Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadPoliticalUpdate : युती करण्याच्या ‘एमआयएम’ च्या ऑफरवरून शिवसेनेची संतप्त प्रतिक्रिया

Spread the love

औरंगाबाद : सातत्याने भाजपची बी टीम म्हणून हिणवल्या जाणाऱ्या एमआयएमने थेट महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत युती करण्यासाठी तयार असल्याची खुली ऑफर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी दिली आहे. राज्यात येऊ घातलेल्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात नवी सत्तासमीकरणे जुळण्याची चर्चा सुरू झाली असून हाच धागा धरत एमआयएमने  राष्ट्रवादी काँग्रेसला हि  ऑफर दिली आहे. त्यावरून शिवसेनेकडून तीव्र प्रतिक्रिया आली आहे.


आपल्या या ऑफरबाबत वृत्त वाहिन्यांशी बोलताना खा. इम्तियाज जलील यांनी म्हटले आहे कि , एमआयएमवर नेहमीच भाजपला छुपी मदत केल्याचा आरोप काँग्रेस , राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून करण्यात येतो मात्र वस्तुस्थिती अशी आहे कि , आम्ही आमचा पक्ष वाढवण्यासाठी सातत्याने निवडणूक लढवतो . आम्ही अनेकदा काँग्रेसशी युती करण्याची तयारी दर्शविली परंतु आम्हाला राजकीय दृष्ट्या नेहमीच अस्पृश्य समजले जाते त्यामुळे आम्ही पुन्हा एकदा भाजपच्या विरोधात भाजपविरोधी कोणत्याही पक्षाशी युती करण्यास तयार आहोत.  राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी खा. इम्तियाज जलील यांच्या आईचे निधन झाल्यामुळे त्यांचे सांत्वन करण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी आज भेट दिली तेंव्हा अनौचारिक चर्चेत बोलताना जलील यांनी एमआयएम आगामी निवडणुकीत काँग्रेस -राष्ट्रवादीसोबत युती करण्यास तयार असल्याची खुली ऑफर दिली.

काँग्रेसलाही दिलं युती करण्याचं आव्हान

दरम्यान, यावेळी बोलताना जलील यांनी काँग्रेसला देखील युती करण्याचे  आव्हान दिले  आहे. “आम्ही कुणालाही नको आहोत. फक्त मुस्लिमांची मतं हवी आहेत. कशाला राष्ट्रवादी? काँग्रेस स्वत:ला धर्मनिरपेक्ष मानतो. त्यांनाही मुस्लीम मतं हवी आहेत. तर मग यावं काँग्रेसनं, आपण युती करु”, असं जलील म्हणाले. “सर्वात जास्त कुणी देशाचं नुकसान करत असेल, तर ती भाजपा आहे. त्यांना पराभूत करण्यासाठी जे काही लागतं, ते आम्ही करायला तयार आहोत. उत्तर प्रदेशातही सपा, बसपासोबत आम्ही बोलणी केली होती. पण त्यांना मुस्लिमांची मतं हवी आहेत, पण एमआयएम पक्ष नको. म्हणून मी ही ऑफर दिली आहे”, अशा शब्दांत जलील यांनी एमआयएमची भूमिका स्पष्ट केली आहे.

शिवसेनेकडून तीव्र प्रतिक्रिया

खा. इम्तियाज जलील यांच्या या ऑफरवर शिवसेनेचे नेते खा . संजय राऊत , शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे आणि आ. अंबादास दानवे यांनी आपल्या तीव्र प्रतिक्रिया देताना रझाकारी पक्षाशी आणि औरंगजेबाच्या कबरीवर नतमस्तक होणाऱ्या एमआयएमशी आमची युती कदापि होणार असे म्हटले आहे. दरम्यान चंद्रकांत खैरे यांनी खा. इम्तियाज जलील यांनी हि ऑफर भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून दिली असल्याचा आरोप केला असून त्यांनी म्हटले आहे कि , २०२४ पर्यंत महाविकास आघाडीचे सरकार राज्यात यशवीपणे काम करणार आहे . त्यात खोड घालण्यासाठी फडणवीस यांनी खा. जलील यांना हाताशी धरून हि खेळी केली आहे पण त्याला महाविकास आघाडी भीक घालणार नाही. राज्यातील राष्ट्रभक्त मुसलमान मतदार आमच्यासोबत आहेत त्यामुळे आम्हाला एमआयएम सारख्या रझाकारी पक्षाची गरज नाही.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!