Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Prasangik : स्मरण : “लोकमान्य श्रीधरपंत टिळक” , ज्यांच्या निधनाने प्रबोधनकार ठाकरे आणि डॉ. बाबासाहेबांनाही बसला होता धक्का ….

Spread the love

श्रीधरपंत बळवंत टिळक यांचा आज स्मृती दिन , श्रीधरपंत मराठी लेखक, आणि सामाजिक समता संघाचे कार्यकर्ते होते. ते लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचे धाकटे पुत्र होते. २५ मे १९२८ साली त्यांनी मुंबई-पुणे एक्स्प्रेस-खाली आत्महत्या केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर , प्रबोधनकार ठाकरे , दिनकरराव जवळकर यांचा श्रीधरपंतांना विशेष स्नेह होता. लोकमान्य टिळकांच्या पूर्णतः विरुद्ध त्यांचे व्यक्तिमत्व होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबरोबर कार्यकर्ता म्हणून सक्रिय सहभाग देऊन त्यांनी सामाजिक सुधारणावादी म्हणून ख्याती प्राप्त केली होती. नव्या पिढीला त्यांच्या विचारांचे स्मरण व्हावे म्हणून बीबीसी मराठीने प्रसिद्ध केलेला लेख आमच्या वाचकांसाठी देत आहोत. : संपादक


सर्व छयाचित्रे सौजन्य :बीबीसी , गुगल इमेज , HT 

25 मे 1928 चा दिवस. वेळ संध्याकाळची. पुण्यातील भांबुर्डा म्हणजे आताच्या शिवाजीनगर रेल्वेस्थानकाजवळ मुंबई-पुणे एक्स्प्रेसखाली झोकून देत तिशीतल्या एका तरुणानं आत्महत्या केली. या तरुणाच्या आत्महत्येनं केवळ पुणे किंवा महाराष्ट्र नव्हे, तर संबंध भारत देश हादरला.


कारण ही आत्महत्या कुणा साध्या-सुध्या तरुणाची नव्हती, तर हा तरुण होता भारतीय स्वातंत्र्यलढ्यात ज्यांना ‘असंतोषाचे जनक’ म्हटलं गेलं, त्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे धाकटे पुत्र – श्रीधरपंत बळवंत टिळक.आत्महत्येवेळी श्रीधरपंत अवघ्या 32 वर्षांचे होते. पण या 32 वर्षांत त्यांनी आपल्या स्वतंत्र विचारांची चुणूक दाखवली होती. या काळात प्रसंगी वडिलांच्या म्हणजेच लोकमान्य टिळकांच्या भूमिकांपासून फारकत घेण्यासही त्यांनी मागे-पुढे पाहिलं नाही.

अशा या धाडसी तरुणाच्या आत्महत्येनं भारताचं राजकीय-सामाजिक विश्व हळहळलं. आत्महत्येच्या दिवशी म्हणजे 25 मे रोजीच सकाळी श्रीधरपंतांनी तीन पत्र लिहिली. यातलं एक पत्र होतं पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना, दुसरं पत्र होतं ‘विविधवृत्त’ मासिकाला आणि तिसरं पत्र होतं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना. यात बाबासाहेबांना शेवटचं पत्र लिहिल्याचं ऐकल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल. पण हे खरंय. किंबहुना, लोकमान्य टिळकांवर सातत्यानं टीका करणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं त्यांच्या मुलाशी म्हणजे श्रीधरपंत टिळकांशी मात्र विलक्षण आत्मियतेचं नातं होतं. याबद्दल आपण पुढे जाणून घेऊच.

तर या तीन पत्रातल्या एका पत्रात श्रीधरपतांनी आत्महत्येचं कारण अगदी स्पष्टपणे नमूद केलं होतं. त्या कारणाची पार्श्वभूमीही आपण जाणून घेऊ. तत्पूर्वी आत्महत्येच्या दिवशी नेमकं काय झालं आणि ‘त्या’ पत्रात काय लिहिलं होतं, हे पाहूया.

