Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaIndiaUpdate : जाणून घ्या नव्या गाईडलाईननुसार कोणाची होईल कोरोनाची चाचणी ? आणि कोणाची होणार नाही ?

Spread the love

नवी दिल्ली : देशात पुन्हा एकदा कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची चर्चा होत असताना कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येने चिंता वाढवली आहे. दरम्यान  कोरोना चाचण्यांबाबत भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद अर्थात आयसीएमआरने आज नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. कोविड बाधित रुग्णाच्या संपर्कातील नेमक्या कोणाची चाचणी करण्यात यावी, याबाबत आता नवीन  निकष निश्चित करण्यात आले असून आणखीही काही महत्त्वाच्या सूचना करण्यात आल्या आहेत.


देशात कोरोनाच्या रुग्णसंख्येचा उद्रेक झाल्याने ट्रेसिंग, टेस्टिंग आणि ट्रीटमेंट असे तिहेरी आव्हान पुन्हा एकदा आरोग्य यंत्रणेपुढे उभे ठाकले आहेत. त्यात रुग्णाच्या संपर्कातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहचून चाचण्या केल्या जात आहेत. अशावेळी बदलत्या स्थितीत कोविड चाचणीबाबत खूप मोठा निर्णय आयसीएमआरने घेतला असून नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कातील प्रत्येक व्यक्तीची कोरोना चाचणी करण्याची आता आवश्यकता नाही. त्याऐवजी संपर्कातील हाय रिस्क गटात मोडणाऱ्या व्यक्तींचीच चाचणी करण्याचा सल्ला दिला गेला आहे. म्हणजेच कोरोना बाधिताच्या संपर्कातील वृद्ध व्यक्ती आणि गंभीर आजार असलेल्या व्यक्तीची चाचणीच चाचणी करण्याचे निर्देश दिले गेले आहेत.

दरम्यान जी व्यक्ती लक्षणेविरहित आहे अशा व्यक्तीची करोना चाचणी करण्याची आवश्यकता नाही, असेही यात नमूद करण्यात आले आहे. सध्या मोठ्या प्रमाणात रुग्ण गृह विलगीकरणात  आहेत. त्यांच्यासाठी स्वतंत्र मार्गदर्शक तत्वे  निश्चित करण्यात आली आहेत. या मार्गदर्शक तत्वानुसार  उपचार प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित व्यक्तीला पुन्हा कोरोना चाचणीची आवश्यकता नसेल व ही व्यक्ती एका राज्यातून दुसऱ्या राज्यात प्रवास करू शकेल, असेही नमूद करण्यात आले आहे.

यांची होईल कोरोनाची चाचणी

ताप, खोकला, घसा दुखणे, जीभेची चव जाणे, गंध न येणे अशी लक्षणे असतील तर संबंधित व्यक्तीने करोना चाचणी करून घेणे आवश्यक आहे, असे आयसीएमआरने स्पष्ट केले आहे. विदेशात जाणाऱ्या आणि विदेशातून येणाऱ्या सर्वच प्रवाशांसाठी कोरोना चाचणी यापुढेही अनिवार्य राहील, असेही नमूद केले गेले आहे.

दरम्यान घरी करण्यात येणाऱ्या  चाचणीबाबत आयसीएमआरने महत्त्वाची बाब स्पष्ट केली. त्यानुसार, घरी केलेली चाचणी निगेटिव्ह आली आणि तुम्हाला ताप, खोकला, घसादुखी अशी लक्षणे असतील तर ही चाचणी अंतिम मानू नये. अशा व्यक्तीने आरटी-पीसीआर चाचणी करून घ्यावी, असे नमूद करण्यात आले आहे. करोनाची लक्षणे असलेल्या आणि हाय रिस्क गटातील रुग्णाला वेगवान उपचार मिळावे, या उद्देशाने आयसीएमआरने ही पावले उचलली आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!