Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadNewsUpdate : औरंगाबाद विमानतळाच्या नामांतरासाठी मुख्यमंत्र्यांचा केंद्राकडे आग्रह

Spread the love

औरंगाबाद : औरंगाबादकरांना सांस्कृतिक कार्यक्रम देणाऱ्या संत एकनाथ महाराज रंगमंदिराच्या नूतनीकरणानंतर या वास्तूचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले. गेल्या अनेक दिवसांपासून या रंगमंदिराच्या नूतनीकरणाचे काम चालू होते. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपली ऑनलाईन उपस्थिती दर्शवून उपस्थितांना संबोधित केले. यावेळी बोलताना त्यांनी औरंगाबादमधील विमानतळाला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला असून लवकरच केंद्राची मंजुरी मिळेल अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.


या निमित्ताने बोलताना मुख्यमंत्री म्हणाले कि ,“एखादी गोष्ट होऊ शकत नाही असे नाही पण लक्ष द्यायला हवे. मार्ग काढण्याची जिद्द असली पाहिजे. ती जिद्द आपण दाखवत आहोत. इतरांची गोष्ट ठिक आहे. निवडणुका आल्या की बोलायचे, टाळ्या वाजवून घ्यायच्या, मते मिळवायची आणि वचनाकडे पाठ फिरवायची. पण शिवसेना त्या संस्कृतीतील नाही. संभाजीनगरच्या विमानतळाचे नाव छत्रपती संभाजी महाराज विमानतळ करण्याचा प्रस्ताव विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आलेला ठराव आपण दिल्लीला पाठवला आहे. आता दिल्लीला परत एकदा आठवण करुन देण्याची गरज आहे. आमच्या विमानतळाचे आम्हाला बारसे करुन हवे आहे आणि हा आनंद केंद्र सरकार लवकरात लवकर दिल्याशिवाय राहणार नाही.”

औरंगाबाद येथील  संत एकनाथ रंग मंदिराच्या लोकार्पण कार्यक्रमप्रसंगी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे  मुख्यमंत्री  बोलत होते. या संत एकनाथ रंग मंदिराच्या लोकार्पण कार्यक्रमास उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई, खासदार इम्तियाज जलील, सर्वश्री आमदार अंबादास दानवे, हरिभाऊ बागडे, प्रदीप जयस्वाल, संजय शिरसाट, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मनपा आयुक्त आस्तिककुमार पांडेय, चंद्रकांत खैरे, नंदकुमार घोडेले, गजानन बारवाल, राजू वैद्य, शिल्पाराणी वाडकर, राजेंद्र जंजाळ, राजू शिंदे, अंकिता विधाते आदींची उपस्थिती होती.

प्रशासनाच्या कार्याचे कौतुक

दरम्यान कोविडच्या बंद काळाचा चांगल्याप्रकारे उपयोग करून संत एकनाथ रंग मंदिराचे नूतनीकरण केल्याबद्दल प्रशासनाच्या कार्याचे कौतुक मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले. शहराच्या विकासासाठी मुलभूत सोयीसुविधा देताना सिनेमागृहे, उद्याने, नाट्यगृहे यांच्याकडे दुर्लक्ष होते. परंतु सिनेमागृहे, उद्याने, नाट्यगृहे यांची जीवनात आवश्यकता असतेच. शहरातील संत एकनाथ रंग मंदिरातून संत एकनाथ महाराजांनी दिलेला संदेश कलेच्या माध्यमातून सर्वदूर पोहचण्यासाठी मदत होणार आहे. या सेवेचे लोकार्पण झाल्याचा आनंद आहे. या सेवेबरोबरच शहरासाठी महत्त्वाचे असलेले गुंठेवारी, नवीन पाणीपुरवठा योजना, पैठण येथे संतपीठ आदीप्रकारचे निर्णय शासनाने घेतलेले आहेत. त्याचबरोबर पैठण येथे सुंदर अशा प्रकारचे उद्यानही शासन करत आहे. विधान मंडळाने औरंगाबादच्या विमानतळाला छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असे नामकरण करण्याचा ठराव मंजूर करून केंद्र शासनाला पाठविलेला आहे. केंद्र शासनही त्यास मान्यता देईल, असा विश्वास मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.

पालकमंत्री देसाई यांनी औरंगाबादच्या विकासाला शासनाने नेहमीच प्राधान्य दिलेले आहे. कोविड काळात जगभरातील आरोग्य यंत्रणांची तारांबळ उडाली होती. तशीच औरंगाबादलाही या संकटाला तोंड देताना कठीण काळातून जावे लागले. परंतु सध्याच्या परिस्थितीत जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम झाली आहे. नवीन पाणी पुरवठा योजनेचे काम गतीने पुढे जात आहे. 152 कोटी रूपयांचे रस्ते शहरात झाले आहेत. घनकचऱ्याचे संपूर्ण व्यवस्थापन शास्त्रशुद्ध पद्धतीने होते आहे. क्रांती चौकात छत्रपतींचा अश्वारूढ पुतळा लवकरच विराजमान होत आहे. खाम नदीचे पुनरूज्जीवन झाले आहे. गुंठेवारीचा ऐतिहासिक असा

निर्णय शासनाने घेतल्याने शहरातील दोन लाख

घरांना शासनाच्या निर्णयाचा लाभ होतो आहे. त्याचबरोबर शहराच्या विकासात अधिक भर घालण्यासाठी मेट्रो रेल्वेचा डीपीआर तयार करण्याचे आदेशही देण्यात आलेले आहेत. अशाप्रकारे अत्याधुनिक सोयीसुविधांनी औरंगाबाद जिल्ह्याची वाटचाल सुरू असल्याचे श्री. देसाई म्हणाले. शिवाय, संत एकनाथ रंग मंदिर ज्याप्रमाणे सर्व सोयींयुक्त जनतेच्या सेवेत देण्यात आलेले आहे. त्याचप्रकारे संत तुकाराम नाट्यगृहाचेही नूतनीकरणाचे काम लवकरच करण्यात येऊन त्याचेही लोकार्पण करण्यात येईल, अशी ग्वाही श्री. देसाई यांनी दिली.

कार्यक्रमाच्या सुरूवातीला श्री.देसाई यांच्याहस्ते फीत कापून आणि कोनशिलेचे अनावरण करून संत एकनाथ रंग मंदिराचे लोकार्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. पांडेय यांनी केले. यामध्ये त्यांनी शहरात करण्यात आलेल्या विविध विकासकामांची माहिती दिली. कार्यक्रम कोविड 19 च्या मार्गदर्शक सूचनांनुसार मर्यादित निमंत्रितांच्या उपस्थितीत पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीणा कन्नडकर यांनी केले.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!