Maharashtra : राज्यातील सत्ता संघर्ष : सरकार आता अॅक्शन मोडवर, बागी आमदारांवर निलंबनाची तलवार!!

मुंबई : गेल्या पाच दिवसांपासून महाराष्ट्रात भूकंप घडविणाऱ्या शिवसेनेच्या १६ बंडखोर आमदारांवर निलंबनाच्या कारवाईची करण्याच्या आक्षण मोडवर सरकार आले असून त्याबाबतची कायदेशीर चर्चा जाण्यासाठी राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांच्याशी विधी मंडळाचे उपसभापती नरहरी झिरवळ यांनी निमंत्रित केले होते. त्यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर त्या १६ बंडखोर आमदारांना निलंबनाची नोटीस दिली जय शकते ज्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी शिवसेना पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. उद्या हि नोटीस पाठवण्याची शक्यता असून सोमवार दि. २७ रोजी त्यावर सुनावणी होऊ शकते अशी माहिती असल्याचे वृत्त आहे.
विशेष म्हणजे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे गट आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील समेटाच्या सर्व आशा संपुष्टात आल्या आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अपात्रता प्रकरणी महाराष्ट्राचे उपसभापती बंडखोर गटाच्या १६ आमदारांना नोटीस पाठवू शकतात. या आमदारांना मुंबईत यावे लागणार आहे.अपात्रता प्रकरणाची सुनावणी सोमवारी होऊ शकते आणि त्यासाठी बंडखोरांना मुंबईत हजर राहावे लागणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले.
Maharashtra Deputy Speaker Narhari Zirwal is likely to send notices to 16 Shiv Sena rebel MLAs tomorrow for a hearing on the petition filed by Shiv Sena for their suspension. The hearing may take place on Monday, 27th June: Sources
— ANI (@ANI) June 24, 2022
एकीकडे महाराष्ट्रातील या राजकीय घडामोडीदरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार आणि इतर राष्ट्रवादीच्या इतर प्रमुख नेत्यांनी आज मातोश्री या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्याशी चर्चा केली. तर दुसरीकडे शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटातील शिवसेना आमदारांची संख्या वाढतच आहे. शिवसेनेचे आणखी एक आमदार गुवाहाटीला पोहोचले असून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बंडखोर गटात ते सामील झाल्याची बातमी आहे. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समर्थक आमदारांच्या बैठकीत एकनाथ शिंदे यांची ५ दिवसांपूर्वीच गटनेतेपदावरून हकालपट्टी केली. त्यानंतर आता शिंदे गटाने विधानसभा उपाध्यक्षांना पत्र पाठवून गटनेतेपदी एकनाथ शिंदे यांच्या नियुक्तीचे पत्र दिले आहे. तसेच गुवाहाटीतून आमदारांच्या पाठिंब्याचे फोटो, व्हिडीओ, पत्र जारी केले. यावर महाविकासआघाडीतील ज्येष्ठ नेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आक्रमक होत शिंदे गटाला बहुमत गुवाहटीतून नाही, तर मुंबईत येऊन विधीमंडळात सिद्ध करावे लागेल, असे सांगत सूचक इशारा दिला आहे.
झिरवळ यांच्यावरच अविश्वास ठराव
एकीकडे विधी मंडळाची हि कारवाई सुरु होत असताना दुसरीकडे बंडखोर आमदार आणि मंत्री एकनाथ शिंदे गटाने थेट विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याविरोधात अविश्वासाचा ठराव सादर केला आहे. त्यामुळे आता झिरवळ यांना आमदारांना अपात्र ठरवण्याचा किंवा कारवाई करण्याचा अधिकार राहात नाही, असा दावा करण्यात आला आहे. तर, एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर लगेचच त्यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई करण्यात आली. गटनेतेपदावरून त्यांची उचलबांगडी करून अजय चौधरी यांना गटनेता म्हणून नियुक्त करण्यात आले. यावरही एकनाथ शिंदे यांनी आक्षेप घेतला आहे.
१६ आमदारांना अपात्र ठरवण्यासंदर्भात नोटिसा बजावरणार?
दरम्यान शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी शिवसेनेच्या १६ बंडखोर उमेदवारांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. याच १६ बंडखोर आमदारांना अपात्रतेच्या कारवाईसाठी नोटिसा बजावल्या जाऊ शकतात. यासंदर्भात राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांच्याशी सल्लामसलत करण्यात आली. यासंदर्भात कारवाई करायची असेल, तर त्याचे स्वरुप कसे असेल, यावर चर्चा करण्यासाठी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास विधिमंडळात दाखल झाले होते. त्यांच्यासह शिवसेनेचे नेते अनिल देसाई, अरविंद सावंत, सुनील प्रभू हेही विधिमंडळात हजर होते. तब्बल तीन ते चार तासांच्या चर्चेनंतर आता या १६ आमदारांना नोटिसा बजावण्यात येऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. यासंदर्भात कायद्याची बाजू समजून घेण्यासाठी महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांच्याशी प्रदीर्घ चर्चा झाल्याचे वृत्त आहे.
आपली बाजू मांडण्यासाठी वेळ देणार?
शिवसेनेच्या या १६ आमदारांना नोटिसा बजावल्यानंतर आपली बाजू मांडण्यासाठी वेळ देण्यात येणार आहे. या आमदारांना एकतर विधिमंडळात येऊन किंवा ऑनलाइन पद्धतीने आपले म्हणणे मांडायची संधी दिली जाऊ शकते, असे सांगितले जात आहे. दुसरीकडे, शिंदे गटाने एक पत्र नरहरी झिरवळ यांना देत पक्षाचे प्रतोद म्हणून भरत गोगावले यांनी एकमताने निवड करण्यात आल्याचे म्हटले आहे. या पत्रावर ३७ आमदारांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
दरम्यान, शिवसेनेकडून शिस्तभंगाची कारवाई करण्यात आलेल्या बंडखोर आमदारांमध्ये, एकनाथ शिंदे, अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे, प्रकाश सुर्वे, तानाजी सावंत, महेश शिंदे, अनिल बाबर, यामिनी जाधव, संजय शिरसाट, भरत गोगावले, बालाजी किणीकर, लता सोनावणे, सदा सरवणकर, प्रकाश आबिटकर, संजय रायमूलकर, रमेश बोरनारे यांचा समावेश आहे.