Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

EducationNewsUpdate : दहावी -बारावीच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन तीव्र , परीक्षा ऑनलाईन घेण्याची मागणी

Spread the love

मुंबई : दहावी आणि बारावीची परीक्षा ऑफलाईन न घेता ऑनलाईन घ्यावी या मागणीसाठी धारावीमध्ये शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घरासमोर विद्यार्थ्यांनी आंदोलन केल्यानंतर संतप्त विद्यार्थ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचे वृत्त आहे. दरम्यान याच विषयावरून मुंबई बरोबरच नागपूर, उस्मानाबाद येथेही विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. शाळा ऑनलाईन असताना, परीक्षा ऑफलाईन का? असा सवाल आंदोलक विद्यार्थांकडून केला जात आहे.


या मागणीसाठी शेकडो विद्यार्थी रस्त्यावर आक्रमकपणे उतरले असून, बसच्या काचा देखील फोडण्यात आल्या आहेत. दरम्यान, वृत्त वाहिन्यांच्या माहितीनुसार धारावीत मोठ्या संख्येने विद्यार्थी जमलेले आहेत. यंदा परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घ्यावी अशी त्यांची मागणी आहे. याबाबत कालच शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी, परीक्षा ऑफलाईन आणि वेळापत्रकानुसारच होणार असल्याचे सांगितले होते . मात्र हा निर्णय विद्यार्थ्यांना मान्य नाही. त्यावरून सोशल मीडियावर देखील विद्यार्थ्यांकडून या विरोधात प्रतिक्रिया उमटल्या होत्या.

याच विषयावरून आज मुंबईत विविध भागातून विद्यार्थी धारावीत जमले व त्यांनी आंदोलनास सुरूवात केली. पोलीस प्रशासन या विद्यार्थ्यांना नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र विद्यार्थ्यांची संख्या जास्त असून, विद्यार्थी ऐकण्याच्या मनस्थितीत दिसत नसल्याने, पोलिसांना बळाचा वापर करावा लागत आहे.तर, दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच होतील. विद्यार्थी संख्या बरीच जास्त असल्याने ऑनलाइन परीक्षा शक्य नाही. असे राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी स्पष्ट केले आहे.

आम्ही चर्चेसाठी तयार आहोत :  वर्षा गायकवाड

या आंदोलनावर शालेय शिक्षणमंत्री वर्ष गायकवाड यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे कि , “काही मुलांची मागणी ऑनलाइन परीक्षा घेण्याची आहे, तर काहींची मागणी ऑफलाइन परीक्षा घ्या, अशी आहे. महाराष्ट्रातील भौगोलिक परिस्थिती वेगवेगळी आहे. त्यामुळे परीक्षा घेण्यात अडचणी येत आहेत. महाराष्ट्रात १०वी आणि १२वीच्या परीक्षेसाठी बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ३० लाखांपेक्षा जास्त आहे. राज्यभर एकाच दिवशी एकाच वेळी परीक्षा घेतली जाते. राज्यातील आदिवासी भागात आणि खेडेगावात लोक राहतात. गेल्या दोन वर्षात करोनामुळे बरीच परिस्थिती बदलली आहे. विद्यार्थ्यांवर देखील करोना आणि परीक्षा असं दुहेरी टेन्शन आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या हितासाठी आम्ही परीक्षेचा वेळ वाढवण्यासारखे निर्णय घेत आहोत.”

“विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी दूर जावे  लागू नये, यासाठी ते शिकत असलेल्या शाळांमध्ये परीक्षा घेण्यासाठी आमचे प्रयत्न सूरू आहेत. विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत आम्हाला कोणतीही रिस्क घ्यायची नाही, त्यामुळे कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आम्ही विचार करतोय, तज्ज्ञांशी चर्चा करतोय,” तसेच “आज झालेल्या मोर्चानंतर मी त्यांच्या संघटनेच्या प्रमुखांशी बातचीत केली. त्यांना मी चर्चेसाठी बोलावले आहे.  त्यांचे  म्हणणे आम्ही ऐकून घेऊ. विद्यार्थ्यांच्या हितासाठी आम्ही चर्चा करू. १०वी आणि १२वीच्या परीक्षा लवकर घेण्याचा आमचा मानस आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांच्या पुढील वर्गातील प्रवेश प्रक्रिया लांबणीवर पडणार नाहीत,” असे ही त्यांनी म्हटले आहे.

काही चुकीचे माणसे  या आंदोलनाच्या मागे असू शकतात : बच्चू कडू

या पार्श्वभूमीवर राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आपली प्रतिक्रिया देताना म्हटले आहे कि , “खरे  तर हिंदुस्थानी राजा म्हणून कोणीतरी या आंदोलनाची सुरूवात केली होती. त्यांच्या मागण्या ऑनलाईन परीक्षा घेऊ नका किंवा रद्द करा परीक्षा अशा काही मागण्या आहेत. आपण निश्चितच त्यांची नेमकी मागणी काय आहे आणि या आंदोलनाचे  नेमके  कोणी नियोजन केलं हे पाहू. पण शिक्षण विभागाचं काम आहे आणि आम्ही विद्यार्थ्यांच्या हिताचे  काम करू. कोणी त्याची मागणी करण्याची गरज नाही. शिक्षण विभाग यामध्ये परीपूर्ण आहे. विद्यार्थ्यांचे  भले कसे  होईल? त्यांचे शैक्षणिक वर्ष वाया कसे  जाणार नाही, याचाच आम्ही विचार करत आहोत.”

“ज्यांचा शिक्षणाशी संबंध नाही अशी काही चुकीचे माणसे  कदाचित या आंदोलनाच्या मागे असू शकतात. परंतु आपण पडताळणीशिवाय हे सत्य मानणार नाही. विद्यार्थ्यांनी अशा पद्धतीच्या वळणावर जाऊ नये. विद्यार्थ्यांनी एकाएकी हे आंदोलन केलेलं आहे. त्यांनी जर अगोदर निवेदन दिले  असते  तर कदाचित आपण त्यांना चर्चेला देखील बोलावले  असते. पोलिसांना देखील आमचे  सागणे  आहे की त्यांनी हे आंदोलन अतिशय शांतपणे हाताळावे , कारण ते विद्यार्थी आहेत. त्यांना भविष्यात काही अडचण निर्माण होऊ नये, याची काळजी त्यांनी घेतली पाहिजे. आंदोलनाच्या मागण्यासंदर्भात आम्ही चर्चा करणार आहोत.” अशी माहिती राज्यमंत्री बच्चू कडू यांनी माध्यमांना दिली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!