Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraPoliticalUpdate : “मी मोदींना मारु शकतो आणि शिव्या देऊ शकतो…” नेमके काय आहे प्रकरण ?

Spread the love

मुंबई : “मी मोदींना मारु शकतो आणि शिव्या देऊ शकतो…” असे वादग्रस्त वक्तव्य केल्याचा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असताना या व्हिडीओवरुन भाजपकडून काँग्रेस नेतृत्वावर टीका केली जात आहे. या वादावर आपला खुलासा देताना आपण हे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्धेशून नव्हते तर गावगुंड मोदीला उद्धेशून होते असे म्हटले आहे. दरम्यान या प्रकरणात भंडारा गोंदिया जिल्ह्याचे खासदार सुनील मेंढे यांनी नाना पटोले यांच्या विरोधात भंडारा शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. तर, ‘नानाभाऊ केवळ शारीरिक उंची असून चालत नाही, वैचारिक-बौद्धिक उंची पण असावी लागते’ अशी टीका  भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.


एका वृत्त वाहिनीशी बोलताना पटोले यांनी म्हटले आहे कि , “जे काही वक्तव्य माझ्या नावाने दाखवले जात आहे त्यामध्ये लोक माझ्या सभोवताली गोळा झालेले आहेत. सध्या आमच्या जिल्ह्यामध्ये निवडणुका सुरु आहेत. निवडणुकांच्या प्रचारामध्ये एका मोदी नावाच्या गावगुंडाची तक्रार लोक मला करत होते. त्या गावगुंडाला मी बोलूही शकतो आणि मिळाला तर मारुही शकतो. तुम्हाला घाबरण्याचे कारण नाही. मी त्या गावगुंड मोदीबद्दल बोललो आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल नाही. ”

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने भंडारा जिल्ह्यात रविवारी  प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी आपल्या मतदार संघात विविध ठिकाणी सभा घेतल्या होत्या. या दरम्यान संध्याकाळी घेण्यात आलेल्या एका प्रचार सभेत नाना पटोले यांनी “मी मोदींना मारू शकतो व शिव्याही देऊ शकतो असे वक्तव्य केल्यानंतर हा व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यावरून मोठा वाद पेटला आहे.

नाना पटोले नेमके काय म्हणाले होते ?

“मी का भांडतो? गेल्या ३० वर्षापासून मी राजकारणात आहे. लोकं ५ वर्षात आपल्या एका पिढीचा उद्धार करतात. शाळा, कॉलेज करुन आपल्या एक-दोन पिढीचा उद्धार करुन टाकतात. मी एवढी वर्ष झालीय राजकारण करतोय पण एक शाळा माझ्या नावावर नाही. इथून पाठीमागे एक ठेकेदारी नाही केली. जो आला त्याला कायम मदत करतोय. म्हणून मी मोदींना मारु शकतो, त्यांना शिव्या देऊ शकतो आणि म्हणून मोदी माझ्या विरोधात प्रचाराला आले. एक प्रामाणिक नेतृत्व तुमच्या समोर उभा आहे….,” असे नाना पटोले या व्हायरल व्हिडीओमध्ये बोलत असताना दिसत आहेत.

भाजपाकडून टीकास्त्र

दरम्यान या व्हायरल व्हिडीओवर टीकास्त्र सोडताना भाजपनेते देवेन्द्र फडणवीस यांनी म्हटले आहे कि , “पाकिस्तानच्या सीमेनजीक पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा २० मिनिटे खोळंबून राहतो, तेथील काँग्रेसचे मुख्यमंत्री त्याची साधी दखल सुद्धा घेत नाहीत. आता महाराष्ट्राचे काँग्रेस अध्यक्ष म्हणतात, मी मोदींना मारु शकतो, शिव्या देऊ शकतो. काँग्रेस पक्षाचे चालले तरी काय? कधीकाळी स्वातंत्र्याच्या आंदोलनात असणारा हा पक्ष इतक्या रसातळाला? सत्तेसाठी काहीही? काँग्रेसला आता लोकशाहीतील राजकीय पक्ष म्हणायचे, की दहशत पसरविणारे संघटन? नानाभाऊ केवळ शारीरिक उंची असून चालत नाही, वैचारिक-बौद्धिक उंची पण असावी लागते. ” तर महात्मा गांधी ते राहुल गांधी अशी विक्रमी घसरण, पडझड फक्त केंद्रीय नेतृत्वापुरती कशी होईल सुमार नेतृत्वाचा मामला सर्वच पातळीवर उपलब्ध आहे, अशी टीका भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!