Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraPoliticalUpdate : महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष : शरद पवार मैदानात, आज दिवसभरात काय घडले ?

Spread the love

मुंबई : मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे सध्या आजारी असल्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार महाविकास आघाडीच्या वतीने मैदानात उतरले असल्याने भाजपचे धाबे दणाणले असल्याचे चित्र आहे. पवार यांनी अजित पवार यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नुकतीच भेट घेतली असून हि बैठक संपली आहे.दरम्यान, एकीकडे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बंडखोर गटात सामील होण्यासाठी शिवसेनेचे आणखी एक आमदार गुवाहाटीला पोहोचल्याचे वृत्त आहे. पक्षावरील शिंदे गटाची पकड मजबूत होत आहे. तर दुसरीकडे कायदेशीर बाबी तपासण्यासाठी राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी विधी मंडळाच्या सचिवालयात दाखल झाले असल्याचे वृत्त आहे. 


शरद पवार मैदानात …

दरम्यान शिवसेना बागी आमदारांच्या विरोधात राज्यात शिवसैनिकांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला असून पोलिसांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. ठिक  ठिकाणी बागी उमेदवारांच्या पोस्टरला पेटवून देण्यात येत आहेत. महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या राजकीय पेचप्रसंगाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची उद्या दुपारी १ वाजता बैठक आयोजित करण्यात आली आहे. सेना भवनात ही बैठक होणार आहे.

आज दिवसभरात महाराष्ट्रातील राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी पक्षाच्या जिल्हाप्रमुखांच्या बैठकीत पुन्हा एकदा भावनिक भाषण केले. शिवसेनेतील गदारोळावर बोलताना ते म्हणाले की, तुम्ही झाडाची फुले, फळे, डहाळे घेऊ शकता पण मुळे तोडू शकत नाही. एकनाथ शिंदेंसाठी मी काय नाही केले. नगरविकास मंत्र्यासारखे मोठे खाते दिले. माझ्याकडे असलेली दोन खाती दिली ! माझ्या मुलाला बडवा म्हणता तुमच्या मुलाला खासदार केले त्यावर काही बोलणार नाही का ? असा सवालही त्यांनी यावेळी बोलताना केला तसेच मी वर्ष बंगला सोडला आहे लढाई सोडली नाही असा इशारा देत बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना यांचे नाव न घेता जगून दाखवा असे आव्हानही त्यांनी यावेळी दिले.

मिळालेल्या माहितीनुसार, बैठकीत उद्धव ठाकरे म्हणाले की, बंडखोर आमदारांना शिवसेना फोडायची आहे. ते म्हणाले, “मरे पर्यंत शिवसेना सोडणार नाही, असे म्हणणारे आज पळून गेले.” जे सोडून गेले त्यांचे वाईट का वाटावे, मी कोणतेही सत्ता नाट्य  करत नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

आणखी चार आमदारांना अपात्र करण्यासाठी शिवसेनेचे पत्र

तत्पूर्वी शिवसेनेने एकनाथ शिंदे यांच्या बंडखोर गटाच्या विरोधात ‘लढा’ तीव्र करत आणखी चार आमदारांना अपात्र करण्याची मागणी केली आहे. भाजपशासित राज्यातील आसाममधील हॉटेलमध्ये बंद असलेल्या १६ बंडखोर आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी पक्षाने केली आहे. सदा सरवणकर, प्रकाश आबिटकर, संजय रायमुलकर आणि रमेश बोरनारे यांच्या नावांचा यात समावेश आहे.

दरम्यान शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, ” पीएम मोदी आणि अमित शहा, तुम्ही ऐकले का? तुमचे मंत्री शरद पवारांना धमक्या देत आहेत – तुम्ही अशा धमक्यांना तयार आहात का? तुमचा या मंत्र्यांना  पाठिंबा आहे का ? महाराष्ट्राला जाणून घ्यायचे आहे. राऊत यांनी एकनाथ शिंदे जी संख्या दाखवतात ती  संख्या फक्त कागदावर आहे, शिवसेना हा मोठा महासागर आहे, अशा लाटा येतात आणि जातात.

भाजपचे काय चालू आहे ?

राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील ‘सागर’ या निवासस्थानी भाजपाचे नेत्यांची रिघ लागली आहे. भाजपा नेत्यांची फडणवीसांच्या उपस्थितीत राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर खलबतं सुरू झाली आहेत. दरम्यान भाजपच्या वतीने राज्यपालांना पात्र दिले असून सरकारला महत्वाचे निर्णय घेण्यापासून मज्जाव करावा असे म्हटले आहे. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे कि , सरकार अजून कार्यरत असून कोणतेही निर्णय घेण्यास ते सक्षम आहेत.

५० हून अधिक आमदार आपल्या सोबत : एकनाथ शिंदे

दुसरीकडे शिवसेनेचे आणखी एक आमदार दिलीप लांडे आसाममध्ये पोहोचले आहेत. दिलीप लांडे गुवाहाटीतील ज्या हॉटेलमध्ये इतर बंडखोर आमदार राहत होते त्याच हॉटेलमध्ये पोहोचले आहेत. एकनाथ शिंदे छावणीतील आमदारांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आपल्याला शिवसेनेच्या ४० आमदारांचा पाठिंबा असून ५० हून अधिक आमदार आपल्यासोबत असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

त्याचवेळी गुवाहाटीमध्ये शिवसेनेचे बंडखोर आमदार संजय शिरसाट यांनी या मुद्द्यावर सांगितले की, यापूर्वी अनेकदा आमदारांनी उद्धवजींना सांगितले होते की, काँग्रेस किंवा राष्ट्रवादी, दोघेही शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न करत आहेत. अनेकवेळा आमदारांनी उद्धवजींना भेटण्यासाठी वेळ मागितली पण ते त्यांना भेटले नाहीत. दुसरीकडे, शिवसेनेच्या 37 बंडखोर आमदारांनी महाराष्ट्र विधानसभेच्या उपसभापतींना पत्र लिहून एकनाथ शिंदे हे सभागृह नेते असतील, अशी घोषणा केली आहे. यासोबतच या पत्राची प्रत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि विधान परिषदेच्या सचिवांनाही पाठवण्यात आली आहे.

गुवाहाटीतील “त्या ”  हॉटेलवर कडेकोट बंदोबस्त

शिवसेनेचे एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार राहत असलेल्या गुवाहाटीतील  आलिशान हॉटेलकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या हॉटेलमध्ये कडेकोट बंदोबस्त असून आत काय चालले आहे, याची कुणालाही कल्पना नाही. हॉटेलच्या एका कर्मचाऱ्याने सांगितले की हॉटेल पुढील एका आठवड्यासाठी कोणतेही नवीन बुकिंग घेत नाही कारण “आमच्याकडे कोणत्याही रिकाम्या खोल्या नाहीत” परंतु “या तारखांसाठी कोणतीही खोली उपलब्ध नाही” असे उत्तर मिळाले.

कायदेशीर लढाईची तयारी

महाराष्ट्राचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांना विधानसभेच्या सचिवालयाने सध्याच्या राजकीय पेचप्रसंगावर कायदेशीर मत मागण्यासाठी पाचारण केले आहे, ज्यात शिवसेनेने केलेल्या याचिकेनुसार १६ बंडखोर आमदारांच्या अपात्रतेचा समावेश आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!