Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MumbaiNewsUpdate : चर्चेतली बातमी : माफी मग आणि मगच बाहेर पडा, शिवसैनिकांनी राणा दाम्पत्याशी सामना रंगला…!!

Spread the love

मुंबई : मुंबईतील परिस्थिती लक्षात घेऊन राणा दाम्पत्यांने मातोश्रीवर जाण्याचा निर्णय मागे घेतला असला तरी ‘शिवसेना आणि पक्षप्रमुखांची जाहीर माफी मागावी’ या मागणीवरून शिवसैनिक चांगलेच हट्टाला पेटले असून पोलिसांसाठी राणा दाम्पत्याच्या घरासमोरून शिवसैनिकांना हटविणे मोठी डोकेदुखी झाली आहे. दरम्यान माफी मागितली तरच आम्ही त्यांना रस्ता मोकळा करुन देऊ नाहीतर राणा दाम्पत्य घराबाहेरच कसे पडतात, तेच बघतो आम्ही….., असा इशारा देत युवासेनेचे वरुण सरदेसाई यांनी त्यांच्या घरासमोर ठाण मांडले आहे. 

दरम्यान ‘मातोश्री’ला आव्हान देणारा आणखी जन्माला यायचाय, तेव्हा इथून पुढे मातोश्रीवर जाण्याची हिम्मत करु नका, असा इशारही सरदेसाई यांनी राणा दाम्पत्यांना दिला. राणांच्या खारमधील घराच्या खाली शेकडो शिवसैनिक जमले आहेत. या शिवसैनिकांचं नेतृत्व युवानेते सरदेसाई करत आहेत. मुंबईतील खारच्या घरी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या मातोश्रीवर हनुमान चालिसा पठण करण्याचा हट्ट सोडत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याला गालबोट लागू नये, म्हणून आपण आंदोलन मागे घेत असल्याचं रवी राणा यांनी सकाळी जाहीर केले परंतु हा वाद अद्याप संपलेला नसल्याचे चित्र आहे.  आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा राणांनी करताच शिवसैनिकांनी एकच जल्लोष केला. घाबरले, पळाले, बंटी बबलीचा टिकाव लागला नाही, अशा आक्रमक घोषणांनी राणांच्या घराचा परिसर शिवसैनिकांनी दणाणून सोडला.

या पार्श्वभूमीवर राणा दाम्पत्याच्या खारमधील घराखाली शेकडो शिवसैनिक जमा झाले आहेत. पोलिसांचा मोठा फौजफाटाही तैनात करण्यात आला आहे. मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांची गर्दी असल्याने पोलिस दलातील वरिष्ठ अधिकारीही राणांच्या घराखाली येऊन थांबले आहेत. वरिष्ठ अधिकारी तेथील सुरक्षेचा आढावा घेत आहेत. परंतु शिवसैनिकांचा प्रचंड जमाव असल्याने परिसरात गोंधळ उडाला आहे. यातून मार्ग काढण्यासाठी पोलिसांकडून राणा दाम्पत्याला घेऊन पोलिस स्टेशनला घेऊन जाण्यासाठी पोलीस प्रयत्न करीत असताना ‘पहिल्यांदा वॉरंट दाखवा, कायदा आम्हालाही कळतो’, अशी आक्रमक भूमिका राणांनी घेतली आहे. त्यामुळे आंदोलन मागे घेऊनही सेना विरद्ध  राणा यांच्यातला सामना अद्याप संपलेला नाही असे दिसत आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!