आत्महत्येच्या दिवशी काय काय घडलं?

25 मे 1925 हा दिवस श्रीधरपंतांसाठी नेहमीसारखाच उजाडला. फरक इतकाच होता की, हा दिवस मावळला तो श्रीधरपंतांचा जीव घेऊन. पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज किंवा भांबुर्ड्याकडे (आताचं शिवाजीनगर) श्रीधरपंत नेहमी फिरायला जात. तसेच ते 25 मे रोजीच्या संध्याकाळीही फिरायला गेले. त्यामुळे त्यात कुणाला काही वावगं वाटलं नाही. पण त्या दिवशी फिरायला जाताना त्यांनी पैशांचं पाकीट किंवा इतर कुठल्याही गोष्टी सोबत नेल्या नव्हत्या. भांबुर्डा रेल्वेस्थानकाच्या दिशेनं निघण्याआधी त्यांनी तीन पत्र लिहिली, जिल्हाधिकारी, विविधवृत्तचे संपादक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना. आणि ती पत्रं टपालपेटीत टाकली.

घरातून बाहेर पडण्याआधी श्रीधरपंतांनी मुलं आणि पत्नीला डोळेभरून पाहिलं. आणि ते घरातून निघाले आणि थेट भांबुर्डा रेल्वेस्थानकाजवळील रूळापाशी जाऊन मुंबई-पुणे एक्स्प्रेसची वाट पाहू लागले. रेल्वेच्या हॉर्नचा आवाज येताच ते सावध झाले. गाडी जवळ आल्यावर श्रीधरपंतांनी रेल्वेसमोर स्वत:ला झोकून दिलं. क्षणार्धात सर्व संपलं! घटनास्थळी लोक जमले, श्रीधरपंतांच्या मृतदेहाची ओळख पटण्यास वेळ लागला नाही. ‘लोकमान्यांच्या लहान्या मुलाची आत्महत्या’ ही बातमी वाऱ्याच्या वेगानं पुण्यात पसरली. श्रीधरपंतांनीच स्थापन केलेल्या समता संघाचे कार्यकर्ते घटनास्थळाकडे धावले. पोलीस पोहोचले आणि पंचनामा झाला. पार्थिव टिळक कुटुंबीयांच्या गायकवाड वाड्यात आणलं गेलं.

श्रीधरपंतांच्या पत्नी शांताबाई आणि तिन्ही लेकरं टाहो फोडत होती. थोरला मुलगा जयंत सात वर्षांचा होता. त्यापाठची दोन्ही मुलं अगदी लहान होती. चौथ्या बाळासाठी शांताबाईंना दिवसही गेले होते. टिळक कुटुंबीयांनं आपला तिशीतला मुलगा आणि समता संघासह समाजसुधारकांच्या वर्तुळानं आपला सच्चा साथी गमावला होता. महाराष्ट्राच्या आभाळात दु:खाचं सावट पसरलं होतं.

श्रीधरपंत टिळकांच्या आत्महत्येबाबत त्यांचे बालमित्र नानासाहेब चापेकरांनी नमूद करून ठेवलंय की, “पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमधले माझे वर्गबंधू श्रीधरपंत ऊर्फ बापूराव टिळक यांनी पुण्याच्या मुळामुठेच्या संगमावरल्या, पूर्वी सेशन्स कोर्ट असलेल्या बेट या नावाने ओळखल्या जाणाऱ्या इमारतीच्या मागच्या बाजूच्या रेल्वेलाईनवर आगगाडीखाली पडून आत्महत्या केल्याची दु:खद वार्ता समजली.”

श्रीधरपंतांनी आत्महत्या का केली?

