Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

FinancialNewsUpdate : आधीच महागाई, त्यात आरबीआयनेही दिला दणका, पहा तुमच्या ईएमआयवर किती होईल परिणाम ?

Spread the love

मुंबई : देशातील नागरिक आधीच महागाईने त्रस्त असताना महागाईला आळा घालण्याचे कारण देत रिझर्व्ह बँकेनेही  आज पुन्हा एकदा रेपो दर वाढवत दणका दिला आहे. आज जाहीर केलेल्या निर्णयानुसार  रेपो दरात ०.५० टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे रेपो दर आता ४.९० टक्के झाला आहे. यापूर्वी ४ मे रोजी रिझर्व्ह बँकेने रेपो दरात ०.४० टक्क्यांनी वाढ केली होती.


नव्या रेपो दराचा कर्जावर काय परिणाम होईल ?

पतधोरण निर्धारण समितीच्या (एमपीसी) बैठकीनंतर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी  रेपो रेटमध्ये वाढ करण्यात आल्याची माहिती दिली. सोमवारपासून सुरु असलेली तीन दिवसीय बैठक आज संपली. या आर्थिक वर्षातील एमपीसीची ही तिसरी बैठक होती. शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत समितीच्या पाच सदस्यांनी महागाई आणि आर्थिक विकासावर चर्चा केली. अनियंत्रित महागाई लक्षात घेता रेपो रेट वाढवण्याशिवाय पर्याय नाही यावर सर्व सदस्यांचे  एकमत झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे दास यांनी सांगितले.

सातत्याने वाढतो आहे महागाईचा निर्देशांक

दरम्यान ऑगस्ट महिन्यात पुन्हा एकदा रेपो रेटमध्ये वाढ केली जाईल असा अंदाज आहे. यानंतर हा रेट ५.५० टक्क्यांपर्यंत पोहोचू शकतो असे सांगितले जात आहे. सरकारी आकडेवारीनुसार, एप्रिल २०२२ मध्ये किरकोळ महागाई दर ७.८ टक्के होता, जो मे २०१४ नंतर सर्वाधिक आहे. जानेवारी २०२२ पासून हा दर सहा टक्क्यांच्या पुढे आहे. याचप्रकारे एप्रिल २०२२ मध्ये घाऊक महागाई वाढून १५.८ टक्क्यांवर पोहोचला होता. डिसेंबर १९९८ नंतर हा दर सर्वाधिक होता.

याशिवाय धान्याचा महागाई वाढीचा दर मार्च महिन्यात ७.६८ टक्क्यांवरुन ८.३८ टक्क्यांवर पोहोचला होता. मे महिन्यातील आकडेवारी अद्याप समोर आलेली नाही. दरम्यान महागाई दर वाढत राहील अशी शक्यता आहे. दुसरीकडे सरकराने महागाई नियंत्रणात आणण्यासाठी पेट्रोल आणि डिझेवरील कर, विमान इंधनाचे दर कमी करण्यासोबतच अनेक पावले  उचलली असली महागाई कमी होताना दिसत नाही.

तुमच्या ईएमआयवर असा होऊ शकतो परिणाम

आरबीआयने केलेल्या दर वाढीमुळे बँका आणि गृहनिर्माण वित्त कंपन्या यांसारख्या कर्जदाते त्यांचे कर्ज दर त्याप्रमाणे वाढवतील, ज्याचा परिणाम ईएमआयवर थेट होऊ शकतो. तुमच्याकडे ३० लाख रुपये थकबाकी असलेले गृहकर्ज २० वर्षांच्या शिल्लक कालावधीसह ७% वार्षिक व्याजाने असल्यास तुमचा ईएमआय २३,२५९ रुपयांवरून २४,९०७ रुपयांपर्यंत १,६४८ रुपयांनी वाढेल. म्हणजेच प्रत्येक लाख रुपयांच्या कर्जासाठी, तुम्हाला ईएमआयसाठी ५५ रुपये अतिरिक्त द्यावे लागतील.

तसेच  ७ वर्षांच्या कालावधीसाठी ८ लाख रुपयांच्या ऑटो लोनसाठी जर व्याज दर १०% वरून १०.९% पर्यंत वाढला तर ईएमआयमध्ये ३७५ रुपये १३,२८१ वरून १३,६५६ रुपये इतकी वाढ होईल. याशिवाय ५ वर्षांच्या कालावधीसह पाच लाख रुपयांच्या वैयक्तिक कर्जावर, जर व्याज दर १४% वरून १४.९% पर्यंत वाढला तर तुमचा ईएमआय ११,६३४ रुपयांवरून ११.८६९ रुपयांपर्यंत २३५ रुपयांनी वाढेल.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!