Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadNewsUpdate : प्रेमविवाह केला म्हणून सख्या भावानेच केली बहिणीची हत्या…..!

Spread the love

सैराट चित्रपटातील एका दृश्याप्रमाणेच घडली घटना

वैजापूर : प्रेमविवाह केला म्हणून सख्या भावानेच 19 वर्षीय मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 2016 साली आलेल्या सैराट चित्रपटातील एका दृश्याप्रमाणेच वैजापूर तालुक्यातील लाडगाव येथे ही घटना घडली आहे. मृत मुलीचे नाव किशोरी मोटे असे आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली आहे. पोलिसांनी आरोपी भावाला ताब्यात घेतले आहे.


कोयत्याने केली हत्या

तालुक्यातील लाडगाव शिवारात ही घटना घडली असून, प्रेमविवाह केल्याच्या कारणावरून भावानेच सख्या बहिणीची कोयत्याने वार करून हत्या केली आहे. विशेष म्हणजे आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती मिळत आहे. तो मुळचा गोयेगाव येथील रहिवाशी आहे. प्रेमविवाह करणाऱ्या बहिणीला भेटण्यासाठी आईसोबत तो रविवारी लाडगावला गेला होता. यावेळी त्याने रागाच्या भरात कोयत्याने बहिणीचा गळा चिरून निर्घृण हत्या केली आहे.

सहा महिन्यापूर्वी केला होता प्रेमविवाह

सहा महिन्यापूर्वी 19 वर्षीय किशोरीने पळून पुण्यातील आळंदी येथे जाऊन प्रेमविवाह केला होता. त्यानंतर ते लाडगाव या परिसरात राहण्यासाठी आले होते. ही माहिती मिळताच किशोरीचा भाऊ संकेत मोटे हा लाडगावला आला. त्यानंतर बहिणीला तू पळून प्रेमविवाह का केला? असा जाब विचारला. त्यानंतर शाब्दिक वादानंतर राग अनावर झालेल्या भावानेच जवळ असलेल्या कोयत्याने सख्या बहिणीवर सपासप वार केला.

भावाने इतक्या निर्घृण वार केले की, बहिणीचे मुडके शरीरावेगळे झाले. हा सर्व प्रकार पाहून किशोरीच्या पतीने पळ काढला आणि आपला जीव वाचवण्य़ासाठी धावपळ केली. शेजारील काही लोकांना या घटनेची माहिती मिळताच तात्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनीही तात्काळ घटनास्थळी धाव घेत, आरोपी भाऊ आणि आई यांना ताब्यात घेतले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!