IndiaPoliticalUpdate : राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट

नवी दिल्ली : भाजपच्या स्थापना दिनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये संसदेतील पंतप्रधान कार्यालयात भेट झाली. दोघांमध्ये जवळपास 20 ते 25 मिनिटे चर्चा झाली असल्याचे वृत्त आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये याआधी मागील वर्षी 17 जुलै रोजी भेट झाली होती. त्यावेळी देखील विविध मुद्यांवर चर्चा झाली होती. राज्याच्या आणि देशाचा विकासाचा मुद्दाही या चर्चेचा भाग असू शकतो असे म्हटले जात आहे. विशेष म्हणजे पवारांनी आयोजित केलेल्या स्नेहभोजनाला काल रात्री नितीन गडकरी यांची उपस्थिती होती आणि आज शरद पवार यांची आणि मोदींची भेट झाली आहे.
विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आज भाजपच्या स्थापना दिनात बिझी असतानाही त्यांची आणि शरद पवार यांची ही भेट झाली. तूर्त तरी भेटीचा विषय नेमका समजू शकलेला नाही. पण राजकीय चर्चा झाली असल्याची दाट शक्यता आहे. राज्यातील परिस्थितीबाबत ही चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांची भेट होते तेव्हा त्याची कायम चर्चा होते. महाविकास आघाडीच्या नेत्यांविरोधात केंद्रीय तपास यंत्रणांनी आक्रमक भूमिका घेतली असल्याचे दिसून येत आहे. मंगळवारी, ईडीने शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची मालमत्ता जप्त केली होती. त्याआधी सकाळीच राज्य सरकारने ईडीच्या अधिकाऱ्यांविरोधात असलेल्या कथित आरोपांची चौकशी करण्यासाठी एसआयटीची स्थापना केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नेते समजले जाणारे अनिल देशमुख आणि नवाब मलिकदेखील तुरुंगात आहेत.
दरम्यान मंगळवारी रात्री शरद पवार यांच्या घरी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. दिल्लीत आमदारांच्या प्रशिक्षण शिबिरात उपस्थित असलेले राज्यातील आमदारांसह खासदारही उपस्थित होते. त्याशिवाय, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीदेखील हजेरी लावली होती. यावेळी झालेल्या अनौपचारीक चर्चेत शरद पवार यांनी राज्यातील सरकार पाडण्याचे प्रयत्न होत असल्याचे म्हटले होते. राज्य सरकार कोणत्याही परिस्थिती कोसळणार नसल्याचे त्यांनी यावेळी म्हटले.