Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे राज्यातील जनतेला आवाहन

Spread the love

मुंबई  :  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला राज्यातील जनतेला शुभेच्छा देताना  महाराष्ट्राच्या जनतेला राज्यातील सौहार्द, सामंजस्याचे वातावरण बिघडू देऊ नका, असे  आवाहन केले आहे. दरम्यान यावेळी त्यांनी विरोधकांचे  कान टोचताना त्यांनी म्हटले आहे कि , आज महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाव घालण्याचे आणि महाराष्ट्राला बदनाम करण्याचे कुटील कारस्थान जर कुणी करीत असेल तर येथील स्वाभिमानी जनता त्यांना उत्तर देण्यास समर्थ आहे. तसेच माझे सर्वांना, अगदी विरोधी पक्ष आणि संघटना यांना देखील कळकळीचे आवाहन आहे की, मनात विद्वेष न ठेवता महाराष्ट्राचा देशातच नव्हे तर जगात डंका वाजविण्यासाठी एकत्र येऊन महाराष्ट्राची पताका हातात घेऊ यात, असे  आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले  आहे.

आपल्या शुभेच्छा संदेशात ठाकरे यांनी पुढे म्हटले आहे कि , कितीही अडथळे आणि संकटं येऊ देत, महाराष्ट्राची घोडदौड सुरूच राहील. अवघ्या देशाला स्फूर्ती देणारा हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे, ज्यांनी संयुक्त महाराष्ट्रासाठी आपले रक्त सांडले त्यांचे बलिदान कधीही विसरणार नाही आणि हे करतांना महाराष्ट्र धर्माची पताका देशातच नव्हे तर विश्वात फडकाविल्याशिवाय राहणार नाही.

महाराष्ट्रामधील जात धर्मांतील सलोखा संपविण्याचा प्रयत्न

आज दुर्देवाने स्वार्थ आणि महत्वाकांक्षेपोटी महाराष्ट्रामधील जात धर्मांतील सलोखा संपवून सामाजिक क्रांतीच्या तमाम महापुरुषांचे विचार मातीस मिळविण्याची कामगिरी सुरू आहे. महाराष्ट्र हा सामाजिक सलोखा, संयम आणि सारासार विवेकबुद्धीने वागणारा म्हणून ओळखला जातो. एखाद्या राज्याची प्रगती म्हणजे काही केवळ किती गुंतवणूक तिथे आली आणि किती रस्ते झाले असे नाही. महाराष्ट्राने पर्यावरणासारख्या मूलभूत आणि संवेदनशील विषयवार जगाचेही लक्ष वेधले आहे. आरोग्याची पुढील काळातली आव्हाने लक्षात घेऊन आधुनिक वैद्यकीय पायाभूत सुविधांचे नियोजन केले आहे. खेडी, शहरे स्वच्छ असावीत, सर्वांना व्यवस्थित नळाने पाणी मिळावे, सर्वसामान्यांना घरे मिळावीत, शहरांचे आराखडे हे पुढील काही वर्षांच्या विकासाचा अदमास घेऊन तयार करावेत, विकेल तेच पिकेल असे ठरवून शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करणे, सौर ऊर्जेचा वापर, महिलांच्या सुरक्षेसाठी शक्ती कायद्याच्या माध्यमातून गुन्हेगारांवर वचक या गोष्टींवर आम्ही केवळ भरच दिलेला नाही तर अंमलबजावणी सुरू केली आहे.

शिवाजी महाराज आणि फुले शाहू आंबेडकरांचा गौरव

महाराष्ट्राचा इतिहास लढवय्यांचा आहे मग मोगलांच्या आक्रमणाला थोपविणारे छत्रपती शिवराय, औरंगजेबाला ललकारणाऱ्या ताराराणी असोत किंवा सामाजिक सुधारणांसाठी आयुष्य पणाला लावणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज, महात्मा जोतिबा आणि सावित्रीबाई फुले असोत. या सर्वांनी आणि त्यांना आदर्शवत मानणाऱ्या अनेकांनी जात पात धर्म याचा विचार न करता महाराष्ट्राची सामाजिक वीण मजबूत केली. या भूमीचे सुपुत्र असलेल्या महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटना म्हणणे केवळ एक पुस्तक नाही तर देशातील प्रत्येकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार देणारी एक अनमोल देणगी आहे, असे  मुख्यमंत्री म्हणाले.

संघराज्य व्यवस्थेचा आम्ही सन्मानच करतो. विकासासाठी उत्तुंग झेप घेण्याची दुर्दम्य इच्छा आमच्यात आहे. राष्ट्राच्या प्रगतीत योगदान देण्याचे कर्तव्य आम्हाला पार पाडायचे आहे आणि पार पाडतही आहोत.मला खात्री आहे की, येणाऱ्या काळात महाराष्ट्रातील माझे तमाम बंधू आणि भगिनी हे ज्यासाठी महाराष्ट्र ओळखला जातो त्या परस्पर सौहार्द, बंधुभाव आणि एकोप्याचे वातावरण कलुषित होऊ देणारे सगळे प्रयत्न हाणून पाडतील. माझे सर्वांना, अगदी विरोधी पक्ष आणि संघटना यांना देखील कळकळीचे आवाहन आहे की, मनात विद्वेष न ठेवता महाराष्ट्राचा देशातच नव्हे तर जगात डंका वाजविण्यासाठी एकत्र येऊन महाराष्ट्राची पताका हातात घेऊयात, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!