Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraPoliticalUpdate : एमआयएमच्या ऑफरवर मुख्यमंत्र्यांचीही प्रतिक्रिया , खा . इम्तियाज जलील सर्व नेत्यांना भेटणार

Spread the love

मुंबई : एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला युतीची ऑफर दिल्यानंतर महाविकास आघाडीकडून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत . दरम्यान एमआयएमच्या या प्रस्तावावरून आधी खा. संजय राऊत , चंद्रकांत खैरे आणि आ. अंबादास दानवे यांच्यानंतर आता खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली असून एमआयएम सोबत युती होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे . एमआयएम पक्षाने आघाडीसाठी दिलेली ऑफर हा कट असल्याचा आरोप ठाकरे यांनी केला आहे.तर दुसरीकडे युतीचा प्रस्ताव घेऊन आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे नेते खा. शरद पवार आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट घेणार असल्याचे म्हटले आहे.


शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानासाठी उद्धव ठाकरेंनी पक्षाच्या सर्व खासदारांना आणि जिल्हाप्रमुखांना संबोधित केले . यावेळी त्यांनी भाजपावर जोरदार टीका केली. बुडाखाली सत्ता हवी असून ही एका घातक हुकूमशाहीची नांदी आहे अशी टीका उद्धव ठाकरेंनी यावेळी केली. “आपण लोकसभा, विधानसभा आणि काही पालिका निवडणुका सोडल्या तर गांभीर्याने घेत नाही. पण आता तसं करुन चालणार नाही. भाजपाचं पंचायत ते संसद असं स्वप्न असून या सत्तेच्या ठिकाणी दुसरं कोणी असता कामा नये या त्यांच्या धोरणाला रोखलं पाहिजे. आपल्या बुडाखाली संपूर्ण देश असला पाहिजे या अट्टहासाने ते चालले आहेत. ही एका घातक हुकूमशाहीची नांदी आहे. हे आपलं हिंदुत्व नव्हतं,” असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. आपण राजकारणासाठी हिंदुत्वाचा वापर करत नाही हा मुख्य फरक आहे असंही ते म्हणाले.

सध्या आपल्याला बदनाम करण्याचं षडयंत्र सुरु आहे….

या विषयावर आपली प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे कि , सध्या आपल्याला बदनाम करण्याचं षडयंत्र सुरु आहे. शिवसेनचे  हिंदुत्व महाराष्ट्राभर पोहोचवा, एमआयएमचा कट उधळून लावा असे आदेशच  उद्धव ठाकरे यांनी खासदारांना दिले आहेत. भाजपवर टीका करताना मुख्यमंत्री म्हणाले कि , “अफजल गुरुला फाशी देऊ नको म्हणणाऱ्या मेहबुबा मुफ्तीसोबत सत्तेसाठी मांडीघाशी केली तितका निर्लज्जपणा शिवसेनेत येणे  शक्य नाही. मी तो कदापि येऊ देणार नाही. सत्ता मिळत असली तरी एमआयएमसोबत जाणार नाही,” असं उद्धव ठाकरे म्हणाले. आपल्याला अनेक ऑफर  येत आहेत. पण आपण महाविकास आघाडी म्हणून आम्ही एक आहोत. महाविकास आघाडीचा धर्म आपल्याला पाळायचा आहे. या आधी काही जणांनी घात केल्याचेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

एमआयएम भाजपची बी टीम

एमआयएम भाजपची बी टीम आहे. एमआयएम सोबत युती होणार नाही, असे  स्पष्ट करताना त्यांनी म्हटले आहे कि ,  विरोधक काय कुरापती  करत आहेत हे आपण लक्षात घेतले  पाहिजे. विरोधक विरोध करत राहणार पण आता तितक्याच ताकदीने  प्रत्युत्तर दिले  पाहिजे. विरोधकांची हवा पहिल्या पेक्षा कमी झाली आहे. लोकांनाही विरोधकांचे डावपेच लक्षात येत आहेत. युपीमध्ये आधीपेक्षा त्यांचे आकडे कमी झाले आहेत हे त्यांनी लक्षात ठेवावे. आपल्या १२ आमदारांच्या फाईलवर अद्याप निर्णय नाही. हे लोकशाहीला न पटणारे असून  आता आपण घराघरात जाणार आहोत.  आपली कामे  लोकांना सांगा आपण घेतलेले निर्णय घराघरात पोहोचवा, असेही  ठाकरे यांनी म्हटले आहे.

