MaharashtraPoliticalUpdate : असे आहेत विधानपरिषदेचे भाजप , सेना आणि काँग्रेसचे उमेदवार , सेनेच्या या नेत्याला दाखवली बाहेरची वाट !!

मुंबई : महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीसाठी कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर सर्वच पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात केली. भाजपनेही या निवडणुकीसाठी उमेदवारांची नाव जाहीर केली आहे. कोल्हापूरमधून अमल महाडीक यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर धुळे नंदुरबारमधून अमरिश पटेल यांना संधी देण्यात आली आहे. एकूण पाच नावांची घोषणा करण्यात आली आहे.
दरम्यान या निवडणुकीसाठी काँग्रेसकडून दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यातच भाजपकडून संजय केणेकर यांनी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी काँग्रेस नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विनंती केली होती. त्यानुसार भाजपने आज जाहीर केलेल्या यादीत केणेकर यांचे नाव जाहीर झाले नाही. त्यामुळे प्रज्ञा सातव यांच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.
भाजपची ५ उमेदवारांची यादी
भाजपने या विधानपरिषद निवडणुकीसाठी ५ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये कोल्हापूरमधून अमन महाडिक, धुळ्यातून अमरिश पटेल, नागपूर मधून चंद्रशेखर बावनकुळे, अकोल्यातून वसंत खंडेलवाल आणि मुंबईतून राजहंस सिंह यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पण, संजय केणेकर यांचा उल्लेख या यादीत नाही. संजय केणेकर यांना प्रज्ञा सातव यांच्याविरोधात उमेदवारी दिली असून त्यांनी अर्जही दाखल केला आहे. पण, शरद रणपिसे यांच्या निधनानं जी जागा रिक्त झाली आहे, त्याजागी काँग्रेसने प्रज्ञा सातव यांना उमेदवारी दिली आहे. एखाद्या नेत्याच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागा ही बिनविरोध निवडून आणल्याची परंपरा आहे. त्यामुळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची गुरुवारी भेट घेतली होती.
यांची मुदत संपत आहे
भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या ५ स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून रिक्त होणाऱ्या ६ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. महाराष्ट्र विधानपरिषदेच्या ५ स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून निवडून आलेले ६ सदस्य सर्वश्री कदम रामदास गंगाराम (मुंबई मतदारसंघ), अशोक अर्जुनराव उर्फ भाई जगताप (मुंबई), पाटील सतेज उर्फ बंटी (कोल्हापूर), अमरीशभाई रसिकलाल पटेल (धुळे तथा नंदूरबार), गोपीकिसन राधाकिसन बाजोरिया (अकोला तथा बुलढाणा तथा वाशिम) आणि व्यास गिरीषचंद्र बच्छराज (नागपूर मतदारसंघ) यांची दिनांक १ जानेवारी २०२२ रोजी मुदत समाप्त होत आहे.
शिवसेनेकडून रामदास कदम यांना दे धक्का
दरम्यान विधान परिषदेच्या जागेसाठी शिवसेनेच्या वतीने आदित्य ठाकरे यांच्यासाठी जागा सोडणाऱ्या सुनिल शिंदे यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे रामदास कदम यांना धक्का देत बाहेरचा रस्ता दाखवला आहे.सुनिल शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांच्यासाठी विधानसभा निवडणुकीत वरळी मतदारसंघ सोडला होता.
नामनिर्देशन पत्रे सादर करण्याचा अखेरचा दिनांक : २३ नोव्हेंबर २०२१
नामनिर्देशन पत्रांची छाननी : २४ नोव्हेंबर २०२१ उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक : २६ नोव्हेंबर २०२१
मतदानाचा दिनांक : १० डिसेंबर २०२१
मतदानाची वेळ : सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत
मतमोजणीचा दिनांक : १४ डिसेंबर २०२१
आणि निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा दिनांक : १६ डिसेंबर २०२१