Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला आणखी सहा महिन्याची मुदत वाढ

Spread the love

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेबाबत अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेंतर्गत गरिबांना मोफत धान्य देण्यात येत असून योजनेला आणखी सहा महिने म्हणजेच सप्टेंबर महिन्यापर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री पीयूष गोयल यांनी मोदी सरकारच्या या निर्णयाबाबत माहिती दिली. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेचा आढावा घेऊन या योजनेस आणखी सहा महिने मुदतवाढ देण्यात आली आहे. आता येत्या सप्टेंबर महिन्यापर्यंत रेशन दुकानांच्या माध्यमातून मोफत धान्य वितरण केले जाणार असल्याचे गोयल यांनी नमूद केले.

देशातील कोरोना  काळात प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न  योजनेंतर्गत  मार्च २०२० मध्ये केंद्र सरकारने ही योजना सुरू केली होती. सर्वप्रथम जून २०२० पर्यंत या योजनेतून मोफत धान्य दिले गेले. त्यानंतर सातत्याने या योजनेला मुदतवाढ दिली जात आहे. आता कोरोनाची तिसरी लाट ओसरली असली तरी कोरोनाचे संकट पूर्णपणे टळलेले नाही. कोरोनाच्या चौथ्या लाटेची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ही सर्व स्थिती लक्षात घेत योजनेला सहा महिन्यांसाठी मुदतवाढ दिली गेली आहे. या योजनेचा सुमारे ८० कोटी लोकांना लाभ मिळत असून यात दरमहा प्रतीव्यक्ती पाच किलो धान्य मोफत दिले जात आहे. पंतप्रधान मोदी यांच्या ट्वीटर हँडलवर याबाबत ट्वीटही करण्यात आले आहे. देश सामर्थ्यशाली असण्यासाठी देशातील प्रत्येक नागरिक सामर्थ्यवान असण्याची आवश्यकता आहे आणि म्हणूनच गरीब कल्याण योजनेला मुदतवाढ दिली जात आहे, असे या ट्वीटमध्ये नमूद करण्यात आले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!