Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

GunratnaSadavarteNewsUpdate : तब्बल १८ दिवसानंतर घरी परतले गुणरत्न सदावर्ते

Spread the love

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक बंगल्यावरील एसटी कर्मचाऱ्यांच्या हल्ला बोल आंदोलनाला जबाबदार धरून गेल्या १८ दिवसांपासून पोलिसांच्या ताब्यात असलेले वकील गुणरत्न सदावर्ते  यांची अखेर जेलमधून सुटका झाली आहे. दरम्यान पुणे पोलिसांचं  पथक सदावर्तेंचा ताबा घेण्यासाठी आर्थर रोड कारागृहाबाहेर  दाखल होते. परंतु  कारागृह प्रशासनाने सदावर्ते यांचा ताबा देण्यास नकार दिला. हायकोर्टाने दिलेल्या आदेशांची अंमलबजावणी करणे हे आमचे  कर्तव्य असल्याचे  जेल प्रशासनाने पुणे पोलिसांना सांगितले त्यामुळे पुणे पोलीस रिकाम्या हाताने परत गेले आणि  सदावर्ते यांची सुटका झाली. विशेष म्हणजे सदावर्तेंची जेलमधून सुटका होताच त्यांनी आक्रमकपणे आपली भूमिका मांडली. यापुढे आपण भ्रष्टाचाराविरोधात लढा देणार, असे सदावर्ते म्हणाले.

तुरुंगातून घरी येताच माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांच्या प्रतिक्रियेसाठी गर्दी केली होती. यावेळी बोलताना ते म्हणाले कि , “हम हैं हिंदुस्तानी! हा भारताच्या संविधानाचा विजय आहे. भारताच्या संविधानापेक्षा कुणीही श्रेष्ठ नाही. हे आहेत सदावर्ते कुटुंबीय , १३ वर्षांची माझी मुलगी झेन आणि पत्नी जयश्री पाटील. त्यांनी आणि माझ्या मित्रपरिवाराने अन्यायाविरोधात मला साथ दिली आणि महाराष्ट्राच्या, देशाचे हिंदुस्तानी कष्टकरी आमच्यासोबत राहिले. यापुढे आमचे भ्रष्टाचार हे केंद्रबिंदू असेल. महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करण्यासाठी जे जे करता येईल ते आम्ही करु. पण जय श्रीराम, जय भीम, वंदे मातरम आणि हम है हिंदुस्तानी , भारत माता कि जय म्हणणारे हा त्यांचा विजय आहे”, अशी प्रतिक्रिया सदावर्तेंनी दिली.

काय आहेत सदावर्ते यांच्यावर आरोप ?

गुणरत्न सदावर्ते यांना ८ एप्रिलला अटक करण्यात आली होती. सदावर्ते तब्बल १८ दिवसांपासून जेलमध्ये होते. सदावर्तेंविरोधात मुंबईसह कोल्हापूर, पुणे, अकोट, अकोला येथेही गुन्हे दाखल करण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानावर एसटी कर्मचाऱ्यांनी हिंसक आंदोलन केलं होतं. या हिंसक आंदोलनाप्रकरणी एसटी कर्मचाऱ्यांना भडकवणं आणि ‘सिल्व्हर ओक’वर हल्ला करण्याच्या आरोपांखाली सदावर्तेंना अटक करण्यात आली होती. त्यानंतर सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांकडून पैसे गोळा केल्याचं प्रकरण समोर आलं. यानंतर सदावर्तेंवर एसटी कर्मचाऱ्यांची फसवणूक करुन खोटे आश्वासन देवून पैसे वसूल केल्याच्या आरोपांप्रकरणी राज्यातील काही भागांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. तर काही ठिकाणी छत्रपती घराण्याच्या वंशजांवर आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदावर्तेंना आक्षेपार्ह वक्तव्य न करण्याचा आदेश

पुण्याच्या विद्यापीठ पोलीस ठाण्यातही  गुणरत्न सदावर्ते यांच्यावर आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांचा ताबा घेण्यासाठी विद्यापीठ पोलीस मुंबईत आले होते. त्यांनी आर्थर रोड जेल प्रशसनाकडे ताबा मिळविण्यासाठी अर्ज केला होता. पण त्याविरोधात सदावर्तेंनी मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी धाव घेतली होती. कोर्टात सरकारी वकील अरुणा पै यांनी बाजू मांडली. सदावर्ते यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. त्यांना अटकेपासून संरक्षण दिल्यास ते पुन्हा तसं वक्तव्य करतील, असा दावा सरकारी वकिलांनी केला. या सुनावणी दरम्यान पुणे विद्यापीठ पोलीसही कोर्टात दाखल झाले होते. पण कोर्टाने सदावर्ते यांचा जामीन अर्ज मंजूर केला. यावेळी कोर्टाने सदावर्तेंना आक्षेपार्ह वक्तव्य न करण्याचा आदेश दिला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!