Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraSTStrikeSpecial : अभिव्यक्ती : विशेष : शाळेला घेऊन जाणारी गरिबांची एसटी टिकली पाहिजे !

Spread the love

एसटी पाहिले की आठवण येते लहानपणी मामाच्या गावाला घेऊन जाणारे हीच ती एसटी. तालुक्याच्या ठिकाणी शाळेला घेऊन जाणारे हीच ती एसटी. कोणी आजारी पडले तर दवाखान्यापर्यंत घेऊन जाणारी हीच ती एसटी. सासुरवाशीण मुलीला माहेरी घेऊन जाणारी हीच ती एसटी. सर्वसामान्य लोकांच्या मदतीला धावून येणारी हीच ती एसटी!.


-डॉ. श्रीमंत कोकाटे


वीस वर्षांपूर्वी खेडेगावात अपवाद वगळता कोणाकडे साधी मोटारसायकल देखील नव्हती चार चाकी वाहन कधीतरी गावात यायचं. पोलीस गाडी, बँकेची गाडी किंवा नातेवाईकांची गाडी असेल आम्ही लहान मुलं त्या चारचाकी वाहनाच्या पाठीमागं कुतूहलाने पळायचो, सर्वसामान्यांचा आधार आहे ती एकमेव एसटी!

अत्यल्प दरात एसटीने गोरगरिबांची सेवा केली. मला आठवतंय शाळेत असताना सवलतीच्या दरात अडीच रुपयापर्यंत आम्ही एसटीने जात असत. तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी फक्त तीन रुपये लागायचे. ज्येष्ठ नागरिक, अपंग विद्यार्थी यांना अत्यल्प दरात एसटीने सेवा दिली. पर्यटनासाठी सवलतीच्या दरात एसटीने सेवा दिली.

खाजगी वाहतूकदारांची मक्तेदारी संपवून एसटी महामंडळाची स्थापना करण्यात लोकनेते यशवंतराव मोहिते यांचा मोलाचा वाटा आहे. या एसटीची सेवा अत्यंत निष्ठेने व प्रामाणिकपणे चालक- वाहक म्हणजेच ड्रायव्हर -कंडक्टर यांनी केली. घाटातून, वळणावळणाने वाडीवस्तीवर अत्यंत कठीण मार्गाने ड्रायव्हर- कंडक्टर एसटीला गाव गावी घेऊन गेले. “हात दाखवा बस थांबवा” इतकी सेवा एसटीने दिली. रस्ता कच्चा आहे,ओबडधोबड आहे म्हणून एसटीने कधी तक्रार केली नाही.

आपल्याला अत्यल्प दरात गावोगावी पोच करणाऱ्या एसटी कर्मचारी ड्रायव्हर आणि कंडक्टर यांचे वेतन मात्र अत्यंत अत्यल्प आहे. नऊ -दहा हजारात ते नोकरी करतात. जास्तीत जास्त 20 हजारापर्यंत ड्रायव्हर -कंडक्टर यांना पगार आहे. दहा-बारा तास सिटवरती बसून ऊन, वारा, पाऊस झेलत ड्रायव्हर आपल्याला पोहोच करतो. यात्रा-जत्रा, लग्नसराई, दिवाळी सुट्टी अशा गर्दीच्या काळात मोठ्या कौशल्याने उभा राहून तिकीट काढत सर्वांना सोबत घेत इच्छितस्थळी पोचवत ड्रायव्हर -कंडक्टर प्रचंड कष्ट करतात. त्याबदल्यात त्यांना वेतन मात्र खूपच कमी मिळते. त्यामुळेच अनेक एसटी कर्मचाऱ्यांनी ऐन दिवाळीच्या सणात आत्महत्या केलेल्या आहेत, ही बाब अत्यंत गंभीर आहे.

एसटीची सेवा करणाऱ्या, आपल्याला सोयीच्या ठिकाणी पोच करणाऱ्या ड्रायव्हर कंडक्टरला मुक्कामाच्या ठिकाणी मात्र अत्यंत हलाखीच्या व गैरसोयीच्या परिस्थितीत राहावे लागते. अत्यल्प वेतनात प्रचंड कष्ट करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना न्याय हक्क मिळालाच पाहिजे. यासाठी एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन अर्थात संप सुरू आहे. या संपाला संवेदनशील जनता निश्चित पाठिंबा देणारच, पण महाराष्ट्र सरकारला कधी जाग येणार?

अनेक दिवसापासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. महाराष्ट्रातील प्रवाशांची प्रचंड गैरसोय सुरू आहे. दोनशे किलोमीटर जाण्यासाठी प्रति व्यक्ती एक हजार रुपये खाजगी वाहनांना द्यावे लागत आहेत. जनतेचे प्रचंड हाल सुरू आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे हाल सुरू आहे. पण हा संप मिटावा, एसटी कर्मचाऱ्यांना योग्य वेतन मिळावे, त्यांच्या श्रमाचा सन्मान व्हावा, एसटी टिकावी यासाठी आघाडी सरकार प्रयत्न करताना दिसत नाही.

एसटी महामंडळ बंद पाडून खाजगी वाहतूकदारांना प्रोत्साहन द्यायचे हे भारतीय संविधानिक मूल्यांच्या विरोधात आहे. आघाडी सरकार एसटी कर्माचाऱयांशी अत्यंत उर्मटपणे वागत आहे. एसटी महामंडळाच्या मोक्याच्या जागा विशेषता मध्यवर्ती ठिकाणी असणारी बसस्थानके (एसटी स्टँड) या जागा भांडवलदार किंवा नेत्यांच्या घशात घालायच्या, असा काही नेत्यांचा डाव दिसतोय. जे आज केंद्र सरकार सरकारी उद्योगांचे खाजगीकरण करत आहे. त्याच पद्धतीने आघाडी सरकारमधील काही नेते एसटी महामंडळाचे खाजगीकरण करून एसटी स्टँडच्या जागा बळकावण्याचा प्रयत्न तर ककरत नाहीत ना? बाब अत्यंत गंभीर आहे.

आघाडी सरकारने एसटी बाबत कोणताही वाकडा विचार न करता, एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटवावा. कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा, एसटी महामंडळाचे सरकारीकरण करावे व गोरगरिबांना शाळेत घेऊन जाणारी, मामाच्या गावाला घेऊन जाणारे एसटी वाचवावी, हीच विनंती !

आपलं सरकार

Click to listen highlighted text!