Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MHADA EXAM । म्हाडाच्या पेपर फुटीच्या प्रकरणात चौकशीला वेग, सहा आरोपींना पोलीस कोठडी

Spread the love

राज्याचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मध्यरात्री ट्वीट करत म्हाडाची रविवारी होणारी पुढे ढकलण्याची माहिती दिली होती, दुसरीकडे पुणे सायबर पोलिसांनी म्हाडाचा पेपर लीक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना  ताब्यात घेतले आहे.  याबाबत पोलिसांना काही पुरावे देखील मिळाले आहेत. म्हाडाचा आज होणारा पेपर लीक करणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

ताज्या माहितीनुसार या प्रकरणी पुणे पोलिसांच्या सायबर विभागाला सहा आरोपींना पकडण्यात यश आले आहे. या आरोपींना न्यायालयामध्ये हजर केले असता या सर्व आरोपींना न्यायालयाने १८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी ही माहिती दिली आहे.

आरोपींच्या शोधासाठी विशेष पथकांची स्थापना

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हाडाच्या परीक्षेचा पेपर फोडल्या प्रकरणी औरंगाबाद, जालना, बीड, पुणे, ठाणे या भागात आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली. त्यामध्ये औरंगाबाद येथील टार्गेट करिअर पॉईंट या संस्थेचे संचालक अजय चव्हाण आणि सक्षम अकॅडेमीचे संचालक कृष्णा जाधव, अंकित चनखोरे, पुण्यामध्ये राहणारे संतोष हरकळ आणि अंकुश हरकळ, डॉ. प्रितीश देशमुख या सहा आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्या आरोपींकडे काही पेपर, पेन ड्राईव्ह आदी साहित्य आढळून आले आहेत. तसेच, काहींचे मोबाइल नंबर देखील मिळाले आहेत. या कारवाईमधून आणखी नावे समोर येण्याची शक्यता असल्याने आज आरोपींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना १८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याचेही त्यांनी सांगितले.

आरोग्य विभागाच्या पेपरफुटीतील आरोपींचे या आरोपींशी कनेक्शन

आमच्या औरंगाबाद प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार म्हाडा पुणे विभागाचे मुख्याधिकारी नितीन माने यांच्या फिर्यादीवरुन पुणे सायबर पोलिस ठाण्यात सकाळी ९वा.गुन्हा दाखल झाला होता. त्या अनुषंगाने पुणे पोलिस तपास करत असतांना तिघांना  अटक करण्यात आली. प्रितीश देशमुख रा.खराळवाडी पिंपरी ,संतोष हरकळ रा.सिंदखेडराजा, अंकुश हरकळ रा.किनगाव राजा अशी अटक आरोपींची नावे आहेत.यांना आज सकाळी ६वा.अटक केल्याची माहिती पोलिस निरीक्षक अंकुश चिंतामण यांनी दिली.त्यांच्या ताब्यातून एक लॅपटाॅप ७ मोबाईल, पेन ड्राईव्ह, एक कार व काही कागदपत्रे जप्त करण्यात आली.तसेच आरोग्य विभागाच्या पेपरफुटीतील आरोपींचे या आरोपींशी कनेक्शन असल्याचे पुणे सायबर पोलिसांच्या तपासात उघंड झाले.या प्रकरणी पीएसआय डफळ यांनी तक्रार दाखल केली.तर पुढील तपास पोलिस निरीक्षक अंकुश चिंतामण करंत आहेत अशी माहिती पोलिस निरीक्षक हाके यांनी दिली.

सीबीआय चौकशीची मागणी

दरम्यान  या प्रकरणावरून भाजपाने राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. शिवाय, ऐनवेळी परीक्षा रद्द करण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये देखील मोठ्याप्रमाणावर संतापाचे वातावरण पाहायला मिळत आहे.या पार्श्वभूमीवर आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना म्हाडा पेपर फुटीच्या प्रकरणाची सीबीआय चौकशी झाली पाहिजे, अशी आमची मागणी असल्याचं सांगितलं आहे. शिवया, परीक्षांमध्ये मोठ्याप्रमाणावर भ्रष्टाचार सुरू असल्याचंही ते म्हणाले आहेत.

“आरोग्य भरती परीक्षेचा घोळ! पेपर फुटीचे धागेदोरे आरोग्य संचालनालयापर्यंत, आता म्हाडाच्या परीक्षेतही तेच घोळ, मध्यरात्री परीक्षा रद्द करण्याची वेळ! सरकारी भरतीचा हा बट्ट्याबोळ आणि राज्य सरकार काहीच बोलायला तयार नाही!भ्रष्टाचार, अनास्था आणि निर्लज्जतेचा कळस! किती दिवस आणि किती वेळा हे सहन करायचे? राज्यात सरकार नावाची यंत्रणा कार्यान्वित होणार आहे की नाही? आज पुन्हा लाखो विद्यार्थ्यांना फटका बसलाय ! नोकरी देऊ शकत नसाल तर किमान त्यांची अशी थट्टा तर करू नका! दोषींवर कठोर कारवाई कराच!पण सरकार म्हणून कुणी याची जबाबदारी घेणार की नाही?” असे  देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केले  आहे.

जितेंद्र आव्हाड यांचे ट्विट

म्हाडा साठी रविवारी सकाळच्या सत्रात कार्यकारी अभियंता, उप अभियंता, सहायक अभियंता आणि सहायक विधी सल्लागार तर दुपारच्या सत्रात कनिष्ठ अभियंता पदाची होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती राज्याचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मध्यरात्री ट्वीट करत ही माहिती दिली होती. विद्यार्थ्यांची क्षमा मागत त्यांनी ही माहिती दिली असून याबाबत त्यांनी दिलगिरी व्यक्त करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. दरम्यान ते म्हणाले की, ‘सर्व विद्यार्थ्यांची क्षमा मागून काही अपरिहार्य कारणामुळे आणि तांत्रिक अडचणीमुळे म्हाडाची आज होणारी परीक्षा आणि यापुढे होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. या परीक्षा जानेवारी महिन्यात होतील. ही माहिती एवढ्या रात्री यासाठी देतोय की विद्यार्थ्यांनी सेंटरवर जाऊ नये, त्यांना त्रास होऊ नये. परत एकदा क्षमा मागतो’

या परीक्षेसाठी आज सकाळच्या सत्रात ५० हजार उमेदवार तर दुपारच्या सत्रात ५६ हजार उमेदवार परीक्षा देणार होते. काही दिवसांपूर्वी या परीक्षेमध्ये मोठ्या प्रमाणात उमेदवारांकडून पैसे घेण्यात येत असल्याच्या तक्रारी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याकडे आल्या होत्या. त्यानुसार त्यांनी ही दलाली पद्धत मोडीत काढण्यासाठी जी पदं भरायची आहेत. त्या परीक्षेची प्राथमिक परीक्षा आणि त्यातून गुणवत्ता यादीत आलेल्या मुलांची मुख्य परीक्षा होईल असे जाहीर केले होते. यासोबतच त्या दलालांना उमेदवारांचे पैसे परत करा असा इशारा देखील दिला होता.

https://mhadarecruitment.in/

आपलं सरकार

Click to listen highlighted text!