Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadNewsUpdate : “पंतप्रधान मोदींनी राज्यपाल कोशारी यांची उचलबांगडी करावी .. अन्यथा धोतर फेडू !” : शिवप्रेमींमध्ये संताप

Spread the love

औरंगाबाद : औरंगाबादेत एका कार्यक्रमात बोलताना काल राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी ” समर्थ के बिना , शिवाजी को कौन पूछेगा …” असे वादग्रस्त विधान केल्यामुळे राज्यपालांच्या विरोधात टीकेची झोड उठली आहे . या प्रकरणात थेट भाजपचे खासदार उदयनराजे यांच्यापासून ते खा. सुप्रिया सुळे यांच्यासह सोशल मीडियावर अनेकांनी थेट टीका केली आहे . औरंगाबाद येथील मराठा क्रांती मोर्चाचे युवा नेते विनोद पाटील यांनी तर या राज्यपालाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उचलबांगडी करावी अन्यथा आम्ही शिवभक्त त्यांचे धोतर फेडण्यास मागे पुढे पाहणार नाही असा इशारा दिला आहे.


आपल्या फेसबुक पोस्टमध्ये विनोद पाटील यांनी म्हटले आहे कि , “काल राज्याचे राज्यपाल यांनी नविन जावईशोध लावला. पदावर आहात, ज्येष्ठ आहात म्हणून मुलाहिजा करतो. छत्रपती शिवरायांबद्दल भावना, संवेदना नसतील, तर त्याविषयी बोलताना नको त्या विषयात नाक खुपसू नये. आपले छत्रपतींविषयीचे खरे विचार काल आपसूक बाहेर आले. आपलं वय आणि वक्तव्य बघता तुम्हाला निवृत्तीची गरज आहे, असे आम्हाला वाटते. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना मी आवाहन करतो की तात्काळ या बदफैली राज्यपालांची उचलबांगडी करावी व छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या वक्तव्याबद्दल जाहीर माफी मागावी. अन्यथा आम्ही सर्व शिवभक्त आपले धोतर फेडण्यास मागेपुढे पाहणार नाही. इशारा समजा ! ”

शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास यांचा अर्था अर्थी संबंध नाही : प्रदीप सोळुंके

राज्यपालांच्या वक्तव्याचा  समाचार घेणारा व्हिडीओ शिव व्याख्याते प्रदीप सोळुंके यांनी जरी केला असून त्यात म्हटले आहे कि , शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास यांचा दुरान्वयानेही संबंध नाही हे सांगताना काही तार्किक मुद्दे मांडले आहेत . त्यांनी म्हटले आहे कि , जसे वारकरी विठ्ठलाला गुरु मानतात आणि एकमेकांना राम कृष्ण हरी असे म्हणतात , शीख अनुयायी गुरु ग्रंथ साहिब आणि गुरु नानक यांना गुरु मानतात आणि परस्परांना सत श्री अकाल असे म्हणतात , बाबासाहेबांचे अनुयायी एकमेकांना जय भीम असे म्हणतात , संत सेवालाल यांचे अनुयायी एकमेकांना जय सेवालाल म्हणतात …शिवाजी महाराजांचे अनुयायी जय जिजाऊ म्हणतात , शिवाजी महाराजांचा जय घोष हर हर महादेव असा होता तर  समर्थ रामदास यांचा जय घोष ” जय जय रघुवीर समर्थ !! ” असा आहे शिवाय ते रामाची आराधना करायचे तर  शिवाजी महाराजांचे कुलदैवत तुळजा भवानी होती त्यांनी कधीही रामाचा जयघोष केला नाही . आणि सर्वात महत्वाचे ते जर शिवाजी महाराजांचे गुरूच असते तर महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी ते हमखास उपस्थित असते ( तेंव्हा त्यांनी काय रजा पाठवली होती का ? ) थोडक्यात काय तर समर्थ रामदास कधीही शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते.

शिवरायांच्या पुढे नतमस्तक होऊन राज्यपालांनी माफी मागावी : श्रीमंत कोकाटे

या विषयावर एका लेखाद्वारे आपली प्रतिक्रिया देताना इतिहासकार डॉ. श्रीमंत कोकाटे यांनी म्हटले आहे कि ,  रामदासाला पुन्हा पुन्हा शिवरायांच्या गुरुस्थानी थापण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्याची आणि शिवरायांची कधीही भेट झाली नाही, असे महान इतिहासकार सांगतात. समजा भेट झाली असे गृहीत धरले, तरी तो गुरु होऊ शकत नाही. कारण सार्वजनिक जीवनात अनेक लहान मोठे लोक एकमेकांना भेटत असतात, म्हणून ते एकमेकांचे गुरु होऊ शकत नाहीत, केवळ भेट हाच गुरु-शिष्य यासाठी निकष नाही. जिजाऊ याच शिवरायांच्या गुरु आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात…

डॉ . कोकाटे यांनी पुढे म्हटले आहे कि , गुरुपदासाठी अट्टाहास का ? डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या ‘जातिनिर्मूलन’ या अभिजात ग्रंथात म्हणतात की , “ब्राह्मणात कोणीही क्रान्तीकारक/महापुरुष झाला नाही.” त्यामुळे सनातन्यांनी एक युक्ती शोधून काढली, आपल्यात कोणी महापुरुष झाला नाही तर मग आपण महापुरुषांचे गुरुच होऊन टाकायचे, म्हणजे आपोआप बहुजन महापुरुषांच्या कार्याचे श्रेय ब्राह्मणाकडे जाते आणि बहुजनांवर वर्चस्व प्रस्थापित करता येते. शिवाजीराजानी रामदासाला दान दिले, म्हणजे आजच्या राज्यकर्त्यांनी ब्राह्मणभोजन, ब्राह्मणांना देणग्या, ब्राह्मणांना पुरस्कार दिले पाहिजेत, ही बिगर श्रमाची भिकारडीवृत्ती जोपासण्यासाठी शिवरायांनी रामदासाला देणग्या दिल्या, असा सांगण्याचा ब्राह्मणी खटाटोप आहे, रामदासाचे उदात्तीकरण करण्यासाठी रामदासी संप्रदायाने अनेक खोट्या कथा तयार केलेल्या आहेत, हे शिवरायांचे मावळे समजून घेतील, ही अपेक्षा !

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे बेताल, निराधार वक्तव्य करण्यासाठी कुप्रसिद्ध आहेत. त्यांनी काल औरंगाबादच्या सभेत “रामदास गुरु होते म्हणून शिवाजी मोठे झाले, अन्यथा शिवाजीला कोणी विचारले नसते” असे वक्तव्य करून छत्रपती शिवाजी महाराजांचा घोर अपमान केलेला आहे. रामदासाला शिवाजीराजांचे गुरु संबोधने ही विकृती आहे, हा पागलपना आहे. त्यांनी असे वक्तव्य करून राज्यपाल पदाची प्रतिष्ठा धुळीस मिळवली आहे. शिवरायांच्या पुढे नतमस्तक होऊन त्यांनी माफी मागावी, असेही त्यांनी म्हटले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!