Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraPoliticalUpdate : देवेंद्र फडणवीस यांच्या ‘पेन ड्राईव्ह’ आहे तरी काय ?

Spread the love

मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजपचे  विरोधी पक्ष नेते माजी मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी तब्बल सव्वाशे तासांचा ‘पेन ड्राईव्ह’ विधानसभेच्या अध्यक्षांना देऊन राज्याच्या राजकारणात नवीन ट्विस्ट आणला असून त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना पुन्हा एका नवीन कामात गुणवले आहे . या ‘पेन ड्राईव्ह’  प्रकरणामुळे राज्याचे  गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेऊन यावर मात्रा काय असेल याची चर्चा केली असल्याचे वृत्त समोर येत आहे. आता मुळात या ‘पेन ड्राईव्ह’  मध्ये आहे तरी काय ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.


विशेष म्हणजे राज्यात शिवसेनेने भाजपशी फारकत घेतल्यानंतर ” मी पुन्हा येईन …” अशी खूणगाठ बांधलेले देवेंद्र फडणवीस  आणि त्यांची टीम रोज नवनवीन आरोप करून महाविकास आघाडीच्या मागे असा भुंगा लावत आहेत ,कि  महाविकास आघाडीच्या तीन पक्षीय सरकारला काम करणे अवघड झाले आहे . तसेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पहिली दोन अडीच वर्षे कोरोनाच्या संकटातून बाहेर पडायलाच लागली आहेत . दरम्यानच्या काळात कधी स्वकीयांच्या नाराजीमुळे तर कधी स्वतःच्याच पक्षातील मंत्र्यांच्या आक्षेपार्ह कारवायांमुळे सरकारच्या नाकी नऊ आलेले आहेत. त्यात केंद्रात भाजपचे सरकार , सरकारच्या प्रत्येक कार्यात मिठाचा खडा टाकणारे राज्यपाल आणि विरोधकांची कोल्हेकुई यामुळे महाविकास आघाडीचे सरकार कमालीचे  त्रस्त झाले आहे. त्यातच ‘पेन ड्राईव्ह’ च्या माध्यमातून फडणवीस यांनी नव्या आरोपांचा भोपळा फोडल्यामुळे महाविकास आघाडीमध्ये खळबळ उडाली आहे.

याबद्दल गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी,  “मी अजून पेन ड्राईव्ह पाहिलेला नाही. त्यामुळे आता काहीही बोलता येणार नाही. याबद्दल उद्या सभागृहामध्ये उत्तर देईल, असे बोलून त्यांनी सिल्व्हर ओकवर जाऊन आपल्या नेत्याशी खलबते सुरु केली आहेत.

देवेंद्र फडणवीस नटसम्राट असल्याची पटोलेंची बोचरी टीका…

दरम्यान महाविकास आघाडीचा तिसरा घटक पक्ष असलेल्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी , भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर तोफ डागत ,  “आमचे मित्र देवेंद्र फडणवीस नटसम्राट आहेत. कहाणी बनवण्यात हुशार आहेत.  ते राज्याचे मुख्यमंत्री असताना फोन टॅपिंग मध्ये त्यांनी पोलिसांचा वापर केला, त्यावर बोलावे’ असे म्हटले आहे. पोलीस अधिकाऱ्यांचा राजकीय फायद्यासाठी वापर करुन विरोधी पक्षाच्या लोकांवर कारवाई करण्याचे पाप देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात सुरु झाले. वरिष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांना हाताशी धरून राजकीय नेत्यांचे बेकायदेशीर फोन टॅपिंग केले हे सिद्ध झाले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे परंतु त्यांना टॅपिंगचे कुणी आदेश दिले होते हे उघड होण्यासाठी चौकशी झाली पाहिजे अशी मागणी करत बॉम्बस्फोटातील आरोपी ईक्बाल मिर्चीच्या पैशावर पक्ष चालवणारे कोण आहेत? त्यांची चौकशी करून त्यांच्यावरही कारवई करा, अशी मागणीच नाना पटोले यांनी केली.

देवेंद्र फडणवीस यांचे नेमके आरोप काय आहेत ?