श्रीधरपंतांनी आत्महत्या का केली, याचं उत्तर त्यांनी लिहिलेल्या त्या तीनपैकी एका पत्रात आहे. आधी नमूद केल्याप्रमाणे विविधवृत्त मासिकाचे संपादक श्री. प्रधान, पुण्याचे जिल्हाधिकारी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशा तिघांना हे पत्र श्रीधरपंतांनी लिहिले. यातील एका पत्रात श्रीधरपंतांच्या आत्महत्येचं कारण दडलेलं असल्यानं या पत्रांना त्यांच्यानंतर अत्यंत महत्त्व आलं. या तिन्ही पत्रांमध्ये नेमकं काय होतं, हे आपण एक एक पत्रांमधील सविस्तर मजकुराद्वारे जाणून घेऊ. यातील पहिलं पत्र होतं विविधवृत्त मासिकाच्यासंपादकांना. या पत्रात लिहिलं होतं :

“कृ. सा. न. वि. वि.

शिवराळ प्रकाशनाची प्रतिक्रिया ही गोष्ट येत्या विविधवृत्तच्या अंकात छापून येईलच. तथापि ती पुन्हा विविध ज्ञान विस्तारातही प्रसिद्ध व्हावी अशी माझी इच्छा आहे. तरी ही माझी अखेरची इच्छा आपण पूर्ण करालच. कारण आपला मजवर फारच लोभ होता. इतका की, त्यातून उतराई होणे या जन्मी तरी मला शक्य नाही. या प्रसंगी अधिक काही लिहवत नाही. मित्रमंडळींस नमस्कार कळवावा. कळावे, हे विनंती.

आपला,

श्री. ब. टिळक”

हे पत्र 26 मे 1928 रोजी सकाळी म्हणजे श्रीधरपंतांनी आत्महत्या केल्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी विविधवृत्तच्या संपादकांच्या हाती पडलं. तोवर श्रीधरपंतांचं निधन झालं होतं. मग हे पत्र जसंच्या तसं विविधवृत्त मासिकानं पुढील अंकात म्हणजे 3 जून 1928 च्या अंकात प्रकाशितही केलं होतं.

यातील दुसरं पत्र होतं, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना.

श्रीधरपंतांच्या निधनानंतर ‘विविधवृत्त’ आणि ‘दुनिया’ या मासिकांनी विशेषांक काढले. यातील विविधवृत्तमध्ये ‘(कै) श्रीधर बळवंत टिळक’ मथळ्याचा लेख डॉ. आंबेडकरांनी लिहिला. हा अंक 2 जून 1928 रोजी प्रकाशित झाला.

श्रीधर टिळक : या लेखात बाबासाहेबांनी सांगितलंय की, 26 मे 1928 रोजी ते जळगावात बहिष्कृत वर्गाच्या सभेसाठी उपस्थित होते. तिथं त्यांना श्रीधरपंतांच्या निधनाची बातमी कळली. बाबासाहेबांच्या चेहऱ्यावर कुठलीतरी मोठी दु:खद घटना घडल्याच्या भावना स्पष्ट दिसत होत्या. त्यांनी उपस्थितांना ही बातमी सांगितली आणि आदरांजली वाहण्यासाठी उपस्थितांना उभे राहण्यास सांगितलं. नंतर बाबासाहेब सभा सोडून मुंबईत दाखल झाले. दादरला कार्यालयात पोहोचले. कार्यालयात पोहोचल्यावर समोर टेबलावर ‘टाईम्स’चा अंक होता. तो हाती घेताना त्यांना बाजूला एक पत्र दिसलं. ते पत्र होतं श्रीधरपंतांनी पाठवलेलं. बाबासाहेबांनी टाईम्सचा अंक तिथेच टाकला आणि श्रीधरपंतांचं पत्र हाती घेतलं. त्या पत्रात लिहिलं होतं :

“स. न. वि. वि.

