Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : राहुल गांधी यांनी सांगितला हिंदू आणि हिंदुत्ववाद्यांमधला मोठा फरक

Spread the love

जयपूर : काँग्रेसनेते राहुल गांधी यांनी हिंदू आणि हिंदुत्ववादी  यातील फरक समजून सांगताना हिंदू हा सत्याच्या शोधात असतो तर हिंदुत्ववादी सत्तेच्या शोधात असतो आणि आपण हिंदू आहोत मात्र हिंदुत्ववादी नाहीत हे स्पष्ट करून हिंदुत्ववादाच्या नावाने सत्तेचे राजकारण करणाऱ्या सत्ताधाऱ्यांवर प्रचंड टीका केली .

महागाईच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारला घेरण्यासाठी काँग्रेसतर्फे आज  रविवारी जयपूरमध्ये ‘महागाई हटाओ रॅली’ चे आयोजन करण्यात आले . या रॅलीत सोनिया गांधी, प्रियंका गांधी आणि राहुल गांधी सहभागी झाले. रॅलीदरम्यान राहुल गांधी म्हणाले, देशात दोन शब्दांची टक्कर आहे. एक शब्द आहे हिंदू तर दुसरा शब्द आहे हिंदुत्व. मी हिंदू आहे पण हिंदुत्ववादी नाही. महात्मा गांधी हिंदू होते आणि गोडसे हिंदुत्ववादी.

आपल्या भाषणात राहुल गांधी पुढे म्हणाले कि ,  ‘देशासमोर कोणती लढाई आहे आणि कुणामध्ये लढाई आहे, कोणत्या विचारसरणींमध्ये आहे. तुम्हाला माहीत आहे की, कोणत्याही दोन जीवांचा एकच आत्मा असू शकत नाही. तसेच, दोन शब्दांचा अर्थ एकच असू शकत नाही. प्रत्येक शब्दाचा अर्थ वेगळा असतो. देशाच्या राजकारणात आज दोन शब्दांची टक्कर सुरू आहे. त्यांचे अर्थ वेगळे आहेत. एक शब्द हिंदू आहे तर दुसरा शब्द हिंदुत्व आहे. ही एकच गोष्ट नाही. हे दोन भिन्न शब्द आहेत आणि त्यांचा अर्थ पूर्णपणे वेगळा आहे.

मी हिंदू आहे, पण हिंदुत्ववादी नाही….

राहुल गांधी पुढे म्हणाले, “मी हिंदू आहे, पण हिंदुत्ववादी नाही. हे सर्व हिंदू आहेत पण हिंदुत्ववादी नाहीत. आज मला तुम्हाला हिंदू आणि हिंदुत्ववादी यातील फरक सांगायचा आहे. महात्मा गांधी हिंदू, गोडसे हिंदुत्ववादी. काहीही झाले तरी हिंदू सत्याचा शोध घेतो. गरज  पडली तर तो त्यासाठी जीवाचीही परवा करत नाही, तो सत्याचा शोध घेतो. त्याचा मार्ग सत्याग्रहाचा आहे. तो संपूर्ण जीवन सत्याच्या शोधात घालवतो. महात्मा गांधींनी माय एक्सपिरियन्स विथ ट्रुथ हे आत्मचरित्र लिहिले, म्हणजे त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य सत्य समजून घेण्याच्या प्रयत्नात घालवले आणि शेवटी एका हिंदुत्ववाद्याने त्यांच्या छातीवर तीन गोळ्या झाडल्या.

७० वर्षांचे सोडा गेल्या ७ वर्षांत काय केले ते सांगा ?

या रॅलीदरम्यान प्रियंका गांधी वाड्रा यांनीही केंद्र सरकारवर टीका केली. त्या म्हणाल्या कि , ७० वर्षांचे सोडून द्या. गेल्या ७ वर्षांत तुम्ही काय केले ते सांगा, असे आव्हान भाजपला दिले आहे. केंद्र सरकार निवडक उद्योगपतींसाठी काम करत असल्याचा आरोप करत, देशातील जनता महागाईने त्रस्त आहे. तर, दुसरीकडे केंद्र सरकार जाहिरातींवर खर्च करण्यात व्यस्त आहे, अशीही टीका केली.

महागाईवरून केंद्रावर हल्ला करताना प्रियांका म्हणाल्या कि , स्वयंपाकाचा गॅस एक हजार रुपये, खाद्य तेल २०० रुपयांपेक्षा अधिक दरावर मिळत आहे. पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. सर्वसामान्य जनता महागाईने त्रस्त आहे. एक असे सरकार असते, ज्यांना लोकांचे भले करायचे असते. तर, दुसरे सरकार असते, ज्यांचा हेतू भ्रष्टाचार आणि जनतेची लूट करण्याचा असतो, अशी टीका करत, या सरकारमधील मंत्र्याच्या मुलाने गाडीखाली शेतकऱ्यांना चिरडले. ते अजूनही मंत्रिपदावर आहेत. उत्तर प्रदेश सरकार जाहिरातींवर कोट्यवधी खर्च करत आहे. मात्र, शेतकऱ्यांना खत पुरवठा करू शकत नाही. केंद्रातील सरकार असत्य, लोभी आणि लूट करणारे आहे, या शब्दांत प्रियंका गांधी यांनी हल्लाबोल केला.

केंद्रातील मोदी सरकार तुमच्यासाठी काम करत नाही. हे सरकार काही लोकांसाठीच काम करत आहे. पंतप्रधान मोदी ७० वर्षांची चर्चा करतात. ७० वर्षांचे जाऊ दे. गेल्या ७ वर्षांत काय केले याचा हिशोब त्यांनी द्यावा. पंतप्रधान जगभर फिरतात, पण शेतकऱ्यांना भेटण्यासाठी दहा किलोमीटर जाऊ शकत नाही, असा घणाघात प्रियंका गांधी यांनी यावेळी बोलताना केला.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!