आज विधानसभेत तब्बल सव्वाशे तासांचा ‘पेन ड्राईव्ह’ सादर करताना  या स्टिंगमधील महत्त्वाचा भाग २९ वेगवेगळ्या माध्यमांतून पाहता येईल असा आरोप करून फडणवीस यांनी म्हटले कि ,  भाजपा नेते गिरीश महाजन यांच्याविरोधात खोटे कुंभाड रचून एकूण २८ लोकांवर कसा एफआयआर दाखल करण्यात आला, याचा संपूर्ण लेखाजोखा त्यात आहे. शिवाय, पडद्याआडून कोण कोण मोठे नेते कसे खेळ करीत आहेत, हेही या स्टिंग ऑपरेशनमधून पुरते स्पष्ट होते आहे. या प्रकरणातील संपूर्ण एफआयआर या वकिलांनीच तयार करून दिला असून, रेडच्या वेळी संपूर्ण बारकाईने नियोजन त्यांनीच केलेले आहे. ड्रग्जच्या व्यापाराचा उल्लेख करून मोक्का लावायला कसा सांगितले, त्यातून शासन पातळीवर कशा बैठका झाल्या, त्यात मुख्यमंत्र्यांपासून ते पोलिस आयुक्त, पोलीस महासंचालक कसे उपस्थित होते, याचा संपूर्ण उलगडा या वकिलांनी केला आहे. प्रकरण निगेटिव्ह असताना ते आपण कसे पॉझिटिव्ह केले, याची संपूर्ण कथा ते यातून सांगताना दिसत आहेत.

खरे तर फडणवीस यांच्या मते हि महाविकास आघाडीच्या सरकारने केलेली वेब सिरीज आहे.  जी विधानसभेच्या प्लॅटफॉर्मवर फडणवीस यांनी सादर केली आहे . त्यांच्या मते ‘पवार साहेबांना कसे देवेंद्र फडणवीस आणि भाजपाच्या इतर नेत्यांना संपवायचे आहे, त्यासाठी कोणते निर्देश त्यांना प्राप्त झाले आहेत, हे सर्व करण्यासाठी मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी संजय पांडे यांना कसे बसविण्यात आले. त्यासाठी त्यांनी कशी कबुली दिली, याचे संपूर्ण तपशील त्यांनी विस्तृतपणे सांगितले आहेत.

या वेबसिरीजच्या पटकथेनुसार….

मीडियाला कोणत्या बातम्या लीक करायच्या, आधीच ठेवलेल्या पुराव्यांचे चित्रीकरण कसे करायला लावायचे, याचेही तपशील त्यात आहेत. पुरावे प्लांट करताना कुठेही कॅमेरे नाहीत, यासाठी आधीच रेकी कशी करण्यात आली, याचीही कबुली ते देत आहेत. तसंच, अनिल गोटे यांचा या वकिलांशी प्रत्यक्ष संवादही आहेत, फोन कॉल्स आहेत. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे झालेल्या भेटी-बैठकी याचे  तपशील त्यात आहेत. साहेब, कसे कधीच पिक्चरमध्ये येत नाहीत आणि उगाच पोलीस स्टेशन डायरीत नोंद नको, म्हणून पडद्याआडून काय-काय निर्देश देतात, याची संपूर्ण कथा त्यांनी सांगितली आहे.

देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, जयकुमार रावल, सुभाष देशमुख, सुधीर मुनगंटीवार, चंद्रशेखर बावनकुळे इत्यादी नेते कसे टार्गेटवर आहेत आणि त्यांना कसे-कसे संपविण्यात येणार आहे, त्यातून कुणाचे काय लाभ होणार आहेत, याचेही तपशील फडणवीस यांनी या पेन ड्राईव्ह मध्ये दिले  असल्याचे सांगण्यात येत आहे.

सरकारी वकिलांनी फेटाळले आरोप

दरम्यान ज्या सरकारी वकिलांचा उल्लेख फडणवीस यांनी केला आहे. त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहे, या ऑडिओ क्लिपमध्ये कोणतेही तथ्य नाही, असा दावा विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी केला आहे. तसेच, कोणत्याही चौकशीला सामोरे  जाण्यासाठी तयार आहोत, असेही चव्हाण म्हणाले. राज्य सरकारचे विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांचे कार्यालय हे विरोधकांची कत्तल कशी करायची याचं कारस्थान शिजण्याचं मुख्य ठिकाण आहे. त्याच ठिकाणी गिरीश महाजन यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्याचा कट रचल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपांना प्रवीण चव्हाण यांनी माध्यमांशी बोलत असता उत्तर दिले आहे. मुळात असा प्रकार घडला होता का? असा प्रश्नच त्यांनी उपस्थितीत केला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!