Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

ShivsenaSpecialUpdate : विशेष लेख : शिवसेनेतील बंड आणि तुमच्या मनातली महत्वाच्या ५ प्रश्नांची उत्तरे …

Spread the love

सध्या शिवसेनेचे पदच्यूत  गट नेते एकनाथ शिंदे यांनी स्वतःच्याच मुख्यमंत्र्या समोर बंडखोरी करून मोठा प्रॉब्लेम उभा करून ठेवला आहे. अर्थात शिवसेनेत बंड  होण्याची हि काही पहिली वेळ नाही, याची सुरुवात छगन भुजबळ यांच्यापासून झाली. त्यानंतर नारायण राणे , पुढे राज ठाकरे आणि आता एकनाथ शिंदे यांचा नंबर आहे. शिवसेनेच्या बंडखोरांचा इतिहास पहिला तर एकदा एखाद्या नेत्याने शिवसेनेशी पंगा घेतला कि , त्यांना ठाकरे कुटुंबीयांमध्ये आणि शिवसेनेत परत येऊ दिले जात नाही. हा इतिहास आहे, हेच वर्तमान आहे आणि हेच भविष्य आहे.


….त्यामुळे गेले ते गेले …त्यांच्या शिवाय शिवसेना पुढे चालत आली आहे. सत्ता गेली तरी बेहत्तर पण कोणतेही बंड नायक उभे राहणार नाहीत याची नेहमीच शिवसेना नेतृत्वाने काळजी घेतली आहे. सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीत पुढे काय होऊ शकते याची चर्चा या लेखात केली आहे. 


एकनाथ शिंदे यांना शिवसेनेचे खा. संजय राऊत यांनी कितीही ” परत या , उद्धव ठाकरे राजीनामा देतील …” म्हटले असले तरी, शिंदेंना हे चांगले माहित आहे कि , चुकीला शिवसेनेत माफी नाही. कारण गाठ उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याशी आहे….शिंदे यांना गट नेते पदावरून काढले तेंव्हाच त्यांचा हिशोब झालेला आहे. शिंदे यांच्या परतीचे दोर उद्धव ठाकरे यांनी त्याच दिवशी कापून टाकले… आहेत.


या पार्श्वभूमीवर जर तातडीचे अधिवेशन झाले तर या अधिवेशनात खूप भाषणबाजी होईल आणि उद्धव ठाकरे राजीनामा देतील. अर्थात ३७ आमदार शिंदे यांना मिळणार नाहीत किंवा मिळूच दिले जाणार नाहीत. पण आता शिंदे यांच्याकडे कितीही आमदार असोत सरकार सोडण्याची तयारी उद्धव ठाकरे यांनी केलेली दिसत आहे. आणि एकदा का सरकार पडले कि , उद्धव ठाकरे “गद्दारांना धडा शिकवा …” हाच संदेश घेऊन महाराष्ट्रात फिरतील. तेंव्हा या बागी आमदारांना आपली किंमत कळेल यात वाद नाही.

या बंडखोरीची करणे काहीही असोत , भाजप प्रमाणे आपल्या हिंदुत्वाला आपल्याच शिवसेना आमदारांनी आव्हान द्यावे हि बाब मुळात उद्धव ठाकरे यांच्यासाठी उद्विग्नतेची आहे. मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीपेक्षाही या आरोपाच्या त्यांना होणाऱ्या वेदना अधिक आहेत.

आता काय होऊ शकते ?

१. सरकार पडू शकते हे नक्की .
२. एकनाथ शिंदे आपल्या मागे इतके आमदार आहेत आणि सरकारचा पाठिंबा काढून घेतो , असे पत्र देतील. ( ती संख्या कितीही असो )
३. सरकार अल्पमतात आले हे कारण लक्षात येताच उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्याचे आव्हान दिले जाईल.
४. सरकारवर “फ्लोअर टेस्ट” ची वेळ येईल. आणि यात बहुमता अभावी सरकार पडण्याची नौबत येण्याआधीच उद्धव ठाकरे सभागृहात जोरदार भाषण देऊन मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊ शकतात.
५. सरकार पडल्यास राज्यपाल भाजपाला “लार्जेस्ट पार्टी” म्हणून सरकार बनविण्याचे पत्र देऊ शकतात.

