Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

WorldNewsUpdate : दुनिया : मोठी बातमी : श्रीलंकेत हिंसेचा उद्रेक , राष्ट्रपतींनी केली आणीबाणीची घोषणा…

Spread the love

कोलंबो : आर्थिक संकटामुळे बिघडलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर श्रीलंकेत हिंसेचा उद्रेक झाल्यामुळे श्रीलंका सरकारकडून आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रपती गोटाभाया राजपक्षे यांनी शुक्रवारी रात्री उशिरा ही घोषणा केली. श्रीलंका सध्या मोठ्या आर्थिक संकटातून जात आहे. देशात इंधनाचे मोठे संकट असून लोकांना अनेक तास खंडित वीजपुरवठ्याचा सामना करावा लागत आहे. तसेच देशातील परिस्थिती अशी आहे की, कागदाची कमी असल्याने सर्व परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलाव्या लागल्या आहेत. दरम्यान यावरून केल्या जाणाऱ्या आंदोलनाला सरकारने ‘दहशतवादी कृत्य’ कृत्य संबोधून  सरकारने या घटनेसाठी विरोधी पक्षांना जबाबदार धरले आहे. राजधानी कोलंबो, नुगेगोडा या भागांत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पश्चिम प्रांतातही मध्यरात्रीपासून संचारबंदी लागू करण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस महानिरीक्षक अजिथ रोहाना यांनी सांगितले.

शुक्रवारी हजारो निदर्शकांनी थेट राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांच्या निवासस्थानात घुसण्याचा प्रयत्न केल्यानंतर देशात थेट आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. देशभरात तत्काळ प्रभावाने आणीबाणी लागू करण्यात येत असल्याचे राष्ट्राध्यक्षांनी जाहीर केल्याचे वृत्त स्थानिक माध्यमांनी दिले आहे. या आधी गुरुवारी शेकडो निदर्शक राजपक्षे यांच्या निवासस्थानाबाहेर जमले आणि त्यांनी बेट राष्ट्रातील भीषण आर्थिक संकटाचे निराकरण करण्यात अपयशी ठरल्याबद्दल त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. मात्र या आंदोलनात लगेचच हिंसाचार उसळला होता. आंदोलन हिंसक झाल्याने अनेक लोक जखमी झाले होते, वाहने जाळण्यात आली होती. राष्ट्रपतींच्या निवासस्थानाजवळील स्टील बॅरिकेड पाडल्यानंतर पोलिसांनी आंदोलकांवर अश्रुधुराच्या नळकांड्या आणि पाण्याच्या तोफांचा माराही केला. याप्रकरणी अनेकांना अटक करण्यात आली असून कोलंबो शहरातील बहुतांश भागात काही काळ संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

राष्ट्रपतींच्या जीवाला धोका

राष्ट्रपती राजपक्षे यांच्या निवासस्थानाजवळील हिंसाचारात एका अतिरेकी गटाचा हात होता, असे डेली मिररने दिलेल्या वृत्तानुसार राष्ट्रपतींच्या मीडिया विभागाकडून शुक्रवारी जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे. दरम्यान, श्रीलंकेचे वाहतूक मंत्री डिलुम अमुनुगामा यांनी पत्रकारांना सांगितले की, राष्ट्रपतींच्या निवासस्थानाजवळ झालेला हिंसाचार ‘दहशतवादी’ होता. पर्यटन मंत्री प्रसन्ना रणतुंगा यांनी या हिंसाचाराला विरोधी पक्षांशी संबंधित दहशतवाद्यांना जबाबदार धरले आहे.  समगी जन बलवेगया (SJB) आणि जनता विमुक्ती पेरामुना (JVP) यांच्याशी संबंधित दहशतवाद्यांचा यात हात आहे असा आरोप त्यांनी केला तर आरोग्यमंत्री केहेलिया रामबुक्वेला यांनी राष्ट्रपतींच्या जीवाला धोका असल्याचे म्हटले आहे.  दरम्यान, पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणी अटक केलेल्या लोकांची संख्या 54 वर गेली आहे.

सुरक्षेच्या कारणास्तव देशात आणीबाणी लागू करण्याचा निर्णय

दरम्यान देशातील हिंसाचाराच्या वाढत्या घटनेनंतर  पुढील धोका लक्षात घेत राष्ट्राध्यक्षांनी देशात आणीबाणी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘आवश्यक आणि अत्यावश्यक सेवा सुरळीतपणे सुरू राहाव्यात तसेच सुरक्षेच्या कारणास्तव देशात आणीबाणी लागू करण्याचा निर्णय मी घेत आहे’, असे राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे. १ एप्रिल २०२२ या तारखेने हा आदेश जारी करण्यात आला असून संपूर्ण देशात हा आदेश लागू असेल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!