Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : जरी पंतप्रधान बोलले असले तरी ….मोदींच्या बोलण्यावर विश्वास नाही , टिकैत यांनी जाहीर केली आंदोलनाची भूमिका

Spread the love

नवी दिल्ली : शेतकऱ्यांची माफी मागत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  तिन्ही कृषी कायदे मागे घेणार असल्याचे  जाहीर करून दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेलं आंदोलन आता शेतकऱ्यांनी थांबवावे  असे  आवाहन केले आहे . मात्र असे असले तरी , शेतकरी आंदोलनाचे  नेते राकेश टिकैत यांनी  आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बोलण्यावर विश्वास नसल्याची प्रतिक्रिया राकेश टिकैत यांनी व्यक्त केली आहे. 


दरम्यान आंदोलन तातडीने मागे घेणार नसल्याचे  राकेश टिकैत यांनी स्पष्ट केले  आहे. संसदेत कृषीविषयक कायदे रद्द होतील त्या दिवसाची आम्ही वाट पाहणार आहोत, असे त्यांनी म्हटले आहे. राकेश टिकैत यांनी असेही स्पष्ट केले आहे की, किमान आधारभूत किमती सोबतच सरकारने शेतकऱ्यांशी संबंधित इतर समस्यांवरही चर्चा केली पाहिजे. दिल्ली-एनसीआरच्या चार सीमेवर (शहाजहानपूर, टिकरी, सिंघू आणि गाझीपूर) गेल्या एक वर्षांपासून यूपी, हरियाणा आणि पंजाबसह अनेक राज्यांतील शेतकरी तीन केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत आहेत. शेतकरी आंदोलक २६ नोव्हेंबर २०२० पासून तीनही कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीवर ठाम होते आणि आहेत.

पंतप्रधानांनी याअगोदर १५ – १५ लाख रुपये देण्याचंही आश्वासन दिले  होते , पण आजपर्यंत किती जणांना १५ लाख रुपये मिळाले? असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केलेली कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा म्हणजे या आंदोलनात सहभागी होणाऱ्या आदिवासी, श्रमिक आणि महिलांचा विजय असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली.

काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ९ वाजता देशवासीयांशी संवाद साधून  आपल्या सरकारने घोषित केलेले तिन्ही कृषी कायदे मागे  घेणार असल्याचे  जाहीर केले. तसेच  दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेलं आंदोलन आता शेतकऱ्यांनी थांबवावे  असे  आवाहन करून मोदींनी माफीही मागितली आहे. या, नवी सुरुवात करुया, असे म्हणत मोदींना शेतकऱ्यांना आवाहन केले  आहे. या महिन्याअखेरीस सुरु होणाऱ्या संसदेच्या अधिवेशनात तीनही कृषी कायदे माघारी घेण्याची संवैधानिक प्रक्रिया सुरू केली जाईल, असे  आश्वासनही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलं आहे.

त्यांनी म्हटले कि , मी देशवासीयांची क्षमा मागतो. आमच्या तपस्येतच काही कमी राहिली असेल. काही शेतकऱ्यांना आम्ही या गोष्टी समजावू शकलो नाही,  आम्ही तिन्ही कृषी कायदे मागे घेत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्रकाश पर्व सोहळ्याचं निमित्त साधून देशाशी संवाद साधला. आता आंदोलन संपवून आपल्या घरी जावे , असे आवाहनही  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले.

सुरुवातीला गुरु नानक यांनी महत्त्वाची शिकवण दिल्याचे  मोदींनी म्हटलं आहे. शेतकऱ्यांच्या समस्या मी जवळून पाहिल्या असल्याचे  मोदी म्हणालेत. तसेच माझ्या सरकारने  शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोत्तम प्राधान्य दिल्याचं त्यांनी म्हटले  आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांना सरकारकडून मदत करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. पंतप्रधानांनी आजच्या संबोधनात संदेशात शेतकऱ्यांच्या योजनांबाबत महत्त्वाची दिली आहे.