भाजपचे प्रयत्न चालूच आहेत …

एकीकडे राज्याच्या राजकारणात असा ट्विस्ट आलेला असला तरी भाजपची आपले सरकार बनविण्याची तयारी चालूच आहे . सध्या भाजपकडे राज्यसभा आणि विधानपरिषदेच्या काळात १३४ आमदार झाले आहेत त्यामुळे सरकार बनविण्यासाठी त्यांना आणखी १० आमदारांची गरज आहे आणि ते मिळविण्याची त्यांची तयारी चालू आहे. यापैकी सध्या शिंदे गटाकडचे ७ अपक्ष त्यात मिळवले तर भाजपला आणखी ३ आमदारांची गरज पडेल. त्यासाठी ते शिवसेनेच्या बागी उमेदवारांची मदत घेऊ शकतात . असे ४-५ आमदार ते आपल्याकडे वळवू शकतात. अर्थात त्यांना शिवसेनेचा राजीनामा द्यावा लागणार . त्यांना राजकीय बळ देऊन त्यांना पुढील सहा महिन्यात ते निवडून आणू शकतात. अशा पद्धतीने भाजप आपले सरकार बनवू शकते.

शिवसेनेचे अंतर्गत राजकारण असे आहे …

मुळात इतर सर्वच पक्षात असते तशी शिवसेनेतही अंतर्गत गटबाजी आहे. यात बाळासाहेब ठाकरे हयात असताना त्यांच्या जवळचे आणि त्यांच्या जवळच्यांच्या जवळचे असे दोन गट आधी पासून होते आता तसेच गट उद्धव ठाकरे यांच्या भोवतीही आहेत. कुणाला काय मिळू द्यायचे आणि कुणाला काय नाही ? या उचापती हे नेते करीत असतात.

सध्या शिंदे यांच्यासोबत असणारे आमदारही या गटा – तटाचा भाग आहेत. अर्थात सध्या जे नेते उद्धव ठाकरे यांच्या जवळ नाहीत त्यांच्याशी म्हणजे त्या “नेत्यांशी ” निष्ठा ठेवणारे हे आमदार आहेत. शिवसेना पक्ष प्रमुख किंवा शिवसेना पक्ष याच्याशी त्यांचा काहीही संबंध नाही. कारण आज ते जे काही आहेत त्याचा संबंध त्यांच्या “त्या ” नेत्यांशी आहे ज्या नेत्यांच्या शिफारशींमुळे ते आमदार किंवा खासदार झालेले आहेत. त्यामुळे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेश ऐवजी आपल्याला बनविलेल्या नेत्याचा काय आदेश आहे यावरून हे कथित आमदार पावले उचलतात.

चंद्रकांत शिंदे यांचा मूळ विषय काय आहे ?

आता प्रश्न असा आहे कि , बागी एकनाथ शिंदे यांचे हे प्रकरण काय आहे ? आणि त्यांचे मूळ दुखणे काय आहे ? त्यांच्या वर्मी घाव तेंव्हा बसलेला आहे जेंव्हा महाविकास आघाडीच्या राजकारणात त्यांचे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न भंग पावले. खरे तर असे म्हणतात कि , उद्धव ठाकरे यांनी स्वतः शिवसेनेच्या वतीने मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचे नाव सुचवले होते आणि तसे पत्रही दिले होते परंतु शेवटच्या क्षणी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि काँग्रेसच्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री न करता स्वतः मुख्यमंत्री व्हावे असा आग्रह धरला आणि यावर याचे परिणाम काय होतील याचा फारसा विचार न करता उद्धव ठाकरे यांनी होकार देत  उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन टाकली.

