Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

ElectionNewsUpdate : ‘त्या ‘ पाच राज्यातील प्रचारसभांच्या बाबतीत निवडणूक आयोगाने घेतला ‘हा’ निर्णय

Spread the love

नवी दिल्ली: देशातील पाच राज्यांमध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरू असली तरी देशातील कोरोनाची स्थिती लक्षात घेऊन केंद्रीय निवडणूक आयोगाने १५ जानेवारीपर्यंत जाहीर प्रचारसभांवर बंदी घातली होती. ही मुदत आता २२ जानेवारीपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उत्तर प्रदेश , उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत.


देशात कोरोना रुग्णांचा दैनंदिन आकडा वाढत चाललेला असतानाही आयोगाने घोषित केल्याप्रमाणे निवडणूक प्रक्रिया चालू आहे. दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांकडून कोविड नियमांचे काटेकोरपणे पालन केले जावे, अशी भूमिका आयोगाने घेतली असून काही कठोर निर्णयही घेतले आहेत. त्यानुसार पदयात्रा, रोड शो, बाइक रॅली, चौकसभा याला पूर्णपणे मनाई करण्यात आली आहे. या धोरणानुसार विविध राजकीय पक्षांच्या जाहीर प्रचारसभांना १५ जानेवारीपर्यंत मनाई करण्यात आली होती. ही मुदत संपत असतानाच आज स्थितीचा पुन्हा आढावा घेण्यात आला व तूर्त ही बंदी कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. येत्या २२ जानेवारीपर्यंत जाहीर प्रचारसभांसाठी असलेली बंदी कायम राहील, असे निवडणूक आयोगाकडून आज सांगण्यात आले. त्याचवेळी काही बाबतीत मात्र सूट देण्यात आली आहे.

दरम्यान या काळात राजकीय पक्षांनी डिजिटल प्रचारावर अधिक भर द्यावा, असे आवाहन पुन्हा एकदा या निमित्ताने निवडणूक आयोगाने केले असून बंदिस्त सभागृहात एकूण क्षमतेच्या निम्मे किंवा जास्तीत जास्त ३०० जणांच्या उपस्थितीत मेळावा घेण्यास मात्र अनुमती देण्यात आली आहे. कोविड नियमांबाबत कोणतीही ढिलाई चालणार नाही. राज्य आणि जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी याबाबत दक्ष राहावे. कोणत्याही राजकीय पक्षाकडून वा उमेदवाराकडून नियमभंग केला जात असेल तर त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, असे निर्देशही आयोगाने आज दिले. केंद्रीय निवडणूक आयुक्त सुशील चंद्र २२ जानेवारी रोजी पुन्हा एकदा स्थितीचा आढावा घेणार असून त्याचवेळी जाहीर प्रचाराबाबत पुढचा निर्णय घेतला जाणार आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!