NewsInTrending : चर्चेतली बातमी : ” तो ” चित्रपट चालू देणार नाही , नाना पटोले यांचा इशारा

मुंबई : राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या नथुरामच्या भूमिकेवर बोलताना, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी महाराष्ट्रात अमोल कोल्हे यांचा ‘तो’ चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही असा इशारा दिला आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येचे समर्थन आणि त्यांचा मारेकरी नथुराम गोडसेंचे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न एका विशिष्ठ वर्गाकडून सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार व अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी एका चित्रपटात नथुराम गोडसेची भूमिका करून पुन्हा एकदा गोडसेचा उदोउदो करण्याचा प्रयत्न केला असून काँग्रेस पक्ष महात्मा गांधींच्या मारकऱ्याचे उदात्तिकरण कदापी खपवून घेणार नाही असे पटोले यांनी म्हटले आहे.
यावर आपली प्रतिक्रिया देताना पटोले म्हणाले कि , डॉ. अमोल कोल्हे कलाकार असले तरी ते एका पक्षाचे खासदार आहेत त्यामुळे त्यांनी अधिक जबाबदारीने वागण्याची अपेक्षा आहे. कलाकार म्हणून मिळालेल्या स्वातंत्र्याच्या दुरुपयोग करुन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येचे समर्थन आणि नथुरामचे उदात्तीकरण करणे हे दुर्दैवी आहे. नथुराम गोडसेला नायक बनवण्याचा हा प्रयत्न चुकीचा पायंडा पाडणारा आहे. याआधीही काही कलाकारांनी गोडसेच्या भूमिका केल्या त्यावरही लोकांनी तीव्र नापसंती व संताप व्यक्त केला होता. डॉ. कोल्हे नथुरामची भूमिका करण्याबद्दल देत असलेले स्पष्टीकरण अत्यंत तकलादू व न पटणारे आहे, असे नाना पटोले यांनी म्हटलंय.
दरम्यान महाराष्ट्रात हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही असा इशाराही नाना पटोलें यांनी दिला आहे. तसेच, शरद पवार यांनी यात लक्ष घालावे जर चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित झाला तर यामुळे राष्ट्रवादीची भूमिका दिसून येईल, असेही त्यांनी म्हटले आहे. काँग्रेसच्या प्रमुख नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांध यांच्या कानावर हे प्रकरण घालण्यात आले असल्याचेही ते म्हणाले. नथुरामच्या भूमिकेबद्दल भारतीय जनता पक्षाने व्यक्त केलेली प्रतिक्रिया काही नवीन नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपा यांचे राष्ट्रपिता महात्मा गांधी व नथुराम गोडसे बद्दलचे विचार सर्वांना माहित आहेत. परंतु डॉ. कोल्हे यांनी नथुरामची भूमिका करून गांधी हत्येचे एकप्रकारे समर्थनच केले आहे. डॉ. कोल्हे आता कितीही सारवासारव करत असले तरी त्याला काहीही अर्थ नाही.
देशातील एका विशिष्ट विचारसरणाचे लोक सातत्याने नथुरामला जिवंत करुन महात्मा गांधींचा अपमान करत असतात परंतु ७५ वर्षानंतरही महात्मा गांधींच्या विचाराचे महत्व कमी झालेले नाही उलट जगातील विविध देश महात्मा गांधींच्या विचाराचा वारसा घेऊन वाटचाल करत आहेत ही त्यांच्या विचाराची ताकद आहे. आपल्याच देशातील काही लोक मात्र महात्मा गांधींचे विचार पुसण्याचे काम करत आहेत परंतु गांधी विचार व त्यांनी देशासाठी दिलेले बलिदान जनता विसरलेली नाही व विसरणारही नाही, असेही पटोले यांनी स्पष्ट केले.