Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

PanjabNewsUpdate : पुन्हा खलिस्तान जिंदाबादच्या घोषणा , सुवर्ण मंदिरासमोर भिंद्रनवालेच्या पोस्टरसह झाली मोठी गर्दी ….

Spread the love

अमृतसर : पुन्हा एकदा खलिस्तान समर्थकांनी डोके वर काढले असून सुवर्ण मंदिराच्या प्रवेशद्वारावर जर्नेल भिंद्रनवाले यांचे पोस्टर लावून खलिस्तान जिंदाबादची  घोषणाबाजी केली असल्याचे वृत्त आहे.  ३८ वर्षांपूर्वी आजच्या दिवशी अमृतसरचे सुवर्ण मंदिर फुटीरतावाद्यांपासून मुक्त करण्यासाठी सुरू केलेले ऑपरेशन ब्लू स्टार संपले होते. ६ जून १९८४ रोजी उशिरा जर्नेलसिंग भिंद्रनवाले यांचा मृतदेह सापडल्यानंतर ऑपरेशन ब्लू स्टार बंद करण्यात आले. यामध्ये लष्कराचे ८३ जवान शहीद झाले होते तर ४९२ लोकांचा मृत्यू झाला होता.


दरम्यान मीडिया रिपोर्टनुसार सोमवारी, ऑपरेशन ब्लू स्टारच्या वर्धापनदिनानिमित्त, अमृतसरमधील सुवर्ण मंदिराबाहेर अनेक लोक जमले आणि त्यांनी खलिस्तान समर्थक घोषणा दिल्या. सर्व पोलीस बंदोबस्त तैनात असतानाही शेकडो लोक सुवर्ण मंदिराच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचले. हातात तलवारी घेऊन त्यांनी खलिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या. यावेळी लोकांच्या हातात जर्नेल भिंद्रनवाले यांचे पोस्टर, बॅनर आणि छायाचित्रेही दिसून आली.

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार अमृतसरच्या सुवर्ण मंदिराच्या प्रवेशद्वारावर लोकांची गर्दी जमली होती. लोकांनी खलिस्तान समर्थकांनी घोषणा दिल्या आणि जर्नेल भिंद्रनवाले यांचे पोस्टर-बॅनरही लावले. यावेळी लोकांनी सुवर्णमंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना गेटजवळ रोखण्यात आले.

दरम्यान ‘ऑपरेशन ब्लूस्टार’ च्या वर्धापन दिनापूर्वी, रविवारी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी सुवर्ण मंदिरात प्रार्थना केली आणि अकाल तख्तचे जथेदार ग्यानी हरप्रीत सिंग यांच्यासोबत बैठक घेतली. मंदिरात दर्शन घेतल्यानंतर मान थेट जथेदारांच्या निवासस्थानी गेले. मान यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. मात्र, मुख्यमंत्र्यांनी जथेदारांच्या निवासस्थानातून बाहेर आल्यानंतर बैठकीदरम्यान झालेल्या संभाषणाची माहिती माध्यमांना दिली नाही.

ऑपरेशन ब्लू स्टारच्या वर्धापन दिनी  ६ जून रोजी मोठ्या संख्येने शीख यात्रेकरू अकाल तख्तवर पोहोचतील अशी शक्यता  असल्याने अमृतसर शहरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. कोणत्याही परिस्थितीत राज्यातील शांतता भंग करू देऊ नये, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले असताना तसेच  पोलिसांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले असतानाही शेकडो लोक सुवर्ण मंदिराच्या मुख्य गेटवर पोहोचले असल्याचे चित्र आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!