सोनिया गांधी यांची प्रतिक्रिया

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या घोषणेवर आपली प्रतिक्रिया देताना काँग्रेसनेत्या सोनिया गांधी यांनी म्हटले आहे कि , जवळपास १२ महिन्यांपासून गांधीवादी आंदोलन करणाऱ्या देशातील ६२ कोटी अन्नदाता-शेतकरी आणि शेतमजुरांच्या संघर्षाचा आणि इच्छाशक्तीचा विजय झाला आहे. आंदोलनात ७०० हून अधिक शेतकऱ्यांनी बलिदान दिले, त्यांना यश आले. आज सत्य, न्याय आणि अहिंसेचा विजय झाला आहे. सत्ताधाऱ्याने रचलेले शेतकरी आण मजूरविरोधी षड्यंत्र आणि हुकूमशाही शासकांचा अहंकार पराभूत झाला. शेतीविरोधी तीन काळ्या कायद्यांचा पराभव झाला असून अन्नदाताचा हा विजय आहे. गेल्या ७ वर्षांत भाजप सरकारने सतत शेतीवर वेगवगेळ्या प्रकारे हल्ला केला आहे. शेतकऱ्यांना दिला जाणारा बोनस रद्द करणे आणि शेत जमिनीला योग्य मोबदला देणारा कायदा आध्यादेश काढून संपवण्याचे षड्यंत्र रचले , असेही सोनिया गांधी यांनी म्हटले आहे.

अमित शहा यांची प्रतिक्रिया

दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाचं कौतुक करून म्हटले आहे कि, . पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या घोषणेचं वैशिष्ट्य म्हणजे, त्यांनी या घोषणेसाठी ‘गुरु पूरब’च्या विशेष दिन निवडला. प्रत्येक भारतीयाच्या कल्याणाशिवाय आणखी कोणतेही विचार ते करत नाहीत, हेच यातून दिसत आहे. त्यांनी उत्कृष्ट राजकीय कौशल्य दाखवले आहे.
आणखी एका ट्विटमध्ये अमित शहा म्हयांनी म्हटले आहे कि, ‘कृषी कायद्यांसंबंधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेली घोषणा एक स्वागतार्ह पाऊल आहे. ज्याप्रमाणे पंतप्रधान आपल्या भाषणात म्हणाले, भारत सरकार आपल्या शेतकऱ्यांच्या सेवेत कायम राहील आणि त्यांच्या प्रत्यांनात नेहमीच त्यांचे समर्थन करेल’.

रराहूल गांधी यांची टीका

देशाच्या अन्नदात्याने सत्याग्रहातून सरकारचा अहंकार मोडला. अन्यायाविरोधातील या विजयाचे अभिनंदन आहे, असे ट्विट राहुल गांधींनी केले. जय हिंद, जय हिंद का किसान!, असं ही राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटलंय. राहुल गांधी यांनी या ट्विटमध्ये १४ जूनचा आपला एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. सरकारला कृषी कायदे मागे घ्यावेच लागतील, असं राहुल गांधी म्हणाले.

सरकारच्या नियतीत खोटः प्रियांका गांधी

दरम्यान काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनीही ट्विटद्वारे आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले आहे कि , सरकारची नियत आणि बदलते विचार यामुळे विश्वास ठेवणे अवघड आहे. शेतकऱ्यांवर लाठीमार केला, त्यांना अटक केली. आता निवडणुकीत पराभव दिसू लागल्याने अचानक देशातील वास्तव समोर आले. हा देश शेतकऱ्यांनी उभा केला आहे, शेतकऱ्याचा आणि देशाचा खरा राखणदार आहे. कुठलेही सरकार शेतकऱ्यांना चिरडून देश चालवू शकत नाही, असं प्रियांका गांधी म्हणाल्या.

शेतकरी आंदोलनात ६०० हून अधिक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. ३५० दिवसांहून अधिक संघर्ष केला. पंतप्रधान मोदीजी तुमच्या मंत्र्यांच्या मुलाने शेतकऱ्यांना चिरडून मारले. तुम्हाला त्यांची काही चिंता नाही. तुमच्या पक्षाचे नेते शेतकऱ्यांचा अपमान करतात. त्यांना दहशतवादी, देशद्रोह, गुंड आणि उपद्रवी संबोधतात. एवढचं काय तर तुम्हीही त्यांना आंदोलनजीवी म्हटले, असेही प्रियांका गांधी यांनी म्हटले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!