Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

ED ActionNewsUpdate : ईडीच्या कारवाईत अर्जून खोतकरांशी संबंधित ७८ कोटींची मालमत्ता जप्त

Spread the love

जालना / औरंगाबाद :  एकीकडे महाराष्ट्रात राजकीय वादळ घोंगावत असताना दुसरीकडे ईडीची कारवाई शांतपणे असल्याचे वृत्त आज जालन्याहून आले आहे. या वृत्तानुसार शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्यावर सक्तवसुली संचालनालय अर्थान ईडीने मोठी कारवाई केली आहे. खोतकर संचालक असलेल्या जालना सहकारी साखर कारखान्याची जमीन ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. ७८ कोटी रु.ची हि मालमत्ता असल्याची माहिती प्रवर्तन निदेशालयाच्या अधिकाऱ्याने “महानायक” शी बोलतांना दिली.


या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार , जालन्यातील सहकारी साखर कारखाना बनावट ग्राहक आणि खरेदीदार असे स्वता: अर्जून खोतकर यांनी उभे केल्याचे प्रवर्तन निदेशालया  च्या तपासात उघड झाल्यामुळे हि कारवाई करण्यात आली आहे. हा कारखाना ८७ कोटी रु.ना खरेदी करुन ४४ कोटी रु.ना विक्री केल्याचे सुत्रांनी सांगितले. विशेष म्हणजे  महावितरणच्या संचालकपदीही अर्जून खोतकर होते. हा सगळा घटनाक्रम तपासण्यात येत आहेच.आज सकाळीच ईडी चे पथक विमानाने औरंगाबादेत येऊन जालन्यात दाखल झाले होते. दुपारी तीन च्या दरम्यान मालमत्तेवर टाच आणण्याची कारवाई पूर्ण झाली.

या जप्तीमध्ये जालना सहकारी साखर कारखान्याची जमीन, कारखान्याची इमारत, प्लांट आणि कारखान्याच्या यंत्रसामग्रीचा समावेश आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने सहकारी साखर कारखान्यांच्या बेकायदेशीर लिलावाशी संबंधित प्रकरणात पीएमएलए अंतर्गत ही कारवाई करण्यात आल्याची माहितीही  ईडीकडून देण्यात आली आहे.

दरम्यान गेल्या दोन महिन्यांपूर्वी ईडीने जालन्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून या साखर कारखान्यावर निर्बंध लावण्याचे आदेश ईडीने दिले होते. या कारखान्याचा वापर विक्री आणि व्यवहार करण्यावर निर्बंध घालण्यात आले होते. गेल्या अनेक दिवसांपासून ईडी या प्रकरणाची चौकशी करत आहे. रामनगर साखर कारखाना गैरव्यवहार प्रकरणीत अर्जुन खोतकर यांची ईडी चौकशी करत आहे. याच कारवाई अंतर्गत आज ईडीने हि जप्तीची कारवाई केली.

या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने २६ ऑगस्ट २०१९ रोजी नोंदवलेल्या एफआयआरच्या आधारे ईडीने पीएमएलए अंतर्गत तपास सुरू केला आहे. हा एफआयआर मुंबई उच्च न्यायालयाच्या २२ ऑगस्ट २०१९ च्या आदेशानुसार नोंदविण्यात आला होता.

काय आहे प्रकरण ?

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी जालन्यातील रामनगर साखर कारखाना खरेदी प्रकरणी शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्यावर १०० कोटीच्या  घोटाळ्याचा गंभीर आरोप केला आहे. सोमय्यांनी आरोप केल्यानंतर २६ नोव्हेंबर २०१९रोजी ईडीचे  एक पथक खोतकर यांच्या घरावर दाखल झाले  होते.  त्यांनी रामनगर साखर कारखाना खरेदी प्रकरणी खोतकरांची कसून चौकशी केली होती. विशेष म्हणजे ईडीच्या अधिकाऱ्यांनी खोतकरांची सलग १२ तास चौकशी केली. पण १२ तासांच्या चौकशीनंतरही ईडीच्या अधिकाऱ्यांचे  समाधान झाले  नव्हते . त्यामुळे त्यांनी पुन्हा जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत छापा टाकत कागदपत्रांची पडताळणी केली होती.

सोमय्या यांनी , अर्जुन खोतकर यांनीच जालना सहकारी साखर कारखाना हा बेनामी खरेदी केल्याचा आरोप केला होता. तसेच “अर्जुन खोतकर यांनी साखर कारखान्यात घोटाळा तर केलाच पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कृपेने याच कारखान्याशी संबंधित १०० एकर शासकीय जागा गिळंकृत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. असे अनेक आरोप सोमय्या यांनी केले आहेत.

अर्जुन खोतकर सध्या कुठे आहेत ?

राज्यात मोठा राजकीय संघर्ष चालू असताना अचानक ईडी कडून झालेल्या या जप्तीच्या कारवाईमुळे एकच खळबल माजली असून खोतकर सध्याला मुंबईला आहेत. या कारवाई बाबत आम्हाला काही माहीत नाही, संस्थेला अधिकार आहेत कारवाईचे त्यांनी कारवाई केली. आम्ही यासंदर्भात न्यायालयात दाद मागू, अशा कोणत्याही कारवाईला आणि दबावाला आपण घाबरणार नाही, असेही खोतकर यांनी म्हटले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!