हे पत्र आपले हाती पडण्यापूर्वीच बहुदा मी इहलोकास रामराम ठोकल्याची वार्ता आपले कानी पडेल! आपल्या समाज समता संघाचे अंगीकृत कार्य नेटाने पुढे चालू ठेवण्यासाठी सुशिक्षित व समाज सुधारणावादी तरुणांचे लक्ष या चळवळीकडे अधिकाधिक वेधून घेणे आवश्यक आहे. आपण या कामी अहर्निश झटता याबद्दल मला फार संतोष वाटतो व आपल्या प्रयत्नास परमेश्वर यश देईल अशी खात्री वाटते. महाराष्ट्रीय तरुणांनी मनावर घेतल्यास अस्पृश्यता निवारणाचा प्रश्न अवघ्या पाच वर्षात सुटेल. माझ्या बहिष्कृत बांधवांची गाऱ्हाणी प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाचे चरणाविंद सादर करण्यासाठी मी पुढे जात आहे. तरी मित्रमंडळीस माझा सप्रेम नमस्कार सांगावा.

कळावे, लोभ असावा ही विनंती.

आपला नम्र,

श्रीधर बळवंत टिळक”

श्रीधरपंतांनी तिसरं पत्र लिहिलं ते, पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना. हे पत्र श्रीधरपंतांच्या आत्महत्येचं कारण सांगणारं आहे. त्यामुळे या पत्राला त्यांच्या निधनानंतर अत्यंत महत्त्व प्राप्त झालं. या पत्रात श्रीधरपंतांनी लिहिलं होतं :

“मला असे नेहमी वाटे की माझा जन्म माझ्या देशाची, माझ्या समाजाची व माझ्या भाषेची सेवा करण्याकरिता आहे. माझ्या माता पितरांचीही याहून भिन्न कल्पना नव्हती. माझा जन्म वकील आणि कायद्यांची कोर्टे यांचे असहाय खेळणे बनण्याकरिता नव्हता. एखाद्या गरीब अपरिचित शेतकऱ्याच्या झोपडीत माझे जीवितकार्य पुरे करण्याकरिता माझा पुनर्जन्म होवो, अशी मी आशा बाळगतो.”

या तिसऱ्या पत्रातील ‘माझा जन्म वकील आणि कायद्यांची कोर्टे यांचे असहाय खेळणे बनण्याकरिता नव्हता.’ हे वाक्य अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण या वाक्याचा संबंध ‘केसरी’ वृत्तपत्राच्या मालकीचा वाद आणि इतर मालकी हक्कांच्या वादाशी संबंध आहे आणि या गोष्टींमुळे श्रीधरपंतांना कोर्टाचे उंबरठे झिजवावे लागले होते. परिणामी त्यांना प्रचंड मनस्ताप सोसावा लागला होता.

‘श्रीधरपंतच खरे लोकमान्य’

लोकमान्य टिळकांना तीन मुली आणि तीन मुलं होते. त्यातील थोरला मुलगा फार कमी वयातच वारला. त्यामुळे पाच अपत्यं राहिली. तिन्ही मुलींचे टिळकांनी हयात असतानाच लग्न लावून दिले. उरलेली दोन मुलं म्हणजे रामभाऊ आणि श्रीधरपंत हे टिळकांच्या शेवटच्या काळात शिक्षण घेत होते. ते वयाने लहान होते.

यातील श्रीधरपंत अभ्यासात सुरुवातीला फारसे हुशार नव्हते. मात्र, टिळकांच्या निधनानंतर त्यांनी पुरोगामी चळवळीत मोठ्या प्रमाणात पुढाकार घेतला. वयाच्या 32 व्य वर्षी श्रीधरपंतांची जीवनयात्रा संपली. मात्र, तोवर त्यांनी प्रबोधनकार ठाकरेंपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत अनेकांशी मैत्री केली होती. बाबासाहेब आंबेडकर त्यांना भाऊ मानू लागले होते. इतकी ही जवळीक होती.

ज्या लोकमान्य टिळकांशी बाबासाहेबांचा वैचारिक वाद झाला, दर दोन दिवसांआड बाबासाहेबांनी ‘मूकनायक’मधून लोकमान्य टिळकांवर सडेतोड टीका केली, त्याच लोकमान्य टिळकांच्या मुलाशी बाबासाहेबांची मैत्री ही त्यावेळी केवळ चर्चेचीच नव्हे, तर त्यांच्या विरोधकांमध्ये टीकेचीही लक्ष्य असे.