इथेच शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये पहिली ठिणगी पडली. परंतु उद्धव ठाकरे यांचा पिंड मुळातच राजकारणी नसल्यामुळे आपण मुख्यमंत्री झालो तर शिवसायिकांना आनंदच होईल असे त्यांना वाटत होते परंतु शिंदे यांच्या मनातील उद्धव ठाकरे यांच्या विरोधाची गाठ हळू हळू मोठी होत गेली आणि आता ती फुटण्याच्या मार्गावर आहे असा थोडक्यात विषय आहे.

या बंडामध्ये भाजपचा थेट संबंध आहे का ?

या प्रश्नाचे अतिशय स्पष्ट आणि थेट उत्तर नाही असे आहे. अर्थात याची सल एकनाथ शिंदे यांनी भाजपनेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांना बोलून दाखवलेली असणार पण …यात थेट सहभागी होण्यापेक्षा …” तुमच्याबाबतीत झाले ते वाईटच झाले …पण बघा …आणि काही मदत लागली तर आम्ही आहोतच …” इतकाच त्यांनी शिंदे यांना दिलेला असणार त्यामुळेच ते “वेट अँड वॉच” च्या भूमिकेत आहेत. कारण त्यांना “अजित पवार ” यांचा चांगला अनुभव आहे. शिंदे यांच्या बरोबरचे आमदार हे ” सुबह के भुले , शाम को वापीस गेले तर …” काय करणार म्हणून नसती भानगड नको म्हणून ते शांत आहेत एवढेच पुढे त्यांची भूमिका काय असेल हे वर लिहिलेलेच आहे…

भाजपचे सत्ता वापसीचे गणित काय आहे ?

एकनाथ शिंदे यांचा विषय आता ” हॉट टॉपीक ” असला तरी भाजपचे सत्ता वापसीचे प्रयत्न चालूच आहेत. नुकत्याच पार पडलेल्या राज्यसभा आणि विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने त्यांनी बहुमताच्या दृष्टीने जमवा जमव सुरु केलेलीच आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, त्यांच्या पक्षाला १३४ पसंतीची मते मिळाली. पक्षाकडे १०६ आमदार असून इतर सात आमदारांचा पाठिंबा मिळाला आहे.

अशाप्रकारे भाजपच्या म्हणण्यानुसार, एमव्हीएमधून फुटल्यानंतर २१ मते आली आहेत. उद्धव ठाकरे सरकारसाठी हा मोठा धक्का आहे आणि त्यांच्या सरकारमध्ये एकजुटीचा अभाव दिसून येतो. अर्थात पाटील यांनी भाजपच्या विजयाचे श्रेय फडणवीस यांना दिले आहे. मात्र फडणवीस यांनी चमत्कारांवर विश्वास नसल्याचे सांगत महाविकास आघाडीतील असंतोषच मतांमध्ये रूपांतरित झाला आहे असे म्हणत पुढे काय होऊ शकते याची हिंट दिली होती. आणि या असंतोषाचे रूप म्हणजे एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतच आमदार आहेत.

एकनाथ शिंदे यांचा काँग्रेस -राष्ट्रवादीवर इतका राग का आहे ?

आपले मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न भंग पावले याचे शल्य मनात घेऊन शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी थेट बंडखोरीची भूमिका घेत आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी बंडाचा झेंडा रोवला असेच म्हणता येईल. अर्थात हा सगळं किस्सा मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीचा आहे. आता इतके आमदार त्यांच्यासोबत कसे हा प्रश्न निर्माण झाला असेल तर त्याचे उत्तर आधीच दिले आहे कि , ज्यांना ज्यांना उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्री होणे आवडले नाही त्या त्या नेत्यांना मानणारे हे आमदार आहेत जे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले आहेत. त्यांच्या पक्षातील गॉड फादरचा शोध स्वतः उद्धव ठाकरे यांनी घेतल्यास त्याचे उत्तर त्यांना मिळेल. आणि ज्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आपल्याला मुख्यमंत्री होण्याच्या संधीपासून दूर केले त्या नेत्यांवर कमालीचा राग असल्यामुळे एकनाथ शिंदे त्यांना सोडून भाजपसोबत सरकार स्थापन करा असा राग आळवत आहेत हे उघड आहे.