मोहन भागवतांच्या नावापुढे खान किंवा जनाब जोडणार आहात का?

“शिवसेना मुस्लीमधार्जिणी झाल्याचं म्हणत आहेत. मी काही मोहन भागवत यांची वाक्यं घेऊन बसलो आहेत. जर मला जनाब म्हणणार असाल तर तुमच्या सरसंघचालकांना काय बोलणार आहात? मोहन भागवतांच्या नावापुढे खान किंवा जनाब जोडणार आहात का? आधी हिंदुत्व काय ते समजून घ्या,” असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं. तुमची सत्तेची स्वप्नं आम्ही चिरडून टाकली म्हणुन आम्ही मुस्लीमधार्जिणी असू तर मोहन भागवतांनी काय सांगितलं आहे ते ऐका असं सांगत उद्धव ठाकरेंनी त्यांची काही वक्तव्यं वाचून दाखवली. तसंच आरएसएसला मुस्लीम संघ की राष्ट्रीय मुस्लीम म्हणायचं का? असंही त्यांनी विचारलं.

मोहन भागवतांच्या वक्तव्यावर मोदी, अमित शाह आणि ज्यांच्या तोंडातून गटारगंगा वाहत असते ते उत्तर देऊ शकतात का? अशी विचारणा उद्धव ठाकरेंनी केली. शिवसेनेने हिंदुत्व सोडलं असा भ्रम निर्माण केला जात आहे. एक दिवस कदाचित हिंदुत्वाचे बाप आम्हीच आहोत असंही म्हणायला कमी करणार आहे. हिंदू धर्म आम्हीच स्थापन केला असंही म्हणतील पण तो त्यांचा मानसिक आजात असेल. आपला तो बाब्या आणि दुसरा तो गुंड अशी त्यांची मानसिकत झाली असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली.

एमआयएमची ऑफर भाजपाकडूनच आल्याची १०० टक्के खात्री

“दुसऱ्यांनी खाल्लं तर शेण आणि आम्ही खाल्लं तर श्रीखंड हा प्रकारही लोकांच्या नजरेत आणला पाहिजे. यांचे नुसते जबाब घेतले तर तळपायाची आग मस्तकात जाते. लगेच लोकशाहीचा खून झाल्याचा आरोप करतात,” असा संताप उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली. पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, एमआयएमसोबत युती होणार नाही याचा पुनरुच्चार उद्धव ठाकरेंनी यावेळी केला. झोपेतही एमआयएमसोबत युती करणार नाही. ही भाजपाकडूनच ऑफर आल्याची १०० टक्के खात्री आहे. एमआयएम भाजपाची बी टीम असल्याची खात्री झाली आहे. धोका आहे त्यांना बदनाम आणि नामशेष करणं ही त्यामागची चाल आहे असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला. औरंगजेबाच्या थडग्यावर डोकं टेकणारी जी औलाद आहे, तिच्यासोबत छत्रपतींचा महाराष्ट्र आणि त्यांचा सैनिक म्हणवणारा शिवसैनिक हा कदापि जाणार नाही आणि मी जाऊ देणार नाही असा पुनरुच्चार उद्धव ठाकरेंनी केला. यावेळी त्यांनी भाजपाचं मुस्लीमप्रेम जनतेसमोर आणण्याचं आवाहनही केलं. शिवसैनिक हिंदुत्वाचा अंगार असतो हे त्या भंगारांना दाखवून द्या असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!