डॉ. बाबासाहेब लिहितात….

श्रीधरपंतांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी जवळचा स्नेह होता. त्यांनी आत्महत्येआधी शेवटचं पत्र आंबेडकरांना पाठवल्याचं वर नमूद केलंच आहे. श्रीधरपंतांच्या आत्महत्येनंतर मामा वरेरकरांच्या ‘दुनिया’ साप्ताहिकानं ‘टिळक अंक’ प्रसिद्ध केला होता. त्यात बाबासाहेबांनी श्रीधरपंतांवर लेख लिहिला होता. अनंत देशमुखांनी श्रीधरपंतांवरील चरित्रात हा लेख समाविष्ट केलाय. त्यातील काही उतारे इथे देतो आहोत. बाबासाहेब आंबेडकर आणि श्रीधरपंत टिळक यांच्यातील स्नेह या उताऱ्यातून सहज लक्षात येतो.

डॉ. आंबेडकर लिहितात, ‘कोणी काहीही म्हणो, श्रीधरपंतांच्या वडिलांना लोकमान्य ही पदवी अयथार्थ होती. तेली, तांबोळी म्हणून बहुजन समाजाचा उपहास करणाऱ्या व्यक्तीला लोकमान्य म्हणणे म्हणजे लोकमान्य या शब्दाचा विपर्यास करणे, असे आमचे मत आहे. लोकमान्य ही पदवी जर टिळक घराण्यापैकी कोणा एकास साजली असती तर ती श्रीधरपंतासच होय. टिळकांच्या हातून लोकसंग्रह झाला नाही. खरा लोकसंग्रह श्रीधरपंतच करू शकले असते. तो करण्यास ते उरले नाहीत, ही महाराष्ट्रावरील नव्हे हिंदुस्तानावरील मोठीच आपत्ती आहे, असे भिक्षुकशाहीच्या कच्छपी नसलेल्या कोणत्याही लोककल्याणेच्छू माणसास कबूल करणे भाग आहे.’

याच लेखात बाबासाहेबांनी केसरीसंदर्भातील वादाचाही उल्लेख केलाय. त्या उल्लेखेत बाबासाहेब म्हणतात की, ‘माझ्या मते श्रीधरपंतांना ‘केसरी’ त जागा मिळाली असती तर तो घोर प्रसंग आलाच नसता. ‘केसरी’ पत्रात आपणास जागा मिळावी ही एक त्यांची मोठी महत्त्वाकांक्षा होती. टिळकांच्या मरणानंतर त्यांच्या हाती ‘केसरी’ गेला त्यांनी केवळ टिळकांचा मुलगा म्हणून श्रीधरपंतांना त्यांच्या वडिलांनी केलेल्या उपकाराची फेड या दृष्टीने ‘केसरी’ च्या चालकांत जागा द्यावयास पाहिजे होती. परंतु टिळकांचा मुलगा म्हणून नव्हे, तर भारदस्त लेखक या दृष्टीने ‘केसरी’ च्या संपादक वर्गात श्रीधरपंतांचा समावेश व्हावयास पाहिजे होता.’

‘राजकीयदृष्ट्या ते काही मवाळ नव्हते. जहाल, सुताळ आणि बेताल या सर्वांच्यापेक्षा ते फारच पुढे गेलेले होते. तेव्हा त्यांच्या लिखाणाने ‘केसरी’ ला काही धोका नव्हता, असे असताना त्यांना ‘केसरी’ त जागा मिळाली नाही. यांचे मला राहून राहून आश्चर्य वाटते. ‘केसरी’ त जागा मिळाली असती तरीही ‘केसरी’ कंपूचा भंड लागून जे व्हावयाचे ते झालेच असते असे काही लोक म्हणतील. कसेही असो एवढी गोष्ट खास की निदान पैशापायी काही भांडण झाले नसते. कारण श्रीधरपंत यांची मनोवृत्ती त्या दृष्टीने अनुदार नव्हती. तसे ते असते तर वडिलांची इच्छा पुरी पाडण्याच्या हेतूने त्यांनी ट्रस्टडीडवर बिनतक्रार सह्या केल्या नसत्या व आज ‘केसरी’ कंपूवर हा त्यांनी केवढा उपकार केला आहे याची आठवण ‘केसरी’ कंपूला असती तर बरे झाले असते.