शिंदे समर्थकांनी लावले होते पोस्टर ..

महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेच्या वेळी मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे जाणार हे निश्चित झाले होते. त्यांच्या समर्थकांनी ते भावी मुख्यमंत्री होणार असे पोस्टर्स ठिकठिकाणी लावायला सुरुवात केली. बहुतांश आमदारांनीही शिंदे यांच्या नावाला सहमती दर्शवली होती. पण त्यानंतर उद्धव यांनी मुख्यमंत्री होण्यास होकार दिला आणि शिंदे यांचा पत्ता आपसूकच कट झाला. देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये ते शिवसेनेचे सर्वात शक्तिशाली मंत्री होते. मात्र उद्धव ठाकरे सरकारच्या काळात ते हळूहळू ते बाजूला होत गेले. गेल्या काही महिन्यांपासून त्यांना त्यांच्या विभागाशी संबंधित निर्णयांपासूनही दूर ठेवले जात होते असे सांगितले जात आहे. दरम्यान यापुढे पक्षात त्यांना जागा उरणार नाही, हे शिंदे यांना समजले आणि अशा परिस्थितीत त्यांनी मोठी तयारी सुरू केली.

आणि एकनाथ शिंदे यांनी संधी साधली …

शिंदे यांना उद्धव ठाकरे सरकारमध्ये मंत्री करण्यात आले, पण त्यांनी जोपासलेली महत्त्वाकांक्षा ते विसरू शकले नाहीत. अखेर मुख्यमंत्रीपदाचा घास अगदी तोंडाजवळ आला होता आणि तो हिरावला गेला.दरम्यानच्या काळात त्यांच्या नाराजीच्या बातम्या येत होत्या. त्यामुळे शिंदे हे काही संधीच्या शोधात होते आणि त्यांना राज्यसभा , विधान परिषद निवडणुकीत ही संधी मिळाली. या निवडणुकीत शिवसेनेच्या काही आमदारांनी क्रॉस व्होटिंग केले आणि राज्यसभेच्या निवडणुकीत पक्षाला एक जागा गमवावी लागली. विधान परिषदेचे निकाल हाती येत नाहीत तोच शिंदे यांनी ४०-४५ आमदारांसह रातोरात सूरत गाठले , हा खेळ मुख्यमंत्रीही ओळखू शकले नाही.

शिंदे यांचे पोस्टर, योगायोग की तयारी?

दरम्यान, पाच महिन्यांपूर्वी ७ फेब्रुवारी रोजी राज्याच्या काही भागात भावी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पोस्टर्स झळकले होते. याचा अर्थ सध्याच्या घडामोडी पाहता शिंदे यांनी बंडखोरीची तयारी फार पूर्वीच केल्याचे समजून घेता येते. फक्त ते योग्य वेळेची वाट पाहत होते असेच म्हणावे लागेल. दरम्यानच्या काळात शिंदे यांची नाराजी दूर करण्यासाठी कुठलेही प्रयत्न शिवसेना नेतृत्वाने केले नाहीतत्यामुळे शिवसेनेत हा भूकंप झाला आहे आणि एकनाथ शिंदे याचा केंद्रबिंदू आहेत. अर्थात हे सर्व बंड भाजपच्या पथ्यावर पडणार हे उघड आहे.

शिवसेनेचा फुटीचा इतिहास असा आहे …

एकनाथ शिंदे शिवसेनेतून फुटले तर ते राज ठाकरे, छगन भुजबळ, नारायण राणे या तगड्या नेत्यांच्या यादीत सामील होतील. या नेत्यांनी वेगवेगळ्या वेळी बाळ ठाकरेंच्या शिवसेनेकडे पाठ फिरवली. अर्थात त्यांच्या जाण्याने पक्षाला मोठा धक्का बसला आहे. पण, महाराष्ट्रात शिवसेनेचे अस्तित्व कधीच धोक्यात आले नव्हते. या एपिसोडमध्ये आणखी एक मनोरंजक गोष्ट आहे. ते असे की, या सर्व नेत्यांनी शिवसेनेत बंडखोरीचा बिगुल वाजवला होता. उद्धव ठाकरे यांनी पक्षाची सूत्रे हाती घेतल्यानंतर एखादा बडा नेता बंडखोर होण्याची ही पहिलीच घटना आहे, हे एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत महत्त्वाचे आहे.


