Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

ShivsenaNewsUpdate Live : ताजी बातमी : एकनाथ शिंदेच गट नेते , ३४ आमदारांच्या सह्यांचा राज्यपालांना पाठवला ठराव …

Spread the love

महाराष्ट्राच्या राजकीय गदारोळावर शरद पवार आणि कमलनाथ यांची भेट झाली असून त्यांच्यात सध्याच्या स्थितीवर चर्चा झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान राष्ट्रवादी महाविकास आघाडी सोबत असल्याचे राष्ट्रवादीचेचे प्रमुख शरद पवार म्हणाले असून, उद्या पुन्हा राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक बोलावण्यात आली आहे. शरद पवार या बैठकीत काही सूचना करणार असल्याची माहिती अमोल मिटकरी यांनी दिली आहे.

शिवसेना विधीमंडळ पक्षाचे नेते म्हणून एकनाथ शिंदे कायम असल्याचा 34 आमदारांच्या सह्या असलेला शिवसेना विधीमंडळ पक्षाचा ठराव राज्यपालांकडे पाठवण्यात आला असून आपल्याकडे ४६ आमदार असल्याचा दावा पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. मात्र भाजपकडून कोणताही प्रस्ताव आला नसल्याचे सांगितले.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सायंकाळी ५ वाजता फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधणार आहेत.

महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील चार्टर्ड फ्लाईटने गुजरातमधील सुरत येथे पोहोचले असून  ते भाजपच्या नेत्यांशी चर्चा करून ते आपल्या ४ आमदारांसह आसाममधील गुवाहाटी येथे पोहोचतील असे वृत्त आहे. दरम्यान काय निर्णय घ्यायचा तो कायदेशीर बाबींचा विचार करून घेण्याचा सल्ला केंद्रीय नेतृत्वाने देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे.

मुंबई  : विधान परिषदेची निवडणूक होताच पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसून पळालेल्या सर्व आमदारांना निर्वाणीचा इशारा देणारा कायदेशीर निर्णय शिवसेनेने घेतला आहे . मुंबईतील वर्षा बंगल्यावर बुधवारी संध्याकाळी ५ वाजता शिवसेनेची महत्त्वाची बैठक होत आहे. या बैठकीला शिवसेनेच्या सर्व बंडखोर आमदारांनी उपस्थित राहावे. अन्यथा त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जाईल, अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे. दरम्यान शिंदे गटाकडून शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोद पदी आमदार भरत गोगावले यांची नियुक्ती केली असून त्यांच्या आदेशानुसार बागी आमदारांचीही बैठक संध्याकाळीच तिकडे होणार असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे . त्यामुळे संध्याकाळीच सर्व चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. 


शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी यासंदर्भातील पत्र शिवसेनेच्या सर्व आमदारांना पाठवले आहे. या पत्रात बुधवारी दुपारी पाच वाजता शिवसेनेच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीसाठी उपस्थित राहण्याच्या सूचना आमदरांना देण्यात आल्या आहेत.

बंडखोर आमदारांचीही तिकडे बैठक

दरम्यान आपल्याकडे आवश्यक असलेल्या संख्याबळापेक्षाही मोठी संख्या असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले. तुम्ही शिवसेनेत परत येणार आहात कि स्वतःचा गट स्थापन करणार आहात ? असे विचारले असता ते म्हणाले कि , आज संध्याकाळी आमची बैठक आहे त्यानंतर कळवू . शिवाय शिंदे यांनी १५ मिनिटांपूर्वी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे कि , शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोद पदी शिवसेना आमदार श्री.भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सबब, श्री.सुनील प्रभू यांनी आजच्या आमदारांच्या बैठकीबद्दल काढलेले आदेश कायदेशीरदृष्ट्या अवैध आहेत.

एएनआयशी बोलताना एकनाथ शिंदे यांनी दावा केला कि , आमच्याकडे अपक्ष ६-७ मिळून ४६ आमदार आहेत. त्यात आणखी वाढही होऊ शकते. आम्हाला भाजपकडून अद्याप कुठलाही प्रस्ताव आला नाही किंवा आम्हीही अद्याप त्यांना बोललेलो नाही.

दरम्यान या बैठकीला उपस्थित न राहिल्यास स्वेच्छेने शिवसेना पक्षाचे सदस्यत्व सोडण्याचा तुमचा इरादा स्पष्ट आहे, असे ग्राह्य धरण्यात येईल आणि  त्यानुसार भारतीय संविधानातील सदस्यांच्या अपात्रतेसंदर्भात असलेल्या तरतुदीनुसार तुमच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा शिवेसनेच्या बंडखोर आमदारांना देण्यात आला आहे.

शिवसेनेचे पदच्यूत गट नेते एकनाथ शिंदे यांनी सेनेच्या ३७ आमदारांना घेऊन शिवसेनेतून फुटून स्वतःचा गट स्थापन करण्याच्या निश्चयाने पलायन केले आहे. हि माहिती मिळताच स्वतः पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह पक्षातील अनेक नेत्यांनी एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली. पक्षाचे दोन प्रतिनिधी पाठवून त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला परंतु शिंदे मुंबईला परतण्याऐवजी पुढे आसामला निघून गेले त्यामुळे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे अधिकच संतापले आहेत. या सर्व प्रकरणामुळे महाविकास आघाडी अस्थिर झाली आहे.  याच पार्श्वभूमीवर वर्षा बंगल्यावर आज सायंकाळी ५ वाजता सर्व आमदारांची            तातडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीसाठी सर्वांची उपस्थिती आवश्यक असल्याचे पत्रात म्हटले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!