Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MarathawadaNewsUpdate : विजयअण्णा बोराडे , मुरली लाहोटी यांना एमजीएम महात्मा गांधी मराठवाडा भूषण प्रदान

Spread the love

कृतीशील व्यक्तींचा एमजीकडून गौरव होत असल्याचे गिरीश गांधी यांचे मत

औरंगाबाद : जल आणि मृदसंधारण क्षेत्रात भरीव योगदान देणारे कृषीरत्न विजयअण्णा बोराडे आणि जगप्रसिद्ध चित्रकार मुरली लाहोटी यांना सोमवारी एमजीएम महात्मा गांधी मराठवाडा भूषणने सन्मानित करण्यात आले. सन्मानचिन्ह आणि ५० हजार रुपये असे या सन्मानाचे स्वरुप आहे. अत्यंत कृतीशील आणि वास्तववादी व्यक्तींचा एमजीएमकडून गौरव होत असल्याची भावना समाजसेवक आणि पर्यावरणवादी गिरीश गांधी यांनी या वेळी व्यक्त केली.

महात्मा गांधी मिशनचे सचिव अंकुशराव कदम कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. तर, एमजीएमचे अध्यक्ष कमलकिशोर कदम, विश्वस्त प्रतापराव बोराडे, कुलगुरु डॉ. विलास सपकाळ, अनुराधाताई कदम, मंगला बोराडे, शशीकला बोराडे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. तर, कला, क्रीडा, राजकारण, साहित्य आदी क्षेत्रातील अनेक मान्यवरही या सोहळ्यास उपस्थित होते.

धर्म बदलणे खूप सोपे आहे पण पिकपद्धती बदलणे कठिण

पुरस्कार स्वीकारल्यानंतर सत्काराला उत्तर देताना विजय अण्णा  बोराडे म्हणाले, एमजीएमचा महात्मा गांधी मराठवाडा भूषण मला कुटुंबानेच दिलेला पुरस्कार वाटतो. यात थोडी अवघडल्यासारखी भावना असली तरी आनंद आहे. बॅरिस्टर गांधी, अप्पासाहेब पवार, अण्णासाहेब शिंदे, मनीभाई देसाई यांच्यामुळे प्रेरणा घेऊन मी मृदसंधारणाचे काम करतो. मातीचे काम करताना पाणी आपोआप मिळते, असे माझे ठाम मत आहे. मातीचे संवर्धन केले तरच पाण्याचे संवर्धन होईल.

सध्याच्या काळात धर्म बदलणे खूप सोपे आहे पण पिकपद्धती बदलणे कठिण आहे. त्यामुळे बदलत्या हवामानावर काम होताना त्यास पुरक पिक घेणे महत्वाचे आहे. यात रेशीम, बांबू, औषधीयुक्त गवताचे उत्पादन फार महत्वाचे आहे. पाणी आणि मातीच्या क्षेत्रात केलेले काम माझ्या एकट्याचे नाही ती एक सामुहिक प्रक्रिया आहे. लोकांना शहाणपण शिकवण्याची गरज नसते. ते मुळातच शहाणे असतात मात्र परिस्थितीमुळे त्यांच्यापुढे संघर्ष आलेला असतो. या संघर्षशील लोकांना मी काही मदत करू शकलो, याचा आनंद असल्याची भावनाही बोराडे यांनी व्यक्त केली.

चित्रकार मुरली लाहोटी म्हणाले,

तर, चित्रकार मुरली लाहोटी म्हणाले, चित्रकाराने काय बोलावे, हे आठवत नाही. मी रंगातून आकार निर्माण करतो. त्यासाठी स्थळ, काळ माझ्यासाठी महत्वाचे ठरत नाही तर माझ्या कलेप्रती असलेली माझी निष्ठा महत्वाची ठरते. कोणत्याही व्यवसायाला मान द्यायला हवा. जग खूप मोठे असून आपण खूप लहान आहोत, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून बोलताना गिरीश गांधी म्हणाले, मार्गदर्शनापेक्षा कधीही कृती फार महत्वाची असते आणि मराठवाडा भूषणचे सन्मानार्थी खऱ्या अर्थाने कृतीशील आहेत. विजयअण्णांनी किल्लारी भुकंपावेळी मोठे काम केले पण त्या कामाची तेवढी दखल घेण्यात आली नाही, याची खंत आहे. सध्याची सामाजिक परिस्थिती भयानक असून सामाजिक न्याय प्रस्थापित झाला का, हे तपासून पाहण्याची वेळ आली आहे. देशाने अनेक क्षेत्रात प्रगती केली. परंतु, भौतिक प्रगतीत कोणकोणत्या गोष्टींचा बळी जातोय, याचा विचार व्हायला हवा. एक कालखंड देवदेवतांचा होता, दुसरा कालखंड धर्मसंस्थापकांचा होता, त्यानंतरचा कालखंड महापुरुषांचा होता आणि आताचा कालखंड सर्वसामान्यांचा आहे. त्यामुळे सर्वसामान्यांनी आता काहीतरी करून दाखवण्याची वेळी आली आहे, अशी भावनाही गिरीश गांधी यांनी व्यक्त केली.

कमलकिशोर कदम

दरम्यान मराठवाडा मागासलेला आहे, असे फक्त इकडचेच लोकं म्हणतात बाहेरचे नाही. ही भूमी कलावंतांची आणि कृतीशीलांची आहे, असे उद्गार कमलकिशोर कदम यांनी या वेळी काढले. यावेळी अंकुशराव कदम अध्यक्षीय भाषणात म्हणाले, विजयअण्णा आणि मुरली लाहोटी हे दोघेही तसे चित्रकारच आहेत. एक स्टुडिओत काही फुटांच्या कॅन्व्हासवर चित्र रंगवतो तर दुसरा काही हेक्टरवर प्रत्यक्षात काहीतरी फुलवतो. त्यामुळे त्यांचा सन्मान आमच्यासाठी मोलाचा आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन मुरली लाहोटी यांनी प्रत्यक्ष चित्र काढून केले. दरम्यान, या वेळी विजयअण्णा बोराडे आणि मुरली लाहोटी यांच्याबाबतच्या लेखांचे डॉ. रेखा शेळके यांनी संपादित केलेल्या पुस्तकाचेही मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. डॉ. रेखा शेळके यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. देवाशिष शेडगे यांनी सूत्रसंचालन तर प्रा. क्षमा खोब्रागडे यांनी आभार मानले.

पुरस्काराची रक्कम शंकरबाबा पापळकरांच्या कार्यास समर्पित

एमजीएम महात्मा गांधी मराठवाडा भूषणासोबत मिळालेला ५० हजार रुपयांचा धनादेश विजयअण्णा बोराडे यांनी अनाथ आणि दिव्यांगांसाठी कार्य करणारे शंकरबाबा पापळकर यांच्या कार्यासाठी देण्याची घोषणा केली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!