पहिल्या बंडाचे जनक छगन भुजबळ

शिवसेनाप्रमुख बाळ ठाकरे यांच्या पक्षाच्या इतिहासात पक्ष स्थापनेनंतर छगन भुजबळ यांनी शिवसेनेत बंडखोरी करण्याचे पहिले धाडस केले होते. ही गोष्ट 1991 ची आहे. भुजबळांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या १८ आमदारांनी पक्ष सोडला होता. त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.छगन भुजबळ यांच्या बंडखोरीनंतर विधानसभेत शिवसेनेच्या ५२ वरून ३४ जागा कमी झाल्या होत्या.

नारायण शिवसेना सोडणारे दुसरे मोठे नेते …

छगन भुजबळ यांच्यानंतर शिवसेना सोडणाऱ्या दुसया मोठ्या नेत्यामध्ये माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे नाव येते . शिवसेनाप्रमुख बाळ ठाकरे जेव्हा त्यांचे ज्येष्ठ सुपुत्र उद्धव यांना राजकारणात उभे करण्याच्या प्रयत्नात व्यस्त होते, त्याचवेळी शिवसेनेचे दिग्गज नारायण राणे यांच्यात वणवा पेटला होता. उद्धव यांची राजकारणात २००२ मध्ये एंट्री झाली. तेव्हापासून शिवसेनेत त्यांच्यासाठी वातावरण तयार केले जात होते.

पक्षाने उद्धव यांना विधानसभा निवडणूक प्रभारी बनवले. ही गोष्ट नारायण राणेंना यांच्या पचनी पडली नाही. त्यामुळे त्यांनी बाळ ठाकरेंच्या निर्णयाला उघडपणे आव्हान द्यायला सुरुवात केली. यानंतर उद्धव यांना कार्याध्यक्ष करण्याची घोषणा करण्यात आली. राणेंना उद्धव यांचे नेतृत्व कोणत्याही किंमतीत मान्य नव्हते. त्यामुळे राणे यांनी जुलै २००५ मध्ये शिवसेनेशी फारकत घेतली. याउलट पक्षाशी गद्दारी केल्याने राणेंची हकालपट्टी केल्याचा दावा शिवसेनेने केला.

पुढे काकांवर नाराज झालेल्या राज ठाकरेंनीही पक्ष सोडला…

भुजबळ यांच्यानंतर राज ठाकरे हे एकेकाळी शिवसेनेच्या राजकारणातील स्टार मानले जायचे. त्यांची आक्रमक वृत्ती आणि बाळ ठाकरे यांच्याशी साम्य असलेली त्यांची प्रतिमा शिवसैनिकांच्या पसंतीस उतरली होती. शिवसेनेचे भावी नेते म्हणून राज ठाकरे यांच्याकडे पाहिले जात होते. परंतु आपल्या हयातीतच शिवसेनेला उत्तराधिकारी बनवताना बाळ ठाकरेंनी पुतण्या राजपेक्षा पुत्र उद्धवला प्राधान्य देण्याचे संकेत देत शिवसेनेला आणि उद्धवला सांभाळा असा स्पष्ट संदेश बाळ ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिला त्यामुळे संतप्त झालेल्या राज ठाकरेंनी शिवसेनेविरोधात बंडखोरी करीत जानेवारी २००६ मध्ये पक्षापासून फारकत घेतल्यानंतर मार्च २००६ मध्ये स्वतःचा पक्ष स्थापन केला महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे). त्यावेळी त्यांच्यासोबत अनेक शिवसेना समर्थकही गेले होते.

 

कारण राजकारण । बाबा गाडे 

9421671520

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!