Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

SocialMediaUpdate : आमदार राम कदम आणि कन्हैय्याकुमार यांच्यात नेमका काय वाद झाला ?

Spread the love

मुंबई : काँग्रेस नेता कन्हैय्या कुमार आणि भाजप नेता आमदार राम कदम यांच्यात एका वृत्त वाहिनीच्या कार्यक्रमात ‘भारत माता की जय’ आणि ‘गोडसे मुर्दाबाद’ या घोषणेवरून चांगलीच शाब्दिक चकमक उडाली. या शो मध्ये भाजपा आमदार राम कदम यांना काँग्रेस नेता कन्हैय्या कुमार यांना ‘भारत माता कि जय ‘ अशी घोषणा देण्याचे आव्हान देताच कन्हैयाकुमार यांनी कदम यांना ‘गोडसे मुर्दाबाद’ बोलण्याचे आव्हान दिले त्यावरून सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.


‘न्यूज १८’ या वृत्तवाहिनीच्या चौपाल या कार्यक्रमात सहभागी झालेले दोन्ही नेते मंचावर असतानाच चर्चेदरम्यान एकमेकांना आव्हान देऊ लागले. यावेळी कन्हैय्या कुमारने आव्हान पूर्ण केले , मात्र राम कदम शेवटपर्यंत गोडसे मुर्दाबाद बोलले नाहीत. अभिनेत्री स्वरा भास्करनेही यावरुन चिमटा काढत ट्वीट केले आहे. मंचावर असताना राम कदम यांनी कन्हैय्या कुमारला ‘भारत माता की जय बोलता का?’, एकदा बोलून दाखवा…असे आव्हान देत एका जुन्या वक्तव्याची आठवण करुन दिली. “तुम्ही १० फेब्रुवारी २०१६ मध्ये म्हटले होते की, “माझ्या मुलाचे नाव भारत माता की जय ठेवेन, जेणेकरुन तो शाळेत गेल्यावर फी माफ करतील”. यानंतर कन्हैय्या कुमारने राम कदम यांना थांबवत तुम्ही माझ्यामधला बिहारी जागा केला आहे असं सांगत उत्तर देण्यास सुरुवात केली. “आतापर्यंत मी यांच्याशी आदराने बोलत होतो, आता यांनी माझ्यामधला बिहारी जागा केला आहे. तुम्हाला संबित पात्रा होण्याची हौस आहे ना…त्यांनीही हा प्रश्न विचारला होता तेव्हा त्यांनाही उत्तर दिलं होतं. काय उत्तर दिले होते सांगतो…आम्ही भारत माता की जय बोलतो…पण मग तुम्ही गांधींना मानत असाल तर गोडसे मुर्दाबाद बोलून दाखवा,” असं आव्हानच कन्हैय्या कुमारने यावेळी दिले.

यावर राम कदम यांनी आम्ही गोडसेच्या कार्याचं आम्ही कधी समर्थन केलं आहे का? असा प्रश्न विचारला. यावर कन्हैय्या कुमारने केले आहे असे उत्तर देत आरएसएसच्या कार्यालयात गोडसेचा फोटो लावला आहे, ग्वालियरमध्ये मंदिर उभारलं आहे असे सांगितले. राम कदम पुढे बोलताना म्हणाले की, “तुम्ही गोडसे मुर्दाबाद बोला असे सांगत आहात, पण आम्ही गोडसे जिंदाबाद असे कधी म्हटले ?. गांधींच्या विचारसऱणीचा अपमान आम्ही कधी केला?”. यावर कन्हैय्याने नेहमीच असे सांगत असहमती दर्शवली आणि पुन्हा एकदा ‘गोडसे मुर्दाबाद’ बोलण्याचे आव्हान दिले. त्यावर राम कदमांनी पुन्हा एकदा आम्ही गोडसे जिंदाबादच म्हणत नाही तर मुर्दाबाद बोलण्याचा प्रश्न कुठून येतो असे म्हटले . त्यावर कन्हैय्या कुमारने का घाबरत आहात ? पक्षातून बाहेर काढतील अशी भीती वाटतीये का? असा टोलाही लगावला.

यानंतर राम कदम यांनी गोडसेने महात्मा गांधींच्या हत्येचं केलेलं कार्य चुकीचं असून निंदनीय आहे असे सांगितले . त्यावर कन्हैय्या कुमारने वध नाही ना केला? अशी विचारणा करत टोला लगावला. यानंतर राम कदम यांनी मी कोणत्या शब्दांत बोलावे हे माझे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे असं सांगताच कन्हैय्या कुमारने त्याचप्रमाणे ‘जय श्रीराम’, ‘भारत माता की जय’ म्हणणं माझं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, मला बोलायला सांगणारे तुम्ही कोण? तुम्ही सांगितल्यावर मी का बोलावे ? अशी विचारणा केली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!