Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaPoliticalUpdate : राष्ट्रवादी काँग्रेस ‘या’ तीन राज्यात लढवणार निवडणूक : शरद पवार

Spread the love

मुंबई : निवडणूक घोषित झालेल्या देशातील पाच राज्यांपैकी मणिपूर, गोवा आणि उत्तर प्रदेश या तीन राज्यांत राष्ट्रवादी काँग्रेस निवडणुका लढवणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज, मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान या तिन्ही राज्यांत काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि लहान-मोठ्या पक्षांना सोबत घेऊन आघाडीने लढणार असल्याचेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.


या निवडणुकीतील पक्षाचे धोरण जाहीर करताना पवार म्हणाले कि ,  मणिपूरमध्ये राष्ट्रवादीचे चार आमदार आहेत. त्यामुळे यावेळी पाच जागा राष्ट्रवादी लढणार असून गोव्यामध्ये कॉंग्रेस, तृणमूल व इतर पक्षांसोबत चर्चा सुरू आहे. तर उत्तर प्रदेशमध्ये पुढच्या आठवड्यात स्वतः जाणार असून, उत्तर प्रदेशात राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि इतर छोट्या – मोठ्या पक्षांची आघाडी झाली आहे. उद्या लखनऊमध्ये या सर्व पक्षांची बैठक होणार असून त्या बैठकीत जागा वाटपाची घोषणा करण्यात येईल. उत्तर प्रदेशमध्ये लोकांना बदल हवा आहे. त्यामुळे तिथे परिवर्तन होणार असल्याचा दावा शरद पवार यांनी यावेळी बोलताना केला.

उत्तर प्रदेशमध्ये परिवर्तनाची आवश्यकता

दरम्यान आज उत्तर प्रदेशातील कॉंग्रेसचे अल्पसंख्याक नेते सिराज मेहंदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यांचे स्वागत शरद पवार यांनी केले. यावेळी बोलताना पवार म्हणाले कि , आज उत्तर प्रदेशच्या स्थितीमध्ये खूप बदल झाला आहे. मला आनंद आहे की, जे उत्तर प्रदेशच्या विधानपरिषदेचे सदस्य होते. मागच्या अनेक वर्षांपासून गांधी-नेहरू यांच्या विचारधारेवर काम केले आहे. काँग्रेस पक्षात त्यांनी अनेक जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी आता राष्ट्रवादीसोबत काम करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वांना सोबत घेऊन उत्तर प्रदेशमध्ये परिवर्तनाची आवश्यकता आहे.

समविचारी पक्षांना एकत्र घेऊन एक पर्याय देण्याचा प्रयत्न

या निवडणुकांमध्ये समविचारी पक्षांना एकत्र घेऊन एक पर्याय देण्याचा प्रयत्न केला जात आहे. सिराज मेहंदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करतायत याचा मला आनंद होत आहे. उत्तर प्रदेशच्या अनेक जिल्ह्यात त्यांचे सहकारी आहेत. मी देखील उत्तर प्रदेशमध्ये जाऊन त्यांच्यासोबत एक जाहीर सभा घेणार आहे, असेही शरद पवार यांनी जाहीर केले. आज उत्तर प्रदेशचे मंत्री मौर्या यांनी मंत्रिपदाचा तसेच भाजपचा राजीनामा देऊन समाजवादी पक्षाची कास धरली आहे. त्यांच्यासोबत काही आमदारही पक्ष सोडणार असल्याचे कळते त्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये यावेळी परिवर्तन होणार आहे, असे ठाम मत शरद पवार यांनी व्यक्त केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेच्या प्रकरणाबाबत कालच सुप्रीम कोर्टाने एक स्वतंत्र चौकशी समिती नेमली आहे. त्यातून वास्तव काय असेल ते समोर येईल. मला वाटते  पंतप्रधानपद हे एक इन्स्टिट्यूशन आहे. त्यासाठी केंद्र असेल किंवा राज्याने सुरक्षेची जबाबदारी घेतलीच पाहिजे. सुप्रीम कोर्टाने समिती स्थापन केली असल्यामुळे त्यावर प्रतिक्रिया देणे योग्य नाही अशी प्रतिक्रिया  शरद पवार  यांनी यावेळी बोलताना दिली.

उत्तर प्रदेशातील १३ भाजप आमदारांची पक्षाला सोडचिट्ठी

दरम्यान उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपचे १३ आमदार पक्षाला सोडचिठ्ठी देणार असल्याचा दावाही  पवार यांनी केला. पुढील काही दिवसांमध्ये भाजपमधील नेते दररोज पक्ष सोडतील. यामध्ये भाजपच्या १३ आमदार आणि काही ज्येष्ठ नेत्यांचा समावेश असल्याचे पवार यांनी सांगितले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!