love

मुंबई : आता पुढे मते मागायची आहेत तर आपल्या बापांच्या  नावे मागा , बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेच्या नावाने नव्हे असा इशारा शिवसेनेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोर गटाचे नेते एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या आमदारांना दिला आहे. दरम्यान, महाराष्ट्राची राजकीय लढाई आता निवडणूक आयोगापर्यंत पोहोचली असून शिंदे गटाला ‘बाळासाहेब’ आणि ‘शिवसेना’ या नावांचा वापर करता येणार नाही, असा आक्षेप शिवसेनेच्या वतीने निवडणूक आयोगात नोंदवला आहे.


या सर्व पार्श्वभूमीवर आज शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना उद्देशून भाषण करताना त्यांनी बंडखोर शिवसेना आमदारांना आणि एकनाथ शिंदे यांनाही स्पष्ट शब्दात सुनावले आहे. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी त्यांची पक्षप्रमुख पदावर निवड झाली तेव्हाची आठवण सांगितली. तेव्हा पक्षांतर्गत नाराजीविषयी बोलताना बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली भूमिका त्यांनी सांगितली. “मी बाळासाहेबांना म्हणालो हे सगळे काय करतायत ते तुम्ही तरी थांबवा. ते मला म्हणाले मी मध्ये नाही पडणार. त्यांचा निर्णय त्यांना घेऊ दे. मग शेवटी तो ठराव मंजूर झाल्यानंतर शिवसेना प्रमुखांनी सगळ्यांना विचारलं होतं की हे जे सगळं केलंय, ते तुम्हाला मान्य आहे का?” असं उद्धव ठाकरे म्हणाले.

बंडखोरांना खडे बोल सुनावताना ठाकरे पुढे म्हणाले कि , “काय तुमचं कर्तृत्व? हिंमत असेल तर स्वत:च्या बापाच्या नावाने मतं मागा”,  “आधी नाथ होते, आता दास झाले. बंडखोरांनी काय निर्णय घ्यायचा त्यांचा निर्णय त्यांनी घ्यावा. बाळासाहेबांचं नाव दुसऱ्यांना वापरता येणार नाही. शिवसेना निखारा आहे. पाय ठेवाल तर जळून जाल”, असं देखील उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

“शिवसेनाप्रमुखांपेक्षा माझ्यावर काकणभर जास्त प्रेम”

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापेक्षा आपल्यावर शिवसेना कार्यकर्त्यांचं काकणभर जास्तच प्रेम आहे, असे सांगून ते म्हणाले कि , “शिवसेना प्रमुखांचा पुत्र म्हणून अनेकांना मी सांगतो. तुम्ही हसाल. पण जर शिवसैनिकांना विचारलं तर तो शिवसैनिक शिवसेनाप्रमुखांपेक्षा माझ्यावर काकणभर जास्तच प्रेम करत असेल. कारण केवळ मी त्यांचा मुलगा आहे म्हणून”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत झालेले ५ ठराव

१. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर कार्यकारणीचा पूर्ण विश्वास आहे. पक्षात निर्णय घेण्याचे सर्वाधिकार हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आहेत.
२. शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे सर्व अधिकार राष्ट्रीय कार्यकारिणी पक्षप्रमुखांना देत आहे.
३. बाळासाहेब ठाकरे व शिवसेना हे नाव कुणालाही वापरता येणार नाही.
४. शिवसेना बाळासाहेब ठाकरे याची होती, आहे आणि कायम राहील.
५. शिवसेनेची मराठी अस्मितेशी व हिंदुत्वाशी बांधिलकी कायम राहील.

घटनातज्ज्ञ श्रीहरी अणे यांची प्रतिक्रिया

दरम्यान बंडखोर आमदारांची अपात्रता कायदेशीर युक्तिवादावर आधारित असेल. आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेण्यापूर्वी उपसभापतींना त्यांची (बंडखोर आमदार आणि शिवसेना) सुनावणी द्यावी लागेल अशी प्रतिक्रिया महाराष्ट्राचे माजी महाधिवक्ता आणि घटनातज्ज्ञ श्रीहरी अणे यांनी दिली आहे.

त्यांनी पुढे म्हटले आहे कि , घटनात्मक यंत्रणा बिघडल्यास राज्यपाल हस्तक्षेप करू शकतात. महाराष्ट्रात आजवर तशी परिस्थिती आलेली नाही. गुवाहाटी आणि मुंबईतील दोन्ही गटांकडून प्राप्त झालेल्या विनंती पत्रांच्या स्वरूपावर उपसभापती न्यायालय म्हणून काम करू शकतात. दरम्यान हे प्रकरण केवळ विधिमंडळातच संपणार नाही, तर न्यायपालिकेपर्यंत जाईल. अशा बाबी उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयात विशेष आधारावर आणल्या जातात. न्यायिक पुनर्विलोकनाची मागणी बंडखोरांकडून केली जाऊ शकते.

आसाममधील गुवाहाटी येथील रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे गटाची बैठक सुरू आहे. या बैठकीत पुढील कार्यवाहीबाबत चर्चा करण्यात आली.

शिवसेना कार्यकर्त्यांनी पक्षाच्या बंडखोर आमदारांच्या विरोधात निदर्शने करत खारघरमधील पक्ष कार्यालयाबाहेर पुतळे जाळले असल्याचे वृत्त आहे.

माझं काय चुकलं?

गुवाहाटीत शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी आपल्या सोबत असणाऱ्या आमदारांची बैठक सुरु केली आहे. दरम्यान माझं काय चुकलं ? या शिर्षकाखाली एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थकांनी उद्धव ठाकरेंवर प्रश्नांची सरबत्ती केली आहे. त्यात एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केलेले सवाल पुढील प्रमाणे आहेत.

– ४० वर्ष दिवस-रात्र कुटुंबाची पर्वा न करता तुमच्या चरणी वाहिली…. – माझं काय चुकलं?
– माझ्या खात्याच्या बदल्या करताना, निर्णय घेताना मला डावललं गेलं, तरीही मी गप्प राहिलो – माझं काय चुकलं?
– आपल्या लेखांमधून आणि टीव्हीवर एक व्यक्ती रोज पक्षाबद्दल तिरस्कार वाढवतेय, याबद्दल पक्षाला सावध केले – माझं काय चुकलं?
– कोरोनाच्या काळात पीपीई किट घालून रुग्णांसाठी शक्य होईल तितकी मदत करत राहिलो आणि शिवसेनेची शिकवण जपत राहिलो – माझं काय चुकलं?
– शिवसंपर्क अभियानात समोर झालेली पक्षाची वाताहत तुमच्यापर्यंत पोहोचवली – माझं काय चुकलं?

– पालघरमध्ये साधूंचं हत्याकांड झालं, त्यामुळे आपल्या हिंदुत्वाच्या प्रतिमेला तडा गेला. आपलं मौन पाहून मी सुद्धा गप्प राहिलो – माझं काय चुकलं?
– आपल्या  आमदारांना निधी मिळत नाही, त्यामुळे विकासकामे रखडली आहेत, म्हणून तुम्हाला सावध करत राहिलो – माझं काय चुकलं?
असे सवाल एकनाथ शिंदे यांच्या पोस्टरच्या माध्यमातून त्यांच्या समर्थकांनी विचारले आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!