Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : महात्मा गांधींविरुद्ध गरळ ओकणाऱ्या कालिचरणाला अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Spread the love

रायपूर : महात्मा गांधी यांच्याबद्दल रायपूर येथील धर्मसंसदेत वादग्रस्त वक्तव्य करणारा कालीचरण महाराज ऊर्फ अभिजित सरागी याला अखेर अटक करण्यात आली आहे. रायपूर पोलिसांनी आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास त्याला ताब्यात घेतले.त्याच्या या वक्तव्याची सर्वत्र निंदा केली जात होती दरम्यान पोलिसांकडून त्याच्याविरुद्ध कुठलीच कारवाई होत नसल्याने संताप व्यक्त केला जात होता. याशिवाय कालिचरण विरुद्ध अकोला आणि पुण्यातही गुन्हा दाखल झाला आहे.


रायपूरचे पोलीस अधीक्षक प्रशांत अगरवाल यांनी ही माहिती दिली. महात्मा गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यापासून कालीचरणच्या विरोधात महाराष्ट्र व मध्य प्रदेशात चिथावणीखोर भाषण केल्या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यामुळे त्याला कोणत्याही क्षणी अटक होणार हे निश्चित मानले जात होते. आज अखेर ही कारवाई झाली. मध्य प्रदेशातील खजुराहो येथून २५ किलोमीटरवर असलेल्या बागेश्वर धाममध्ये एका भाड्याच्या खोलीत तो राहत होता. पोलिसांना ही माहिती मिळताच त्यांनी तिथं जाऊन कालीचरणला बेड्या ठोकल्या. आज संध्याकाळपर्यंत कालीचरणला रायपूरमध्ये आणले जाणार आहे.

दरम्यान पुण्यातील नातूबागेत हिंदू आघाडीच्या नावाखाली आयोजित १९ डिसेंबर रोजी झालेल्या शिवप्रताप दिन कार्यक्रमातही सामाजिक तेढ निर्माण करणारे भाषण केल्याबद्दल मिलिंद एकबोटे आणि कालिचरणसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळं कालीचरण यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

पुण्यातील नातूबाग मैदानात १९ डिसेंबर रोजी शिवप्रताप दिन म्हणजेच, अफजलखान वधाचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. याच कार्यक्रमात मिलिंद एकबोटे आणि कालीचरण यांनी मुस्लिम व ख्रिश्चन धर्मीयांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. या प्रकरणी त्यांच्यावर खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कालीचरण व एकबोटे बरोबरच मोहन शेटे, दीपक बाबुलाल नागपूरे, कॅप्टन दिगेंद्रकुमार (रा. राजस्थान) आणि नंदकिशोर एकबोटे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्वांनी धार्मिक श्रद्धाचा अपमान केला आणि कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या लोकांना भडकवण्याचा प्रयत्न केला, असं तक्रारीत म्हटलं आहे. तक्रारदारांनी पोलिसांकडे संबंधितांच्या भाषणाची क्लिपही दिली होती. त्या व्हिडिओ क्लिपची पडताळणी केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!