श्रीधरपंतांचा संबंध केवळ बाबासाहेबांशीच नव्हे, तर प्रबोधनकार ठाकरेंसह अनेक पुरोगामी व्यक्तींशी पुढे येत गेला. पत्रकार सचिन परब लिहितात, ‘पुढे श्रीधरपंतांनी टिळकांच्या गायकवाड वाड्यात अस्पृश्यांसोबत सहभोजन घडवून त्याचेही प्रायश्चित्त घेतले. समाजसुधारणेची त्यांची कळकळ फक्त बोलघेवडी नव्हती. गायकवाडवाड्यातलं सहभोजन, समतासंघाची स्थापना तसंच गणेशोत्सवात बहुजनमेळ्याचा कार्यक्रम घेणे ही पुण्यासाठी क्रांतीच होती.’

‘पण सामाजिक चळवळी करणाऱ्यांनी राजकीय चळवळींत अडथळे बनू नये, असा परखड सल्लाही ते सुधारणावाद्यांना देण्यास कचरत नसत. त्यांची भूमिका कायम सुधारणांसाठी आग्रही पण समन्वयवादी होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे, केशवराव जेधे, दिनकरराव जवळकर असे ब्राह्मणेतर चळवळीचे अनेक अर्ध्वयू त्यांचे जवळचे मित्र होते.’

प्रबोधनकारांनाही बसला बापूच्या निधनाचा धक्का …

प्रबोधनकार ठाकरेंनी त्यांच्या ‘माझी जीवनागाथा’ या आत्मचरित्रात श्रीधरपंतांबाबत लिहिलंय. त्यांच्या आत्महत्येनं प्रबोधनकारांना मोठा धक्का बसला होता.

प्रबोधनकारांनी ‘माझी जीवनगाथा’मधील लेखाचा शेवट करताना म्हटलंय की, ‘असत्य, अन्याय, अप्रामाणिकपणा त्याला बिलकूल सहन होत नसे. तो एकदम उखडायचा. त्याच्या कित्येक तक्रारी गंभीर असल्या, तरी पुष्कळशा अगदी क्षुल्लक असत. त्यांचा पाढा तावातावाने त्याने माझ्यापुढे ओकला की धीराच्या नि विवेकाच्या इतर उपदेशाच्या गोष्टींची मात्रा चाटवून मी त्याला शांत करीत असे. हरएक बऱ्यावाईट घटनेचे चक्र त्याच्या डोक्यात सारखे गरगरत असायचे. मनस्वी विचार करणाऱ्या मंडळीना मनातले विचार आणि भावना मोकळ्या करण्यासाठी एखादा स्नेहीसोबती आप्त जवळपास नसला, म्हणजे ते लोक मनातल्या मनात कूढू लागतात. असल्या कुढण्याच्या अतिरेकानेच बापू टिळकाची आत्महत्या ही दुदैवी घटना घडली!’

नामदेव काटकर [  बीबीसी मराठीवरून साभार ]

सविस्तर लेख वाचण्यासाठी बीबीसी मराठीच्या पुढील लिंकवर क्लिक करा

https://www.bbc.com/marathi/india-61475181

श्रीधरपंत टिळक यांच्याविषयी आणखी माहिती वाचा

https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A7%E0%A4%B0_%E0%A4%AC%E0%A4%B3%E0%A4%B5%E0%A4%82%E0%A4%A4_%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A4%95

आपलं सरकार

Click to listen highlighted text!