Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

RanaNewsUpdate : राणा दाम्पत्याच्या अर्जावर अद्याप निर्णय नाही , नवनीत राणा म्हणतात मला ‘स्पॉन्डीलायटिस’ चा त्रास ..

Spread the love

मुंबई : मातोश्री समोर हनुमान चालीसा पठण करण्याच्या नादापायी मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्थेला आव्हान देण्याच्या आरोपावरून तुरुंगात असलेल्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या जामीन अर्जावर कोर्टाने आजही निर्णय दिला नाही. त्यामुळे त्यांचा तुरुंगातील मुक्काम वाढला आहे. 

आता बुधवारी सकाळी हा निर्णय दिला जाईल, असे न्यायाधीशांनी स्पष्ट केले आहे.  दरम्यान, लोकसभा अध्यक्षांना आपण अनुसूचित जातीचे असल्याने आपल्याला तुरुंगात खालच्या पटलीची वागणूक दिली जात आहे असा आरोप करणाऱ्या नवनीत राणा यांनी आपल्या वकिलांमार्फत भायखळा कारागृह अधीक्षकांना पुनः एक पत्र लिहिले असून त्यात म्हटले आहे की , त्यांना स्पॉन्डीलायटिसच्या त्रासाबाबत माइति दिली आहे. ‘ न्यायालयीन कोठडीत मला सतत लादीवर बसावे  लागत असल्याने माझे  दुखणे वाढले आहे. २७ एप्रिल रोजी मला जे. जे. रुग्णालयात नेण्यात आले असता ‘सिटीस्कॅन’ करण्याची आवश्यकता असल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगितले होते. मात्र, डॉक्टरांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे आजारपण वाढल्यास त्याला पूर्णपणे कारागृह प्रशासन जबाबदार असेल ‘, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

न्यायालयीन कोठडीत असताना हिंदू धर्माच्या रक्षणासाठी तुरुंगात गेलेल्या नवनीत राणा यांना तुरुंगात त्रास होत आहे. तुरुंगातून वेगवेगळे आरोप करूनही त्यांच्या सुटकेचा मार्ग अद्यापही मोकळा होत नसल्याने त्या चिंताग्रस्त झाल्या आहेत. त्यांची लहान मुलगी एकटी घरी असल्याचेही त्यांच्या वकिलांनी सांगून पहिले परंतु न्यायालय आपल्या वेळेनुसार त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी घेत आहे कारण न्यायालयासमोर अनेक मॅटर आहेत. आता बुधवारी त्यांच्या अर्जावर सुनावणी होईल तोपर्यंत राणा यांना तुरुंगातून आणखी पत्रे लिहिण्यास आणि तक्रारी करण्यास वाव आहे.

असे आहे प्रकरण

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानासमोर हिंदुत्वाच्या रक्षणासाठी हनुमान चालीसा पठण करण्याचा हट्ट राखीव मतदार संघातील लोकसभेच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवि राणा यांनी धरला होता. त्यासाठीच मुख्यमंत्र्यांना आव्हान देत  ते अमरावती येथून मुंबईत दाखल झाले होते. मात्र , शिवसैनिक आक्रमक झाल्याने व कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने पोलिसांना राणा दाम्पत्याला राजद्रोहासह अनेक गंभीर कलमे लावून राणा दाम्पत्याला अटक करावी लागली. ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. राणा दाम्पत्याने मुंबई सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला असून त्यावर आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत निर्णय देण्याचे संकेत मिळत होते. मात्र, वेळेअभावी हा निर्णय लांबणीवर गेला आहे. आता बुधवारी हा निर्णय दिला जाईल , असे न्यायाधीशांकडून नमूद करण्यात आले आहे.

 

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!